LASALGAON

TYPE : FORTRESS

DISTRICT : NASHIK

HEIGHT : 0

GRADE : EASY

लासलगाव हे केवळ महाराष्ट्रात,भारतात नव्हे तर तर संपुर्ण आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. कांद्यासाठी हे गाव जितके प्रसिध्द आहे तितकाच या गावाचा इतिहास देखील अंधारात आहे. या गावात एक भुईकोट किल्ला आहे असे सांगताच दुर्गप्रेमी देखील चकित होतात इतका हा किल्ला दुर्लक्षित आहे. या किल्ल्याची कोठेही नोंद येत नसल्याने व आलीच तर गढी म्हणुन येत असल्याने या किल्ल्याची ओळख करून देण्याचा छोटासा प्रयत्न. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेला हा भुईकोट नाशिक शहरापासुन ५६ कि.मी.अंतरावर तर निफाड या तालुक्याच्या ठिकाणापासून २० कि.मी.अंतरावर आहे. लासलगाव शहर शिव नदीच्या काठावर वसलेले असुन कधीकाळी या संपुर्ण गावाला तटबंदी होती. आज हि तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली असुन यातील केवळ दोन बुरुज व त्यातील पश्चिमाभिमुख दरवाजा शिल्लक आहे. कोटाचा हा दरवाजा राम मंदिराजवळ असुन या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या दरवाजापासून साधारण २५० फुट अंतरावर लासलगाव किल्ला उभा आहे. सव्वा एकरवर पसरलेला हा किल्ला आजही सुस्थितीत असुन त्याच्या तटबंदीत एकुण आठ बुरुज आहेत. ... तटबंदीची उंची साधारण ४० फुट असुन याचे खालील २० फुटाचे बांधकाम घडीव दगडात तर वरील २० फुटाचे बांधकाम दगडांनी केलेले आहे. तटबंदीवर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत तर बुरुजावर तोफा ठेवण्यासाठी झरोके आहेत. मुख्य दरवाजा बाहेर नव्याने बांधलेली घरे असल्याने त्याचा दर्शनी भाग झाकोळला गेला आहे. आता हा किल्ला अब्बड कुटुंबियांची खाजगी मालमत्ता असुन किल्ला पहाण्यासाठी परवानगी दिली जाते मात्र छायाचित्र घेण्यास मनाई आहे. पहिला दरवाजा अतिशय सुंदर असुन या दरवाजाची लाकडी दारे वापरात आहे. हा दरवाजा आजही साखळदंड लावुन रात्रीचा बंद केला जातो. कमानीदार असलेल्या या दरवाजाला दिंडी दरवाजा असुन वरील भागात अणकुचीदार खिळे आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर डावीकडे किल्ल्यात जाण्यासाठी दुसरा कमानीदार दरवाजा आहे. याची लाकडी दारे मात्र नष्ट झाली आहेत. हा दरवाजा पार करून आपण आतील चौकात येतो. येथे किल्ल्याच्या मुख्य भागात जाण्यासाठी काटकोनात बांधलेला तिसरा दरवाजा आहे. हा दरवाजा देखील अतिशय सुंदर असुन याच्या लाकडी चौकटीवर खुप मोठ्या प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. पहिल्या दरवाजा प्रमाणे या दरवाजाला देखील दिंडी दरवाजा असुन वरील भागात अणकुचीदार खिळे आहेत. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन वरील भागात सुस्थितीतील किल्ल्यातील मूळ वास्तु आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एकुण तीन दरवाजे असुन यातील पहिला व दुसरा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे व तिसरा दरवाजा उत्तराभिमुख आहे. या तीन दरवाजाच्या भागात म्हणजे मधील दोन टप्प्यात नव्याने बांधलेली घरे असुन येथील मूळ अवशेष पुर्णपणे नष्ट झाले आहेत. तिसऱ्या दरवाजाच्या आत असलेला किल्ल्याचा भाग पुर्णपणे मोकळा असुन यात काही प्रमाणात झाडी वाढलेली आहे. समोरील बाजुस म्हणजे दक्षिणेकडील तटबंदीला लागुन तटावर जाण्यासाठी दोन जिने असुन या जिन्याखाली कोठारे आहेत. फांजीवरून किल्ल्याच्या आतील तटबंदीवर फेरी मारता येते पण काही ठिकाणी झाडी वाढलेली आहे. दक्षिणेकडील बुरुजावर तोफा ठेवण्यासाठी गोलाकार कट्टे बांधलेले आहेत. तटबंदी पाहुन मुख्य दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याभोवती फेरी मारताना दक्षिणेकडील तटबंदीत एक लहान दरवाजा पहायला मिळतो जो आता दगडांनी चिणून बंद केला आहे. तटबंदीला लागुन पत्रे ठोकून या जागेवर कब्जा करण्याचे काम सुरु झाले आहे जे वेळेवर थांबविणे गरजेचे आहे. लासलगावला आज जसे महत्व आहे तसेच महत्व याला मुघलांच्या,मराठ्यांच्या व इंग्रज काळात होते. लासलगाव हे नाव येथे चालणाऱ्या लसणाच्या व्यापारामुळे पडल्याचा उल्लेख पेशवे दप्तरात येतो. लासलगाव च्या उत्तरेला आहिल्याबाई होळकर साम्राज्याची उपराजधानी चांदवड तर दक्षिण बाजुला सरदार विंचुरकरांचे विंचुर संस्थान. मल्हारराव होळकर यांनी थोरल्या बाजीरावांच्या कारकिर्दित आपले शौर्य दाखविल्याने त्यांना इंदोर,चांदवड व इतर सुभे मिळाले. लासलगाव हा मधला पठारी भाग असल्याने मल्हारराव होळकर यांनी बाजारपेठेच्या रक्षणासाठी व येथे सैन्याचा तळ ठेवण्यासाठी भुईकोट किंल्ला बांधुन घेतला. लासलगावच्या फणसे घराण्याचा संस्थापक यशवंतराव फणसे हा एक साधारण पण शूर शिपाई होता. अहिल्यादेवींना शूर जावई हवा असल्याने यशवंतरावांनी चोर-दरोडेखोर यांचा बंदोबस्त केलेल्या पराक्रमाने प्रभावित होऊन त्याची निवड जावई म्हणुन केली. त्यांनी जावई यशवंतराव फणसे यांना कन्यादानात निफाडचा वाडा, लासलगाव किल्ला, जुन्नर या मुलखाची जहागिरी व सोबत चौदाशे चाहुर जमिन दिली.लासलगाव व निफाड प्रांताच्या पाटीलकीच्या वतनासोबत फणसे घराण्याला शिक्षा देणे , कर वसुली, यात्रेचा मान असे अनेक अधिकार लासलगाव व निफाड प्रांतात देण्यात आले. यशवंतरावांच्या अकस्मिक निधनानंतर मुक्ताबाई सती गेल्या. इ.स.१८१८ मध्ये मराठा संत्तेचा अस्त झाल्यावर इंग्रज काळात पाटीलकिचे वतन वंश परांपरागत सरदार फणसेंकडे तसेच ठेवले होते. यशवंतरावांचे पाचवे वंशज गणपतराव रेवजी फणसे यांच्याकडे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार होता. ८ सप्टेंबर १८३५ रोजी इंदूर येथील होळकरांची मुख्य गादी सांभाळणाऱ्या हरीराव महाराजांच्या विरोधात त्यांनी नेमलेल्या फणसे यांच्या सरदाराने बंड केले. होळकर महालात फणशांचे गारदी घुसले पण त्यांचा कट फसला व हरिरावांच्या सैनिकांनी गारद्यांची कत्तल केली. या बंडाचे नेतृत्व करणाऱ्या राजाभाऊ फणसे यांना हरीराव महाराजांचा वारसदार तुकोजीराव यांनी ठार केले. या घटनेमुळे लासलगावच्या किल्ल्याचा कारभार सांभाळणारे त्यांचे बंधू गणपतराव सैरभैर झाले. आपली आता काही धडगत नाही व इंग्रज सरकार या घटनेचा फायदा घेऊन आपल्यावर कारवाई करून आपल्यावर जप्ती आणतील या आशंकेतून गणपतरावांनी लासलगावचा किल्ला एका जैन व्यापाऱ्याला पाच हजार रूपयात विकला. त्यामुळे लासलगावचा किल्ला आज पुर्णपणे खासगी मालकीत आहे. फणसे यांना १९३७ साली लासलगाव व नाशिकचा पाटिलकीचा बिल्ला नाशिकच्या कलेक्टरने दिला होता. भारत स्वतंत्र झाल्यावर सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. १९५२ साली वंशपरांपरागत पाटीलकि रद्द झाल्याने सरदार फणसे यांचीही पाटीलकि रद्द करण्यात आली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!