KHAROSA

TYPE : GADHI

DISTRICT : LATUR

HEIGHT : 0

GRADE : EASY

किल्ले फिरताना माझ्या मनात नेहमीच एक विचार यायचा कि आज आपण पाहतो ती शहरे इतिहासकाळात कशी दिसत असतील. त्यांची रचना व त्या नगरातील घरे कशी असतील. आपल्याला त्या मध्ययुगीन काळात जाता आले तर किती बरे होईल आणि मनातील इच्छा अचानकपणे पूर्ण झाली. नाही म्हणजे मला इतिहासकाळात जाता आले नाही पण अचानकपणे मध्ययुगीन काळातील रचना व वास्तु असलेले शहर मात्र पहायला मिळाले. उदगीरचा किल्ला पाहुन औसा किल्ला पहायला जाताना खरोसा येथील चौबुर्जी गढीवजा किल्ला पाहण्याचा योग आला व मनातील इच्छा पूर्ण झाली. उदगीरहुन निलंगा मार्गे औसा किल्ल्याला जाताना निलंगापासुन १० कि.मी. वर खरोसा हे मध्ययुगीन काळाच्या आधीपासुन अस्तीत्वात असलेले प्राचीन नगर आहे. गावामागील डोंगरावर असलेली प्राचीन हिंदु लेणी या गोष्टीची साक्ष देतात. लातूर जिल्यातील औसा तालुक्यात असलेले हे गाव लातूरपासून ४२ कि.मी.वर तर औसा शहरापासुन २२ कि.मी. अंतरावर आहे. ... गावात असलेल्या सहाव्या शतकातील कोरीव लेण्यामुळे हे गाव प्रसिध्द असले तरी गावात असलेला गढीवजा किल्ला काही अपवाद वगळता अगदी स्थानिकानाही माहित नाही. गावात जाणाऱ्या रस्त्यावर या गढीची चौकशी केली असता गावकरी पर्यटक म्हणुन खरोसा लेण्याकडे जाण्याचा मार्ग दाखवतात पण त्यांच्या भाषेत म्हणजे जुना पडका वाडा, बुरुज अशी विचारणा केल्यावर त्यांना या गढीची ओळख पटते व ते या गढीत काहीच नसुन तेथे न जाण्याचा सल्ला देखील देतात. मात्र दुर्गप्रेमींनी न चुकता पहावी अशीच हि गढी आहे. गावकरी या गढीला बामनाची गढी, कुलकर्ण्यांची गढी म्हणुन ओळखत असले तरी हि दासगाव नृसिंह पाटील घराण्याची गढी आहे. १९९३ साली झालेल्या प्रलयकारी किल्लारी भूकंपाच्या पडझडीनंतर ८० टक्के खरोसा गाव त्याच्या गावकुसातुन बाहेरील बाजूस स्थलांतरित झाले व गावकुसाच्या आतील पडझड झालेल्या वास्तु आहे त्या स्थितीतच राहिल्या. १९९३ पर्यंत सिमेंटच्या जंगलाचे वारे मोठया प्रमाणात वाहत नसल्याने हे गाव त्याच्या मध्ययुगीन रचनेप्रमाणेच वसले होते व बाहेर नवीन सरकारी घरे बांधुन मिळाल्याने बांधकामाच्या सामानासाठी या वास्तुंची तोडफोड झाली नाही. त्यामुळे आजही तटबंदीच्या आत वसलेले हे गाव त्याच्या मूळ रुपात पहायला मिळते. कधी एकेकाळी या गावाभोवती १०-१२ फुट उंच तटबंदी व या तटबंदीत चार दरवाजे होते. आज हि तटबंदी मोठया प्रमाणात नष्ट झाली असुन या तटबंदीतील एक दरवाजा त्याच्या कमानीसह तग धरून आहे. नवीन खरोसा गावातुन जुन्या गावात असलेल्या या गढीकडे जाताना नगरकोटाच्या या दरवाजातून आपला गावात प्रवेश होतो व आपण मध्ययुगीन काळात पोहोचतो. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याची देवडी असुन उजव्या बाजूस एका चौथऱ्यावर वेशीवरील मारुतीचे मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात काही प्राचीन शिल्प पहायला मिळतात. येथुन एका वेळी दोन बैलगाडी जाऊ शकतील अशा वळणावळणाच्या रस्त्याने बरीचशी अंगणे, जुनी घरे व काही वाडे पार करत आपण गढीपर्यंत पोहोचतो. वाटेत असलेली सुंदर घरे,पांढऱ्या मातीचे बुरुज, अप्रतिम दगडी बांधकाम असलेले वाडे, घरांचे व वाड्यांचे सागवानी लाकडाचे सुबक नक्षीकाम केलेले मोठमोठे दरवाजे पाहून मनं भूतकाळात जाते. हे वाडे व घरे आतुन फिरताना त्यात असलेली भूमिगत कोठारे, बळद, जमिनीखाली अंतर्गत जोडलेले भुयारी मार्ग हे सर्व पहाता येते. गावाच्या एका कोपऱ्यात असलेल्या या गढीच्या आसपास सुंदर दगडी बांधकाम असलेल्या उध्वस्त वास्तुंचे दरवाजे पहायला मिळतात. या बांधकामावर मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने दरवाजापर्यंत जाता येत नाही. हि झाडी इतक्या मोठया प्रमाणात वाढली आहे कि गढीत जाणारी वाट व गढीचा दरवाजा देखील त्यात लपून गेला आहे. गढीच्या तटबंदीची उंची साधारण २० फुट असुन तटबंदीच्या चार टोकाला चार बुरुज आहेत. गढीच्या तळाशी असलेले सात ते आठ फुट उंचीचे तटाबुरुजांचे बांधकाम ओबडधोबड दगडांनी केलेले असुन वरील बांधकाम पांढऱ्या चिकण मातीने केलेले आहे. झाडीमधून वाट काढत गेल्यावर जमीनीपासून काहीशा उंचीवर असलेला गढीचा लहानसा पुर्वाभिमुख दरवाजा दिसतो. या दरवाजातुन आत आल्यावर गढीच्या आतील बाजूस देखील मोठया प्रमाणात झाडी वाढलेली दिसते. गढीच्या आतील बाजुने तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या असुन या पायऱ्या अर्धवट कोसळल्याने तटावर जाण्यासाठी दुसऱ्या बुरुजाला लागुन एक शिडी ठेवलेली आहे. सध्या या बुरुजावर नव्याने पीराचे स्थान बनवलेले आहे. गढीचा आतील परीसर पाव एकरचा असुन आतील सर्व वास्तुंची पडझड होऊन केवळ भिंती शिल्लक आहेत. गढीच्या आत असलेल्या वाडयाच्या चौथऱ्यावर सिमेंटमध्ये नव्याने बांधलेली एक वास्तु आहे पण भूकंपानंतर हि वास्तु देखील ओस पडली आहे. गढीत एक विहिर व तुळशी वृंदावन असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले पण गढीत वाढलेले प्रचंड गवत व काटेरी झुडपांमुळे फिरता येत नसल्याने इतर अवशेष पहाता येत नाही व आपली आतील गडफेरी आटोपती घ्यावी लागते. गढीला बाहेरून फेरी मारताना गढीला लागुन असलेल्या दोन वाड्यात भुयारे दिसुन येतात. हि भुयारे तटाखालुन गढीच्या आत जात असल्याचे सांगण्यात येते पण पुरेशा सुरक्षेअभावी या भुयारात शिरणे धोक्याचे आहे. या गढीत खरोसा व आसपासच्या गावांचा महसुल जमा होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. संपुर्ण गढी व गाव पहाण्यास दोन तास पुरेसे होतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!