KOLVALI KOT

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : PALGHAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. तारापुरजवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला कोलवली कोट हा असाच एक लहानसा कोट. कोलवली कोट वाणगाव रेल्वे स्थानकापासुन ८ कि.मी. अंतरावर असुन खाजगी रिक्षाने कोटापर्यंत जाता येते. वाणगाव-चिंचणी रस्त्यावर कोलवली गावात जाण्यासाठी फाटा असुन कोट स्थानिकांना अपरिचित असल्याने कोटावर जाण्यासाठी हनुमान मंदीर अशी विचारणा करावी. मुख्य रस्त्यापासुन कोट साधारण अर्धा कि.मी.आत गावात आहे. हनुमान मंदिराजवळ पोहोचल्यावर मंदीरामागे झाडाझुडुपांनी वेढलेली कोलवली कोटाची दुमजली वास्तु पहायला मिळते. पोर्तुगीजांनी बांधलेल्या बहुतांशी वास्तु एकसमान व एक आकाराच्या दिसुन येतात. ३० x ३० फुट आकाराची हि दुमजली इमारत आज बऱ्यापैकी शिल्लक आहे. ... या इमारतीच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा वापर केलेला असुन भिंतींना दोन्ही बाजुना चुन्याचा गिलावा केलेला आहे. इमारतीच्या भिंतीत वरील मजल्याचे वासे रोवण्यासाठी खोबण्या केल्या आहेत. वास्तुच्या भिंतीत मोठमोठया खिडक्या तसेच कोनाडे दिसुन येतात. या वास्तुचे स्थान व बांधकाम पहाता हि वास्तु म्हणजे वखार अथवा प्रशासकीय ठिकाण असावे. इमारतीच्या बांधकामात कोणतीही संरक्षण व्यवस्था दिसत नसल्याने येथे कोट असावा असे विधान करता येत नाही. कोटाची सध्याची अवस्था दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. १७३९ च्या वसई मोहिमे दरम्यान हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!