KOHOJ

TYPE : HILL FORT

DISTRICT : PALGHAR

HEIGHT : 1880 FEET

GRADE : MEDIUM

मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या व मुंबईजवळ असलेल्या या उत्तर कोकणात एक दिवसीय भटकंतीसाठी अनेक ठिकाणे आहेत. यातील एका ठिकाण म्हणजे वाडा -मनोर मार्गावर असलेला कोहोज किल्ला. यावर असलेला निसर्गनिर्मित मानवी आकाराचा प्रस्तर हे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. मनोरहुन वाडयाकडे जाताना हा मानवी दगडी पुतळा आपले लक्ष वेधुन घेतो. पुर्वीच्या ठाणे जिल्ह्यात व आता नव्याने झालेल्या पालघर जिल्ह्यात देहरजा व वैतरणा नदीच्या संगमाजवळ गर्द झाडीने वेढलेल्या डोंगरावर कोहोज किल्ला बांधला गेला. कोहोज किल्ल्यास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे पालघर तर मुंबई अहमदाबाद मार्गावरील मनोर हे जवळचे ठिकाण आहे. गडावर असलेल्या शिवमंदिरामुळे महाशिवरात्रीला गडावर मोठी यात्रा भरते. ... या यात्रेला आजुबाजुच्या गावातील गावकरी येत असल्याने गडावर येण्यासाठी नाणे,सांगे,गोऱ्हे व वाघोटे या चार गावातुन वाटा आहेत पण दुर्गभटक्यांकडून प्रामुख्याने वाघोटे व नाणे गावातुन गडावर जाणारी वाट वापरली जाते. मनोर येथील मस्तान नाक्यावरून नाणे व वाघोटे गावात जाण्यासाठी रिक्षा आहेत. मनोरपासुन १० कि.मी.वर असलेले वाघोटे गाव महामार्गावर असुन नाणे हे गाव महामार्गाच्या आतील बाजुस असल्याने बहुतांशी गडप्रेमी वाघोटे येथुन गडावर जाणाऱ्या वाटेचा वापर करतात. पण या वाटेने गेल्यास कोहोज किल्ल्यावरून नाणे गावात आणलेली तोफ आपल्याला पहाता येत नाही. हि तोफ गावकऱ्यांनी नाणे गावातील चौकात एका चौथऱ्यावर ठेवलेली आहे. वाघोटे गावाकडून मनोर-वाडा मार्ग ओलांडुन गडाकडे जाताना वाटेच्या डाव्या बाजुला एक खडकात खोदलेले एक तळे पहायला मिळते. या तळ्याच्या उजव्या बाजुने एक वाट शेताच्या बांधावरून समोरच्या लहान टेकाडावर जाताना दिसते. हे टेकाड पार करून आपण पलीकडे असलेल्या पाण्याच्या बंधाऱ्यावर पोहोचतो. बंधाऱ्याच्या या भिंतीवरूनच किल्ल्यावर जाणारी वाट आहे. गडाच्या वाटेवर पाणी नसल्याने तसेच गडमाथा गाठण्यासाठी साधारण दोन तास लागत असल्याने पाणी इथुनच भरून घ्यावे. या वाटेला आतील बाजूस अनेक वाटा फुटत असल्याने तसेच पावसाळ्यानंतर गवत वाढल्याने वाटा फारशा रुळलेल्या नसतात अशावेळी वाटाड्या घेणे उत्तम. वाटेवर मोठया प्रमाणात झाडी असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही पण काही ठिकाणी उभा चढ असल्याने वाट चांगलीच थकवते. या वाटेने आपण डोंगरसोंडेखाली असलेल्या एका खिंडीत पोहोचतो. नाणे गावातुन येणारी पायवाट याच खिंडीत येते. खिंडीतील सोंडेखालुन डोंगरकाठाने सरळ जाणाऱ्या पायवाटेने आणखी चढाई केल्यानंतर वाटेवर काही उध्वस्त पायऱ्या लागतात. या पायऱ्यांवर डाव्या बाजुला झाडीत एका बुरुजाचे अवशेष व गडाची उध्वस्त तटबंदी दिसुन येते. या ठिकाणी गडाचा पहिला दरवाजा असावा. या उध्वस्त तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. या वाटेने अजुन थोडा चढ चढल्यावर आपण मोकळ्या पठारावर येऊन पोहोचतो व पुर्वाभिमुख भग्न दरवाजातुन आपला गडावर प्रवेश होतो. पठारावर प्रवेश करण्यापुर्वी खालुन वरील बाजुस एक बुरुज व डाव्या बाजुला रचीव तटबंदी दिसुन येते. या ठिकाणी गडाचा दुसरा दरवाजा असावा. पायथ्यापासुन या पठारावर येईपर्यंत साधारण दीड तास लागतात. कोहोजगडाची समुद्रसपाटीपासुन उंची १७७० फुट असुन गड माची व बालेकिल्ला अशा दोन भागात विभागलेला आहे. गडाची माची म्हणजे एक प्रशस्त पठार आहे. संपुर्ण गडाचा परीसर साधारण ६० एकर असुन गडाची माची व बालेकिल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. आपण माचीवर प्रवेश केलेल्या ठिकाणी डाव्या बाजुला एका वाड्याचे अवशेष असुन या वाडयाच्या तटबंदीत चार बुरुज व अंतर्भागात तीन वास्तुंची जोती दिसतात. येथुन समोर असलेल्या बालेकिल्ल्याच्या टोकावरील भागाची तटबंदी दिसुन येते. या वाटेने सरळ गेल्यावर समोरच दगडी चौथऱ्यावर नव्याने बांधलेले लहानसे शिवमंदीर आहे. कुसुमेश्वर नावाने ओळखले जाणाऱ्या या मंदिराच्या मागील भिंतीवर कोहोजाई देवीची मुर्ती स्थापन केलेली आहे. मंदिरासमोर एका झाडाखाली शेंदुर फासलेल्या काही भग्न मुर्ती व एक पावले कोरलेला समाधी दगड दिसतो. मंदिराच्या उजव्या बाजूस सपाटीवर कातळात कोरलेली पाण्याची दोन मोठी टाकी असुन वापरात नसल्याने यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्याशेजारी ढिगाऱ्यात रुपांतर झालेले वास्तु अवशेष दिसतात. मंदिरामागे काही अंतरावर शेंदुर फासलेले एक व्यालशिल्प दिसुन येते. व्यालशिल्प पाहुन मंदिराकडे परतल्यावर मंदिरा समोरून डाव्या बाजुच्या वाटेने माचीच्या टोकावर गेले असता तिथे खडकात खोदलेली सात जोडटाकी असुन त्यातील एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गडावर मुक्काम करण्यायोग्य वास्तु नसल्याने वेळ पडल्यास या टाक्यांशेजारील सपाटीवर तळ ठोकता येतो. पठारावर मोठया प्रमाणात असलेले अवशेष पहाता या भागात मोठया प्रमाणात वस्ती असावी. टाकी पाहुन मंदीराकडे परत आल्यावर उजवीकडील वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते. मंदिराकडून बालेकिल्ल्याची तटबंदी व बुरुज तसेच दोन बुरुजात बांधलेला दरवाजा पहाता येतो. या वाटेने थोडा चढ चढुन आपण बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूस बांधलेल्या बुरुजाशेजारून गडात प्रवेश करतो. या ठिकाणी असलेला बालेकिल्ल्याचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. बुरुजाच्या माथ्यावर एक लहानशी देवडी असुन तिच्यात भग्न हनुमान मुर्ती ठेवलेली आहे. बालेकिल्ल्याचा हा खालील टप्पा डाव्या बाजुस तटबंदीने बंदिस्त केला असून उजव्या बाजुस गडाच्या डोंगरातील खडकात तीन खांबटाकी कोरलेली आहेत. या टाक्यावरून किल्ला प्राचीन असल्याची जाणीव होते. यातील पहिली दोन टाकी खराब झाली असुन तिसऱ्या टाक्यातील पाणी मात्र थंडगार व चवदार आहे. टाक्या पाहुन पुढे कातळात कोरलेल्या लहान पायऱ्यांनी आपण बालेकिल्ल्याच्या वरील दरवाजात पोहोचतो. बालेकिल्ल्याचा पश्चिमाभिमुख दरवाजा दोन बुरुजांमध्ये बांधलेला असुन दरवाजाच्या पुढील भागात असलेल्या पायऱ्या व दरवाजाची कमान आजही शिल्लक आहे. दरवाजाच्या आतील बाजूस असलेल्या पहारेकऱ्याच्या देवडीत भलामोठा दगड कोसळला आहे. दरवाजाशेजारील बुरुजावर उभे राहीले असता समोर डोंगर उतारावर कातळात कोरलेले भलेमोठे टाके दिसते. या टाक्याकडे जाण्यासाठी तटबंदीला लागुन कातळात खोदलेल्या पायऱ्या असुन वरील बाजुने देखील या टाक्याकडे जाता येते पण सध्या हे टाके कोरडे ठणठणीत आहे. बालेकिल्ल्याच्या वरच्या भागात जाताना डावीकडे एक लहान घुमटी असुन त्यात मारूतीची मुर्ती ठेवली आहे. बालेकिल्ल्याच्या मध्यभागी दोन सुळके असून या घुमटीकडून एक वाट उजवीकडे तर एक वाट डावीकडे जाते. आपण डावीकडील वाटेने जाऊन उजवीकडील वाटेने खाली उतरल्यास नीटपणे किल्ला पहाता येतो. डावीकडील वाट आपल्याला किल्ल्याच्या उत्तर टोकावर नेते. किल्ल्याच्या या बुरुजावरून उत्तरेला गंभीरगड व सुर्या नदीचे खोरे, वायव्येला अशेरीगड, पश्चिमेला काळदुर्ग, नैॠत्येला तांदुळवाडी किल्ला, दक्षिणेला टकमक गड तर आग्नेयेला माहुली दिसतो. बालेकिल्ल्याचा उत्तर भाग पाहुन सुळक्याखालून किल्ल्याच्या दक्षिण टोकावर जाताना उजव्या बाजूस डोंगर उतारावर कोरलेले भलेमोठे टाके दिसते. दरवाजाच्या बुरुजावरून हेच टाके आपण पाहिलेले असते. किल्ल्याच्या दक्षिण टोकावर आल्यावर दुसऱ्या सुळक्याचा निसर्गनिर्मित मानवाकार पहायला मिळते. काळ्या पाषाणाच्या मानवी देहासारख्या आकाराच्या गोल दगडामुळे म्हणजेच डोक्यामुळे या कातळाला शिल्पाचे रूप प्राप्त झाले आहे. गडाच्या दक्षिण टोकावर नव्याने बांधलेले लहानसे मंदिर असुन या मंदिरात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवलेली आहे. मंदिराच्या थोडं पुढे आल्यावर खालील बाजूस मोठमोठ्या शिळा एकमेकांवर रचुन ठेवल्यासारख्या दिसतात. समोरच किल्ल्याला चिटकुन असणारा सुळका नागनाथ लिंगी म्हणुन ओळखला जातो पण तिथे जाण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. इथे आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण माची व किल्ला पहाण्यास दिड तास पुरेसा होतो. इथुन डावीकडील वाटेने बालेकिल्ला उतरायला सुरुवात करायची. किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नसला तरी गडावरील खोदीव खांबटाकी पहाता गड प्राचीन असल्याचे दिसुन येते. १६ व्या शतकाच्या सुरुवातीला गुजरातच्या सुलतानाकडून पोर्तुगीजांनी हा प्रदेश ताब्यात घेतला व किल्ल्याची दुरुस्ती केली. पुढे १६५७ च्या दरम्यान शिवरायांनी कोहोजगड जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. पुरंदरच्या तहानुसार शिवरायांनी मोगलांना जे २३ किल्ले दिले त्याच्या काही यादीत कोहोजगडाचा उल्लेख येतो. यानंतर ११ जून १६७० रोजी मराठय़ांनी हा गड परत जिंकून स्वराज्यात आणला. संभाजीराजांच्या कारकीर्दीत मोगलांचा मनसबदार व जव्हारचा जमीनदार विक्रम पतंगराव याने ७ एप्रिल १६८८ रोजी कोहोजगडाचा ताबा घेतला. पुढे १७३७ मध्ये पोर्तुगीजांच्या विरुध्द काढलेल्या वसई मोहिमेत हा संपुर्ण प्रदेश मराठयांच्या ताब्यात आला. त्यानंतर १८१८मध्ये इतर किल्ल्याप्रमाणे हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!