KHANOT

TYPE: FORTRESS

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने केवळ त्यांच्या घराण्याचे व वंशजांचेच नव्हे तर त्यांच्या भोसले घराण्यातील इतर भाऊबंद यांचे नाव देखील तितक्याच मानाने घेतले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील इतर भाऊबंद व त्यांची ठिकाणे या विषयीची उत्सुकता आजही शिवप्रेमींच्या मनात असते. चला तर आज मग जाणुन घेऊया शहाजीराजे भोसलेंचे बंधू व छत्रपती शिवाजी महाराज यांचे काका शरीफराजे भोसले यांचे घराणे व ठिकाण या विषयी. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खानोट या गावी शरीफराजे भोसले यांची गढी आहे. खानोट गाव हे दौंड पासुन ३५ कि.मी.अंतरावर तर सोलापूर महामार्गावरील भिगवण गावापासून ८ कि.मी अंतरावर आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामुळे मूळ खानोट गाव विस्थापित झाले असुन ते काहीसे वरच्या बाजुस सरकलेले आहे. गावात कोणालाही राजे भोसले यांचा जुना वाडा विचारले असता ते या गढी जवळ आणुन सोडतात. अगदी अलीकडील काळापर्यंत सुस्थितीत असलेल्या या गढीची गावच विस्थापित झाल्याने आता पार दुरावस्था झालेली आहे. चौकोनी आकाराची हि गढी साधारण अर्धा एकरवर पसरलेली असुन बाहेरील बाजूची दगडी तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. ... हि तटबंदी साधारण वीस फुट उंच आहे. गढीचा दरवाजा आजही सुस्थितीत असला तरी आतील बाजुस मोठ्या प्रमाणात काटेरी झुडुपे वाढलेली आहेत. दरवाजासमोरील ५-६ पायऱ्या चढुन व दरवाजा उघडून आत शिरले असता समोरच वाड्याचे जोते व चौक आहे. आतमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन चौकात वाढलेल्या काटेरी झुडूपांमुळे पुढे सरकता येत नसल्याने येथुनच मागे फिरावे लागते. गढीशेजारी अजून एक मोठे दगडी प्रवेशद्वार असुन त्याशेजारी काही अंतरावर दुसरा लहान दगडी दरवाजा आहे पण याच्या शेजारी असलेल्या भिंती मात्र शिल्लक नाहीत. हे एकुण अवशेष पहाता गढीशेजारी अजुन एक वाडा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गढीच्या मागील बाजुस नव्याने बांधलेले महादेवाचे मंदीर असुन या मंदीरा बाहेरील चौथऱ्यावर असलेला भव्य नंदी पहाता पुर्वी येथे भव्य शिवमंदीर असावे. या मंदीराच्या आवारात आपल्याला गजलक्ष्मी, चार विरगळ, एक सतीशिळा व इतर काही मुर्ती तसेच भग्न शिल्प पहायला मिळतात. या मंदीराच्या आवारात चार दगडी चाके ठेवलेली आहेत. शिल्लक असलेला गढीचा भाग व आसपासचा परिसर पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या पराक्रमाने निजामशाही दरबारातील एक महत्वाचे सरदार बनले. मालोजीराजे भोसले यांना शहाजी व शरीफजी असे दोन पुत्र झाले. मालोजीराजांच्या मृत्युनंतर निजामशाहने शहाजी व शरीफजी या मालोजींच्या दोन्ही पुत्रांकडे त्यांच्या वडिलांची जहागिरी कायम ठेवली. चुलते विठोजीराजे यांनी राज्यकारभार हाती घेऊन शहाजी व शरीफजी या दोघांना वाढविले. तीन वर्षांचे असतानाच त्यांना पंचहजारी मनसबदारी मिळाली. शरीफजीं यांनी विठोजीराजां सोबत निजामशाहीची सेवा केली. शरीफजी यांचा जुन्नर येथील विश्वासराव यांच्या दुर्गाबाई या मुलीशी विवाह झाला. १६२४ मध्ये झालेल्या भातवडीच्या लढाईत शरीफजी धारातीर्थी पडले. शरीफजींच्या खानोटा येथील वंशावळीत त्यांचे पुत्र त्र्यंबकजी, त्यांचे पुत्र व्यंकोजी नंतर माणकोजी व त्यानंतर शहाजी (दुसरे) असा क्रम येतो. शहाजी (दुसरे) यांना माणकोजी, संभाजी, मालोजी व स्वरूपजी असे चार पुत्र. यांतील माणकोजी हे करवीरकरांकडे दत्तक गेले तर त्यांचे वडील शहाजीराजे (दुसरे) हे खानवटकर राजे भोसले म्हणून प्रसिद्ध झाले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!