KORLAI

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 295 FEET

GRADE : EASY

अलिबागच्या दक्षिणेस २४ कि.मी.वर कोर्लईचा किल्ला वसलेला आहे. रेवदंडयाहून कुंडलिका खाडीवरचा पूल पार करून आपण कोर्लईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचतो. कोर्लईचा किल्ला कुलाबा व मुरुडच्या मधे कुंडलिका नदीच्या मुखापाशी बांधला आहे. तीन बाजूंनी समुद्र असलेल्या लहानशा टेकाडावर तो बांधला असून त्याची रचना वैशिष्ठ्यपूर्ण आहे. संपुर्ण किल्ला आठ भागात विभागला असुन त्याला ११ दरवाजे आहेत. दक्षिणेकडे जमीनीच्या एका अरुंद पट्टीने तो मुख्य भूमीला जोडला गेला आहे. या भूशिरावरून लहान वाहने जावू शकतील असा गाडीमार्ग कोरलाई गावातून किल्ल्यापर्यत जातो. निमुळत्या टेकडीवर असलेल्या कोर्लई किल्ल्याची लांबी १ कि.मी. असून रुंदी साधारण १०० फुट आहे व तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. ३०० फुट उंचीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. ... एक दक्षिणेकडून म्हणजे गावाकडून, दुसरा पश्चिमेला असलेल्या लाईट हाऊस मधून, तर तिसरा लाईट हाऊस ओलांडून उत्तरेकडील टोकाकडून किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे, तर पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी आहे. दक्षिण टोकाकडील कोरलाई गावातील कोळीवस्ती संपली की, एक पाऊलवाट दांडाच्या पूर्वेकडून वर चढते. या वाटेने २० ते ३० मिनिटांमध्ये आपण डोंगराच्या माथ्यावरील तटबंदीपर्यंत पोहोचतो. पूर्वेकडे तोंड असलेल्या दोन बुरुजांनी संरक्षित असलेल्या दरवाज्यातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. यातील समुद्राकडे तोंड करून असलेल्या बुरुजाचे नाव आहे सेंट दियागो आणि खाडीकडे असणाऱ्या बुरुजाचे नाव आहे सेंट फ्रांसिस्को. बालेकिल्ल्याच्या या भागात काही अवशेष आपल्याला आढळतात. मुख्य बालेकिल्ल्याच्या खाली पश्चिमेकडे तटबंदी जवळ दारुकोठार आहे तर पश्चिम आणि उत्तर तटबंदीवर काही तोफा ठेवलेल्या आहेत. गडाचा हा सर्वात उंच भाग असुन चारही बाजूने तटबंदीने वेढलेला आहे. या भागामध्ये पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक शिलालेख पडलेला आहे. समोरच्या चर्चची पडझड झालेली इमारत आहे. या पोर्तुगीज बांधणीच्या चर्चच्या मागे असलेल्या तटबंदीमध्ये दरवाजा आहे. तेथून आपण गडाच्या दक्षिण टोकावर जावू शकतो. हे प्रवेशद्वार एका पंचकोनी बुरुजाने संरक्षित केलेले आहे. या टोकावर पोहोचल्यावर आपल्याला पूर्व व पश्चिमेचे दोन्ही किनारे तसेच कोरलाई गावाचे उत्तम दर्शन घडते. हा परिसर पाहून आपण चर्चकडे येतो. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर दारावर एक पोर्तुगिजांचा शिलालेख दिसतो. याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे टाकी आहे. हे पाण्याचे टाकी वरुन पूर्णपणे आच्छादले असून पाणी काढण्यासाठी त्याला झरोके ठेवलेले आहे. बादली व दोरी असल्याशिवाय पाणी काढणे अशक्य आहे. या टाक्यातूनच खालच्या दीपगृहाला पाणी पुरवठा केला जातो. बाजूला छोटेसे महादेव मंदिर असून त्यासमोर दोन वृंदावन आहेत. हा परिसर पाहून पुढे निघाल्यावर डावीकडील तटबंदीमध्ये एक लहान दार आहे. या दारातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या नव्याने केलेल्या असून या मार्गाने आपण दीपगृहात उतरु शकतो. दोन दरवाजे ओलांडून आपण तळामध्ये पोहोचतो. तेथे पश्चिमेकडे दिंडी दरवाजा आहे. तर पूर्वेकडे दर्या दरवाजा आहे. दर्या दरवाजातून बाहेर आल्यावर आपल्याला समोरच धक्का बांधलेला दिसतो. पूर्वी येथेच गलबतांची दुरुस्ती होत असे. तो भाग पाहून आपण पुन्हा आत येतो. येथील तटबंदीमध्ये अनेक खोल्या ओळीने आहेत. या पूर्वी सैनिकांना राहण्यासाठी वापरला जात असत.उजव्या बाजूला असलेल्या बुरुजावर तोफा आहेत. त्याच्या बाजूचे बांधकाम म्हणजे क्रुसाची बातेरी आहे. या वरील क्रुसाचे चिन्ह काळाच्या ओघात नष्ट झाले. दिंडी दरवाजातून बाहेर पडून आपण सागर किनाऱ्याने दीपगृहाकडे जातो. दीपगृहाच्या परिसरातून किल्ल्याची तटबंदीचे दृष्य उत्तमपैकी दिसते. इ.स. १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलईचा अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पोर्तुगीजांनी चौल या रेवदंडा जवळच्या खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या भागात काम सुरु केले. त्यांनी कोर्लाईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का बांधला. जेमेली कॅरेरी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे की निजामाने पोर्तुगीजांना ३०० पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यापैकी एक. इथे एक मजबूत कोट आहे. १५९४ साली पहिला बुऱ्हाण निजाम गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामाने यास नकार दर्शवला आणि स्वतःच एक बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला. ठरले असे की निजामाने किल्ला बांधू नये. आणि पोर्तुगीझांनी काही सागरी उपद्रव देऊ नये. पण दुसऱ्या बुऱ्हाण निजमाने मात्र पोर्तुगीझांणा न जुमानता इथे पक्का किल्ला बांधला एकदा फत्तेखान या सरदाराने रेवदंड्यावर तोफा झाडल्या आणि पोर्तुगीजांना शह देण्याचा प्रयत्न केला. पोर्तुगीझांना कुमक अपुरी पडली, म्हणून त्यांनी आणखी मागवली. आणि प्रत्युत्तर म्हणून कोर्लईवरच हल्ला केला. पोर्तुगीझ गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा एक हत्ती मारला. झालेल्या युद्धात निजामशाही सैन्य पराभूत झाले व १३ सप्टेंबर इ.स. १५९४ रोजी किल्ला पोर्तुगिजांकडे गेला. मात्र गड घेतल्यावर मात्र त्यांना कडक बंदोबस्त करावा लागला. या साऱ्या व्यापामुळे त्यांनी बालेकिल्ला ठेवून बरेचसे बांधकाम पाडले. सन १६०२ मधील एका साधनात आठ हजार लोक व सत्तर तोफा असलेला भक्कम किल्ला असा उल्लेख सापडतो पण हि अतिशयोक्ती असावी कारण इतक्या लहान किल्ल्यावर इतकी माणसे राहणे शक्य नाही व त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोयही आढळत नाही. १६८३ मध्ये संभाजी महाराजांनी कोर्लई घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर सन १७३९ मध्ये चिमाजी अप्पाने सुभानजी मानकरला किल्ल्यावर हल्ला करायला पाठवले. त्याने गडाला वेढा घातला व तो इतका आवळला की पोर्तुगिजांना शरणागती घ्यावी लागली. त्यानंतर मराठ्यांनी हा किल्ला तोफा तयार करण्यासाठी वापरला. मराठ्यांनी सगळ्या बुरूजांना नवीन नावे दिली. सॅन थियागोला पुस्ती बुरूज, सॅन फ्रांसिस्को झेवियरला गणेश बुरूज, सॅन पेड्रोला पश्चिम बुरुज, सॅन इग्नाशियोला ला देवी बुरूज व सॅन फिल्लिपला चौबुरजी बुरूज अशी नावे मिळाली. उरलेल्या दोघांना राम बुरुज व पाण बुरुज अशी नावे दिली गेली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!