LEKHAMENDHA

TYPE : HILL FORT

DISTRICT : GADCHIROLI

HEIGHT : 940 FEET

GRADE : EASY

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात ठायी ठायी आढळणाऱ्या दुर्गांमुळे त्याला दुर्गाच्या देशा संबोधले जाते. पण असे असले तरी या दुर्गाच्या देशात आजही कित्येक किल्ले उपेक्षित आहेत. यात विशेष करून गोंदीया-गडचिरोली जिल्ह्यातील किल्ले प्रामुख्याने आहेत. आजवर नक्षलग्रस्त प्रांत म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या भागात भटक्यांची पाउले कधी फिरकलीच त्यामुळे हे दुर्ग स्वतःची ओळख हरवुन बसले आहेत. या भागातील नक्षलवाद आता ओसरला असला तरी पर्यटनाची ठिकाणे नसल्याने भटक्यांची या भागात तशी वानवाच आहे. विदर्भाचा हा भाग विरळ लोकवस्तीचा असल्याने या भागात खाजगी वाहने देखील फारशी दिसत नाही त्यामुळे सार्वजनीक वाहन दिसणे हि देखील दुर्मिळ गोष्ट आहे. त्यामुळे या भागातील दुर्गांची भटकंती करताना प्रवास व सुरक्षा या दोन्हीच्या दृष्टीने खाजगी वाहनाचा वापर करावा अन्यथा एका दिवसात एक किल्ला पहाणे देखील कठीण आहे. धानोरा या तालुक्याच्या ठिकाणाहुन जवळच असलेल्या भोवरागडवर जाण्यासाठी आमचा मुक्काम धानोरा येथे होता पण तेथे नीटशी सोय नसल्याने आम्ही आमचा मुक्काम जवळच असलेल्या लेखामेंढा गावातील मंदीरात हलवला. सकाळी येथून निघताना जेव्हा स्थानिकाना आम्ही आमच्या भोवरागड दुर्गभटकंतीची कल्पना दिली तेव्हा त्यांनी आम्हाला त्याच्या गावात देखील किल्ला असल्याचे सांगीतले व ते स्वतः आमच्या सोबत किल्ला दाखवण्यास निघाले. ... आधी आमचा त्यावर विश्वास बसला नाही पण येथवर आलोच आहोत तर पहायला काय हरकत आहे असा विचार करून आम्ही त्याच्या सोबत निघालो. त्यांच्या वर विश्वास न ठेवतो तर आम्ही एका पुर्णपणे अपरिचित अशा दुर्गाच्या दर्शनास मुकलो असतो. गडचिरोली दुर्गभ्रमंतीमध्ये अचानकपणे आमच्या दुर्गांच्या यादीत लेखामेंढा या दुर्गाचे नाव सामील झाले. धानोरा हे गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण गडचिरोली शहरापासुन ३६ कि.मी अंतरावर असुन लेखामेंढा गाव धानोरा येथुन ५ कि.मी. अंतरावर तर गडचिरोली येथुन ३० कि.मी.अंतरावर आहे. लेखामेंढा गावापासुन गडचिरोलीच्या दिशेने जाताना साधारण २.५ कि.मी.अंतरावर डाव्या बाजुस किल्ल्याकडे जाण्याचा कच्चा मार्ग आहे. एका लहानशा टेकडीवर हा किल्ला असुन स्थानिक लोक या किल्ल्यास डोंगरदेव म्हणुन ओळखतात व या देवस्थानाकडे जाण्यासाठी हा कच्चा मार्ग आहे. किल्ला सहजपणे दिसत नसल्याने आपण स्थानिक वाटाड्या सोबत घ्यावा. या कच्च्या रस्त्याने साधारण १ कि.मी.चालत गेल्यावर डावीकडे गावाबाहेर असलेला मोठा तलाव पहायला मिळतो. या वाटेने पुढे अजून एक १ कि.मी.चालल्यावर झाडी सुरु होते व रस्ता सरळ पुढे जातो तर एक लहानशी पायवाट उजवीकडे वळते. येथे स्थानिकांनी त्यांच्या पुजाविधीसाठी लहान खोपटे उभारलेले आहे. या झाडीत शिरल्यावर उंच व मोठ्या दगडाचा आधार घेऊन उंचावर बांधलेली रचीव दगडांची तटबंदी दिसुन येते. या तटबंदीला वळसा घालुन थोडे पुढे आल्यावर आपण किल्ल्याच्या दरवाजात पोहोचतो. किल्ल्याचा दरवाजा चौकट स्वरूपात असुन त्यावर कमान नसावी अशी असे वाटते. किल्ल्याची सध्या शिल्लक असलेली तटबंदी साधारण १०-१२ फुट उंच असुन रुंदी साधारण ४ ते ६ फुट आहे. दरवाजा समोरील भाग वगळता जमिनीपासुन हि तटबंदी साधारण ३० फुट उंचावर आहे. मुख्य दरवाजाने किल्ल्यात प्रवेश केल्यावर आत असलेल्या दाट झाडीमुळे कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. किल्ल्याचा माथा साधारण ४-५ एकरवर पसरलेला असुन दरवाजाकडील भाग वगळता फिरता येत नसल्याने ५ मिनिटात आपली गडफेरी पुर्ण होते व आपण परतीच्या मार्गाला लागतो. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा किल्ला म्हणजे गोंड राजाचे शस्त्रागार होते. देवगड भागातुन आलेल्या गोंड राजांनी विदर्भातील गोंडवानात प्रवेश करताना जिंकलेल्या किल्ल्यांपैकी हा बारावा किल्ला होता. विदर्भातील हा किल्लाच कोणाला परीचीत नसल्याने किल्ल्याचा इतिहास अबोल आहे पण गोंड राजसत्तेचा या भागावर असलेला प्रभाव पहाता हा किल्ला गोंड राजांनी बांधला असावा असे वाटते. गौंड राजांच्या अखत्यारीतील हा किल्ला आज आपली ओळख हरवुन बसला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!