KHANDRAGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : JALGAON

HEIGHT : 1080 FEET

GRADE : MEDIUM

जळगाव जिल्ह्य़ात गडकोट तसे कमीच. जे आहेत ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आणि भुईकोट. पण याच जळगावात म्हणजे पुर्वीच्या खानदेशात खांडरागड नावाचे एक अतिप्राचीन स्थळ असल्याचे उल्लेख अनेक कागदपत्रात येतात. चोपडय़ापासुन २६ कि.मी.तर लासुरपासुन दहा कि.मी.अंतरावर असलेले अतीप्राचीन खांडरागड म्हणजे आवर्जून पाहाण्यासारखा नितांत सुंदर असा डोंगरी किल्ला आहे. किल्ल्यावर प्राचीन अवशेष मोठया प्रमाणात असुन महत्वाचे म्हणजे हा किल्ला लेणी स्थापत्याची सुरूवात झाल्याच्या काळातील आहे आणि म्हणुनच या गडाला अतिप्राचीन म्हटले जाते. महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमारेषेवर आदिवासी बहुल भागात अनेर नदी S आकाराचे वळण घेते. या नदीच्या काठावर असणाऱ्या डोंगरावर हा गड उभा आहे. गडाच्या परिसरात असणाऱ्या सत्रासेन या गावामुळे परिसरातील लोक या किल्ल्याला सत्रासेनचा किल्ला म्हणुन ओळखतात पण गडाच्या पायथ्याशी असणारी लोक मात्र या किल्ल्याला खंडरागड म्हणतात. ... आजही कोणत्याही नकाशात नसलेला अन काळाच्या ओघात आपले नाव व इतिहास हरवुन बसलेला हा किल्ला त्यावरील लेण्यांचे पडीक अवशेष म्हणजेच येथुन जवळच असणाऱ्या मध्य प्रदेशातील हिंदी भाषेत खंडहर व त्याचा अपभ्रंश म्हणजे खंडर+गड म्हणुन ओळख पावला आहे. प्राचीन काळापासून दक्षिणेतून मध्यप्रदेशात जाणाऱ्या भिराम घाट या डोंगरी भागावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती केली गेली असावी. इथुन काही अंतरावर असणारा त्रिवेणीगड या गडाला समांतर असुन उत्तर-मध्य प्रांतातून दक्षिणेतील सुरत, भडोच बंदरातून भारताबाहेर निर्यात होणाऱ्या मालासाठी चौगाव ही बाजारपेठ असल्याने त्रिवेणीगड व खंडरागड हे दोनही किल्ले महत्वाचे होते. असा हा प्राचीन काळाशी धागेदोरे जोडणारा खंडरागड समुद्रसपाटीपासून २२०० फुट उंचीवर तर पायथ्यापासुन ८०० फुट उंचीवर उभा आहे. सत्रासेन गावापासून पश्चिमेला असणाऱ्या सातपुडा डोंगररांगेत विराजमान झालेल्या या गडाचे एकुण क्षेत्रफळ ७ एकर असुन गडाची लांबी ९०० फुट तर रुंदी ३०० फुट आहे. खंडरागडास भेट देण्यासाठी जळगावहून चोपडा मार्गे किल्ल्याजवळच्या सत्रासेन गावात यावे किंवा अंमळनेर-लासूरमार्गे सत्रासेन गाठावे. लासूरपासून सत्रासेन फक्त १० कि.मी. अंतरावर आहे. खंडरागडाचा पायथा सत्रासेन गावापासुन २ कि.मी. अंतरावर असुन गावातून एक कच्चा रस्ता गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अनेर नदीकाठी येतो. गाडी येथेच ठेऊन नदी पार करून २० मिनिटात आपण गडाच्या पायथ्याशी येतो. भर पावसाळयात नदी पार करणे शक्य नसल्याने पावसाळयात या गडाला भेट देणे टाळावे. गडावर जाताना वाटेत भवानीचे छोटेसे मंदिर व कबर तसेच गडाच्या अलीकडील एका लहानशा टेकाडावर दोन कबर दिसून येतात. किल्ला व आसपासचा परिसर हिरवाईने नटलेला असुन गडाखाली भिल्ल समाजाची लहानशी वाडी आहे. मंदिरापासुन पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण गडाच्या वाटेला लागतो. गडाचा दरवाजा अथवा कमान काहीही शिल्लक नसुन थोडीफार तटबंदी दिसते व आपला थेट गडातच प्रवेश होतो. गडात प्रवेश करण्यापुर्वी त्याच वाटेने थोडेसे पुढे गेल्यास एक मातीत बुजलेले पाण्याचे छोटे टाके दिसते. या टाक्याच्या पुढे एक निसर्गनवल दिसून येते. या ठिकाणी दगडांनी अर्धवट तोंड बुजलेली जमिनीच्या पोटात उतरत जाणारी साधारण दीडशे फुट लांब नैसर्गिक गुहा असुन स्थानिक लोक या गुहेला भुयार म्हणुन ओळखतात. मी जवळपास चाळीस फुट आत उतरलो होतो पण आत वटवाघुळे मोठया प्रमाणात असल्याने मागे फिरावे लागले. किल्ला उंचीने जरी कमी असला तरी उभा चढ असल्याने बराच थकवणारा आहे. याचा वरील कातळटप्पा सभोवताली तासलेला असुन पायथ्यापासुन चालायला सुरुवात केल्यानंतर साधारण तासाभरात आपण गडात प्रवेश करतो. किल्ल्याचा माथा झाडीनी भरलेला समोरच एक मातीने भरलेला एक कोरडा तलाव दिसतो. या तलावात ३० x ५० फुट आकाराचे चार दगडी खांबावर तोललेले एक लेणे असुन प्राथमिक अवस्थेतील या लेण्यात ओबडधोबड कारीगिरी दिसून येते. तलाव पार करून उजव्या हाताने पुढे गेल्यावर एका बुरूजाचे अवशेष व गडावर येणारी वाट नजरेस पडते. समोरील झाडीमध्ये घरांचे अवशेष लपल्याचे नजरेस पडते. हा परिसर झाडीने व्यापलेला असुन आतील वास्तू दिसत नाहीत. येथुन पुढे आल्यावर निशाणाच्या झेंड्याची जागा व एक झोपडीवजा मंदिर पहायला मिळते. येथे मुर्ती नसुन देव म्हणुन एक कोरीव दगड ठेवलेला आहे. मंदिराच्या पुढे पावसाळी पाण्यासाठी खोदलेले दोन साचपाण्याचे तलाव दिसून येतात. तलावांच्या पुढच्या बाजूस झाडीभरल्या भागात जमिनीच्या खालच्या पातळीत कातळात आतील बाजुस कमानीयुक्त गुहा कोरलेल्या दिसतात. या गुहा ओवरीसमान असुन कुठेही प्रमाणबद्धता दिसुन येत नाही. या लेण्यांच्या समोर जमिनीच्या पातळीत अजुन एक चार खांबावर तोललेली मोठी लेणी असुन या लेणीची उंची साधारण तीस फुट असावी. ही सर्व लेणी खोदकामाच्या प्रारंभिक काळातील असुन कोठेही खोदकामात समानता व सुबकता दिसुन येत नाही. येथुन पुढे गेल्यावर कोसळलेल्या वाड्याचे व मंदिराचे अवशेष तसेच ढासळलेली तटबंदी दिसून येते. गडावर वर्षातुन एकदा गडदेवतेची जत्रा भरते व तिला बोकडाचा बळी दिला जातो. येथे आपण गडाच्या पश्चिम टोकाला येतो. येथुन गडावर येणारा मार्ग बिकट करण्यासाठी गडाचा या ठिकाणचा भाग खोदुन गडाचा डोंगर समोरील डोंगरापासून वेगळा करण्यात आला आहे. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. गडावरून अनेर नदीचे S आकारात दुरवर वाहणारे पात्र आणि खूप लांबवरचा प्रदेश नजरेस पडतो. गड सुंदर असुन आजमितीला गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे पुरेसा पाणीसाठा जवळ बाळगावा. खंडरागडाच्या वास्तूवर नजर टाकल्यास या किल्ल्यावर असणाऱ्या गुहा व त्यांच्या शेजारील लेणी पाहता या किल्ल्याची उभारणी प्राचीन काळात झाली असणार यात शंका नाही. जळगाव परिसरातील किल्ल्यांवर साधारणपणे अहीर घराणे. राष्ट्रकूट, यादव व त्यांचे मांडलिक यांची सत्ता होती. यावरून हा गडदेखील याच राजसत्तेच्या ताब्यात असावा. खंडरागड जळगाव जिल्ह्य़ातील आवर्जून पाहावा अशा किल्ल्यांपैकी एक असून थोडा लांबचा प्रवास करायला लागला तरी हरकत नाही पण दुर्गप्रेमीनी एकदा तरी या किल्ल्याला भेट द्यायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!