KHARDA

TYPE : GROUND FORT

DISTRICT : NAGAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

खर्डा हे अहमदनगर जिल्हातील जामखेड तालुक्यातील गाव येथे झालेल्या मराठा आणि निजाम यांच्या ऐतिहासीक युद्धामुळे प्रसिध्द आहे. याच खर्डा गावात असणारा हा किल्ला भुईकोट असून आजही चांगल्या स्थितीत आहे. खर्डा गावाच्या बाजूला असलेला हा किल्ला निंबाळकर यांनी बांधला असुन सुलतानराजे निंबाळकर हे या किल्ल्याचे शेवटचे शासक होते. सध्या पुरातत्त्व खात्याने या किल्ल्यावर दुरुस्तीचे काम केलेले असुन या दरवाजाला लोखंडी गेट लावण्यात आले आहे. येथे ठेवण्यात आलेला रखवालदार स्थानीक असुन तो टाळे लावुन गावात फिरत असल्याने आलेल्या पर्यटकांना व गडप्रेमीना त्याला गावातुन शोधुन आणण्यात उगीचच दीड-दोन तास वाया जातात. जामखेड तालुक्यातील शिर्डी-हैदराबाद महामार्गाने नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला खर्डा उर्फ शिवपट्टण उर्फ सुलतानगड भुईकोट किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. चौकोनी आकाराचा हा किल्ला तीन एकरमध्ये पसरलेला असुन रस्त्याच्या बाजुने पश्चिम दिशेला असणारे किल्ल्याचे उत्तराभिमुख प्रवेशद्वार सहजपणे दिसुन येत नाही. ... रणमंडळ, किल्ला, रेवणी व खंदक अशी रचना असणाऱ्या या भुईकोटाच्या मुख्य तटबंदीत चार टोकाला चार, दरवाजाशेजारी दोन व रणमंडळात एक असे सात बुरूज आहेत. संपुर्ण किल्ल्याभोवती खंदक असुन दरवाजाच्या बाजुने असलेला खंदक बुजवल्याने गाडी किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जाते. शत्रुला थेट किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला भिडता येऊ नये यासाठी मुख्य दरवाजासमोर आडवी तटबंदी घालुन त्या तटबंदीत एक बुरूज व दुसरा दरवाजा बांधुन रणमंडळाची रचना केली आहे. हा दरवाजा देखील दोन बुरुजांमध्ये संरक्षित झाला आहे. हे बांधकाम मुख्य किल्ला बांधल्यानंतरच्या काळात झाले असावे. या दरवाजावर एक पर्शियन शिलालेख आहे. पहील्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजवीकडे गडाचा साधारण तिस-चाळीस फुट उंचीचा मुख्य दरवाजा असुन या दरवाज्यावर मराठीतील एक शिलालेख आहे. या शिलालेखानुसार हा किल्ला १७४३ मध्ये सरदार सुलतानराव निंबाळकर यांनी बांधला. किल्ल्याचा एकही लाकडी दरवाजा आज शिल्लक नाही. दरवाजासमोरील रणमंडळाच्या दोन बाजुना ओवऱ्या बांधलेल्या असुन येथे बाहेरील तटावर चढण्यास पायऱ्या दिसुन येतात. किल्ल्याचा दुसरा दरवाजा व त्याच्या आतील भागातील बांधकाम आजही सुस्थितीत असुन या दरवाजाच्या आतील भागात घुमटाकृती बांधकाम व किल्ल्याच्या अंतर्गत भागात जाण्यास तिसरा दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील भागात पहारेकऱ्याच्या देवड्या असुन त्यातील एका देवडीत असलेल्या पायऱ्यांनी किल्ल्याच्या दरवाजावरील भागात जाता येते. दरवाजातुन आत प्रवेश केल्यावर संपुर्ण किल्ला व त्यातील मोकळे मैदान दिसते. किल्ल्यावरील वास्तूची पडझड झाली असुन सर्व अवशेष नामशेष झाले आहेत. दरवाजाच्या आत उजवीकडे तटबंदीवर जाण्यासाठी जिना असुन यावर चढून किल्ल्याच्या पुर्ण तटबंदीला फेरफटका मारता येतो. तटावर ये-जा करण्यासाठी तटबंदीमध्ये ठिकठिकाणी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरून फिरताना खंदक व रेवणी यांच्यात असणाऱ्या परकोटात ढासळलेले लहान आठ बुरूज व तटबंदी आजही काही प्रमाणात पहायला मिळतात. उरलेले बुरूज मात्र पुर्णपणे नष्ट झाले आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एका ढासळलेल्या वाड्याचे अवशेष असुन त्यात मातीखाली गाडलेल्या ओवऱ्या दिसतात. किल्ल्याच्या पुर्व बाजुला तटबंदीकडे सुस्थितीत एक इमारत असुन त्यावर जामा मशीद असा उल्लेख असणारा पर्शियन शिलालेख आहे. या इमारतीशेजारी एका फुटलेल्या तोफेचा मागील भाग पहायला मिळतो. मशीद आणि तटबंदी यांच्यामध्ये स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेली दगडाने बांधलेली चिरेबंदी व सुस्थितीत असलेली बारव पहायला मिळते. हि बारव किल्ल्यातील पाण्याचा एकमेव स्त्रोत असुन सध्या याच विहीरीतून किल्ल्याच्या दुरूस्ती कामासाठी पाणी उपसा होत आहे. गोलाकार आकाराच्या १०० फुटापेक्षा जास्त खोल असणाऱ्या या विहिरीच्या वरील बाजुस पाणी उपसा करण्यासाठी दगडी मोट असुन पाणी जास्त खोल गेल्यास विहीरीत उतरण्यासाठी दुसऱ्या बाजुने विहीरीच्या मध्यापर्यंत दगडी जिना आहे. साधारण ४० पायऱ्या उतरल्यावर विहिरीच्या आतील बाजुस ५x५ आकाराची खोली असुन तिला विहिरीच्या बाजूने कमान आहे. किल्ल्याच्या दक्षिण तटबंदीत संकटकाळी किल्ल्यातुन बाहेर पडण्यास एक लहानसा दरवाजा आहे पण तो सध्या दगडांनी बंद केलेला आहे. याशिवाय किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजुच्या बांधकामात दोन कोठारे पहायला मिळतात. त्यात शिरण्यासाठी किल्ल्याच्या आतील बाजुनी दरवाजे आहेत. संपुर्ण किल्ला पहाण्यास एक तास पुरेसा होतो. याशिवाय खर्डा गावात निंबाळकर गढी, बारा प्रति ज्योतिलिंग मंदिरे व ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात निंबाळकरांची समाधी पहाता येते. खर्डा हे खर्ड्याची लढाई या ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध आहे. हैदराबादचा निजाम व मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी हि लढाई झाली. या लढाईत मराठ्यांच्या फौजांनी हैदराबादच्या निजामाचा पराभव केला. दौलतराव शिंदे यांची सेना पुणे येथे असताना मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्यासाठी नाना फडणवीस यांनी हैदराबादच्या निजामावर लक्ष केंद्रीत केले व त्याच्याकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली. निजामाचा मंत्री मुशीरमुल्कने ही मागणी फेटाळून लावत भोसल्याचा वऱ्हाडातील महसुलही नाकारला. परिणामी पेशवे, दौलतराव शिंदे, तुकोजी होळकर आणि दुसरा रघुजी भोसले यांच्या फौजांनी मार्च १७९५ मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले. मराठ्यांनी निजामावर आक्रमण केल्यावर निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली परंतु ब्रिटिशांनी मदत नाकारली आणि खर्डा येथे ही निर्णायक लढाई झाली. मराठ्यांशी उघड्या मैदानावर तोंड देण्याचे टाळत निजामाने खर्डा किल्ल्याचा आश्रय घेतला. मराठ्यांनी खर्ड्याच्या किल्ल्याला वेढा दिला आणि किल्ल्याला होणारी रसद थांबवून तटबंदीभोवती तोफा रचल्या. शेवटी निजामाने १३ मार्च १७९५ रोजी तह करुन लढाईतून माघार घेतली. या तहानुसार निजामाने मराठ्यांना पाच कोटी रूपये थकलेल्या चौथाई आणि युद्धखंडणीपोटी देण्याचे मान्य केले तसेच स्वत:च्या ताब्यातील एक तृतीयांश प्रदेश मराठ्यांच्या स्वाधीन केला व दौलताबादचा किल्ला व त्याचा प्रदेश पेशव्याना देण्यात आला याशिवाय वऱ्हाडचा प्रदेश महसूलासहित नागपूरच्या भोसल्याना देण्यात आला. या लढाईत मालोजी घोरपडे, दौलतराव शिंदे, सवाई माधवराव पेशवे नागपूरचे रघुजीराजे भोसले आणि खर्डा येथील जहागीरदार सरदार सुलतानराजे निंबाळकर’ यांनी पराक्रम गाजविला आणि निजामाला धूळ चारली. निजामाकडून जबर खंडणी तसेच बिदर प्रांतातील महसुलाचा वाटा देण्याचे मान्य होताच निजाम आणि मराठे यांच्यात तह झाला. हिंदवी स्वराज्यातील हि शेवटची लढाई इतिहासात महत्त्वपूर्ण अशीच आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!