KHANDERI

TYPE : SEA FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 90 FEET

GRADE : EASY

खांदेरी या जलदुर्गावर जाण्यासाठी आपल्याला अलिबागला जावे लागते. अलिबाग ते रेवस या मार्गावर अलिबागपासून ४ कि.मी.अंतरावर थळ गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून ३ कि.मी.वर थळ गाव आहे. थळ बाजारपेठेजवळील किनाऱ्यावरून आपल्याला किल्ल्यावर जाण्यास बोटी मिळू शकतात. थळसमुद्रकिनाऱ्यावरून जवळ दिसणारा किल्ला म्हणजे उंदेरी तर डाव्या बाजुला थोडा लांब असणारा किल्ला म्हणजे खांदेरी. खांदेरी किल्ला त्यावर असणाऱ्या दिपगृहामुळे लगेचच लक्षात येतो. खांदेरी किल्ला थळच्या समुद्रकिनाऱ्यावरून ३ कि.मी. तर उंदेरी किल्ल्याहून पश्चिमेला १ कि.मी.अंतरावर आहे. बेटावर दोन उंचवट्यापैकी दक्षिणेकडील भाग तीस मीटर उंच तर उत्तरेकडील उंचवटा वीस मीटर उंच आहे. समुद्राच्या लाटांचा मारा वर्षानुवर्षे सहन करत मराठयांचा पराक्रम सांगात खांदेरी किल्ला आजही ताठ मानेने उभा आहे. उंदेरी किल्ला पार करून खांदेरी किल्ल्याकडे जाताना खांदेरी किल्ल्याची तटबंदी व त्यातील बुरुज आपले लक्ष वेधून घेतात. ... . खांदेरी किल्ला समुद्रामधुन वर आलेल्या दोन टेकड्यावर वसला असुन या दोन टेकड्यांमध्ये असलेल्या प्रवाहाच्या भागात बोटींसाठी धक्का बांधलेला आहे. या धक्क्यावर एक तोफ उलट पुरण्यात आली असुन बोटी बांधण्यासाठी या तोफेचा वापर केला जातो. धक्क्याच्या उजवीकडे जीर्णोद्धार केलेले वेताळाचे मंदिर असुन या मंदिरातील शेंदरी रंगाने रंगविलेल्या मोठ्या शिळेची वेताळ म्हणुन पुजा केली जाते. दर्या काठावर असलेल्या समस्त कोळी बांधवाचे हे दैवत असुन होळीच्या दिवशी येथे जणु जत्रा भरते. याशिवाय किल्ल्यावर महादेवाचे जुने मंदिर असून नव्याने बांधलेली गणपती व मारुतीची मंदिरे आहेत. वेताळ मंदिराकडून किल्ल्याच्या तटावरून फेरी मारायला सुरवात केल्यावर सर्वप्रथम असलेल्या बुरुजावर एक तोफ पहायला मिळते. हि तोफ पाहुन पुढे आल्यावर तटाखाली एक लहान दरवाजा असुन या दरवाजाच्या आत तटाखाली कोठार बांधलेले आहे. येथुन पुढे आल्यावर एका बुरुजावर लोखंडी चाकाच्या गाडयावर ठेवलेल्या मध्यम आकाराच्या इंग्लिश बनावटीच्या दोन तोफा पहायला मिळतात. याशिवाय एक तोफ खाली आडवी पडलेली आहे. तटबंदीवरून फेरी मारताना तटाला लागुन असलेली चौकोनी आकाराची दगडात बांधलेली एक खोल विहीर व मध्यम आकाराचा तलाव नजरेस पडतो. किल्ल्याच्या पश्चिम तटबंदीत असलेल्या एका मोठ्या बुरुजावर हेलिपॅड बांधण्यात आले असुन या बुरुजात किल्ल्याबाहेर समुद्रावर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप नसल्याने किल्ल्याचे सर्व बुरुज आजही चांगल्या अवस्थेत असुन त्यातील अजुन एका बुरुजावर समुद्राकडे तोंड करुन तोफ उभी केली आहे. वेताळ मंदिराकडून पायऱ्यांच्या वाटेने दिपगृहाकडे जाताना डाव्या बाजुस असलेल्या झाडांमध्ये एक मध्यम आकाराचा खडक असुन त्यावर दुसऱ्या लहान दगडांनी ठोकले असता भांड्यावर आवाज येतो. दिपगृहाकडे जातांना दिपगृहाला लागुनच एक तळे पहायला मिळते. येथुन पुढे बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. वर पोहचल्यावर आपल्याला दिसते ती गाडयांवर ठेवलेली तोफ. ही तोफ मध्यम आकाराची असून आजही सुस्थितीत आहे. इ.स.१८६७ मध्ये बांधण्यात आलेले हे दिपगृह साधारण ५० फुट उंच असुन षट्कोनी आकाराचे आहे. दिपगृहाच्या अर्ध्या उंचीवर दिपगृहाच्या दोन्ही बाजूला गच्ची केली असुन या गच्चीतून संपुर्ण किल्ला नजरेस पडतो. खांदेरी दुर्ग मुंबई समोर असल्याने अतिशय मोक्याचा होता. त्याच्या ह्या महत्वामुळेच इंग्रज व मराठ्यांमधील संस्मरणीय युद्धाचा हा साक्षीदार आहे. शिवाजी महाराजांनी २८ नोव्हेंबर १६७० रोजी हे बेट हेरले. तेव्हा त्याच्या बरोबर साधारण तीन हजार लोक होते. तीन दिवस त्यांनी ह्या भागाची संपूर्ण पाहाणी केली व इथे किल्ला बांधायचे ठरविले. शिवाजीराजांच्या ह्या भागातील हालचालींना इंग्रज किती घाबरत होते व त्यांचे किती बारीक लक्ष होते ते पुढील बाबीवरून लक्षात येते. ९ सप्टेंबर १६७१ मधील एका पत्रात इंग्रजांनी खांदेरीवर शिवाजीचा किल्ला बांधायचा विचार आहे असे म्हटले आहे. २२ एप्रिल १६७२ च्या पत्रात खांदेरी उंदेरी बेटांचा उल्लेख हेन्री केन्री असा केला आहे. किल्ल्याची तटबंदी बांधण्यास सुरुवात झाल्यावर इंग्रज व सिद्‌दी अस्वस्थ झाले. त्यांनी किल्ल्याला वेढा घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवरायांनी तात्पुरती माघार घेतली व किल्ला बांधण्याचे काम थांबविले.१४ ऑगस्ट १६७८ रोजी खांदेरीवर भूमिपूजन करण्यात आले. इ.स. १६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रास्त्रे, दारुगोळा, निवडक तीनशे सैनिक आणि तितकेच कामगार पाठवून ऐन पावसाळयात खांदेरी दूर्गाच्या बांधकामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना २७ ऑगस्ट १६७९ ला इंग्रजांच्या टेहाळणी जहाजाने बेट त्वरीत सोडण्याबद्दल मायनाक भंडारीला संदेश दिला. पण मायनाकने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे इंग्रजांनी १९ सप्टेंबर १६७९ रोजी चाळीस बंदूकधारी सैनिकांनीशी व्यापारी जहाज घेवून खांदेरी वर हल्ला चढविला, त्या काळी इंग्रजांकडे मराठी आरमारात असणारी, उथळ समुद्रात वेगाने अंतर कापणारी गलबते नसल्याने त्यांना व्यापारी जहाजे वापरावी लागली. त्यांची व्यापारी जहाजे खडकाळ किना-यामुळे खांदेरी वर पोहोचू शकले नाहीत. त्यांना खराब हवामानामुळे परतावे लागले. किनाऱ्यावर परतताना मराठी मावळ्यांनी त्यांचे व्यापारी जहाज सैन्यासह समुद्रात बुडविले. नंतर कॅप्टन विलियम मिंचिन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रँडबरी, फ्रान्सिस थॉर्प या नाविक अधिकाऱ्यांना खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले. त्यानंतर इंग्रजांनी रिव्हेंज आणि हंटर नावाचे लढाऊ जहाज पाठवून थळ वरून खांदेरीला होणारा पुरवठा थांबवायचा प्रयत्न केला. हंटर बरोबर तीन लहान जहाजेही पाठवली होती. गेप आडनावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर काही तोफा कशातरी बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला. ७ सप्टेंबर १६७९ पर्यंत बेटावर एक मीटर उंचीचा तट तयार झाला होता. ११ सप्टेंबर १६७९ ला दौलतखानने मायनाकसाठी चांगले संरक्षक सैन्य आणले. थळच्या किनाऱ्यावर असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या.मराठयांच्या होडया थळच्या किनाऱ्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत. त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किनारा आणि बेट यामध्ये नाविक मोर्चेबंदी उभारण्याचे, पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या खाडीमध्ये ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही वाऱ्यामुळे त्यांच्या होडया किनाऱ्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडावर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली. १५ सप्टेंबर रोजी हंटर, रिव्हेंज व इतर लहान जहाजांनी मिळून बेटावर आक्रमण केले. हा हल्ला इंग्रज अधिकारी केग्विनने केला होता पण मराठ्यांनी तो परतवून लावला. तीन-चार मध्यम आकाराच्या होड्या (खडकांची खोली मोजण्यासाठी सोबत लांबलचक बांबू), दोन व्यापारी जहाजे, दोन-तीन मचवा इत्यादी फौजफाटा दिमतीला घेवून सेनापती केग्विन निघाला. तिकडे अलिबाग वरून खांदेरी कडे गलबतांचा ताफा निघाला, इकडे इंग्रज तयारच होते. त्यांनी मराठयांची पाच गलबते समुद्रात बुडविली आणि मागे फिरलेल्या उरलेल्या गलबतांचा नागोठण खाडी पर्यंत पाठलाग केला. दौलतखान त्याच्या वीस होड्यांनिशी नागावला परत गेला. इतका पराक्रम गाजवून देखील इंग्रजांना मावळ्यांना खांदेरी किल्ला बांधण्यापासून रोखता आले नाही. लहान लहान बोटीतून मावळ्यांच्या झुंडी खांदेरीवर येवून थडकल्या. या दरम्यानच्या काळात मराठ्यांनी खांदेरी वर मोठ्या संख्येने तोफा उभारल्या. १८ ऑक्टोबर १६७९ ला चाळीस ते पन्नास मराठी नौकांनी मिळून इंग्रजांच्या टेहळणाऱ्या जहाजांवर मारा केला. थळच्या जवळ असलेल्या रिव्हेंज जहाजातून केग्विनने प्रतिकार करायचा प्रयत्न केला. त्यात इंग्रजांच्या पाच ते सात नौका मराठ्यांनी जिंकून घेतल्या. त्यानंतर काही दिवस केग्विनने मराठ्यांच्या लहान होड्यांवर आक्रमण करायचे काही निष्फळ प्रयत्न केले. १७ नोव्हेंबर १६७९ ला पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटले. इंग्रजांच्या डोव्ह नावाच्या नौकेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून मराठा आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती नौका पकडली आणि त्यावरचे वीस इंग्रज व काही स्थानिक खलाशी कैद करून सागरगडावर डांबले. दौलतखानच्या सोबतीचे मराठे सैन्य जुमानत नाही हे पाहून शेवटी इंग्रजांनी मोगलांचा सरनौबत जंजिऱ्याच्या सिद्दीची कुमक जोडून घेण्याचे ठरवले. आता एका बाजूला जंजिऱ्याचा सिद्दी आणि दुसरीकडे इंग्रज अशा दोन कसलेल्या गनिमांशी मराठी सैन्य दोन हात करू लागले. इकडे खांदेरी पाडाव होत नाही हे पाहून संतापलेल्या सिद्दीने उंदेरी वर किल्ल्याचे बांधकाम सुरु ठेवले. एका बाजूने उंदेरीवर किल्ला बांधायचा आणि दुसरीकडे खांदेरीवरील बांधकामाला अडसर करायचा असा दोन कलमी कार्यक्रम सिद्दी राबवत होता. दरम्यान जर खांदेरी घेतला तर तो स्वतः कडे ठेवून घेण्याचा सिद्दीचा डाव इंग्रज अधिकारी केग्विनच्या ध्यानी आला आणि इंग्रजांनी सिद्दी हा शिवाजी महाराजांपेक्षा शिरजोर ठरू शकेल या भीतीपोटी खांदेरी मोहिमेचा जोर कमी केला. २४ डिसेंबर १६७९ ला युद्धबंदी होऊन तहाची बोलणी सुरू झाली. १६ जानेवारी १६८० रोजी इंग्रज व मराठ्यांमध्ये तह झाला. मराठ्यांचा चौलचा सुभेदार आण्णाजी याने मराठ्यांतर्फे तहावर शिक्कामोर्तब केले. या घटनेवरून सागराची भरती-ओहोटी, खोल-उथळ पाणी, मतलई वारे, इत्यादींचे ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा अधिक असल्याचे दिसले. संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या मराठा होड्यांनी या युद्धात कमाल केली. खास मराठा बनावटीच्या या होड्यांनी इंग्रज आरमाराला आश्चर्यकारकरीत्या चकवले. मराठे रातोरात या चिंचोळ्या होडया वल्हवत बेटावर सामानसुमान पोहोचते करत. इंग्रजांनी माघार घेतली तरी सिद्दीने उंदेरीचे बांधकाम पूर्ण केले आणि खांदेरी वर तोफांचा मारा सुरू ठेवला. सुमारे चार-पाच महिने हे चालूच राहिले. त्यानंतर बरीच वर्षे मराठे आणि सिद्दी यांच्या मध्ये खांदेरी - उंदेरीचा ताबा मिळवण्यासाठी आणि टिकविण्यासाठी युद्ध सुरु राहिले. पुढे ८ मार्च १७०१ रोजी सिद्दी याकूत खानने ‘खांदेरी’ वर हल्ला केला पण मराठयांनी तो परतावून लावला. सन १७१३ मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे यांनी खांदेरी-उंदेरी वर मराठी राज्याचा झेंडा रोवला. इ स १७१८ मध्ये पुन्हा इंग्रजांनी खांदेरी विजयाची मोहीम मुंबईचा गव्हर्नर चार्लस बून याच्या नेतृत्वाखाली आखली पण त्यात त्यांना यश आले नाही. इंग्रजांनी मोठा तोफखाना युध्द नौकांवर ठेवून किल्ल्यावर हल्ला केला, पण किल्लेदार माणकोजी सूर्यवंशी याने किल्ला ५०० माणसांनीशी महिनाभर लढवला. त्यामुळे इंग्रजांना हात हलवित परत जावे लागले. शेवटी १७४० ला पुन्हा इंग्रज आणि सिद्दी यांच्यात तह होवून गड जिंकल्यास तो त्यावरील दारुगोळा आणि शिबंदी तोफांसह इंग्रजांच्या ताब्यात देण्याचे ठरले. पण रघुजी आंग्रे याने हे प्रयत्न धुळीस मिळवले आणि गडावर आणखी तोफा तैनातीस ठेवल्या. इ स १७५९ साली मानाजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सिद्दीने कुलाब्याचा पाडाव केला. याला प्रत्युत्तर म्हणून माधवराव पेशव्याच्या आदेशानुसार रघुजी आंग्रे यांनी उंदेरीवर हल्लाबोल केला आणि घनघोर युद्धानंतर उंदेरीचा पाडाव केला. शेवटाला १७९९ साली इंग्रज सेनापती हुजस याला खांदेरी मोहीमेचा आदेश मिळाला. दरम्यानच्या काळात खांदेरीवर सुमारे ३०० तोफा तैनातीस होत्या असे त्याला कळले. त्याने तुफानी दारुगोळा आणि सैन्यासह या किल्ल्यांवर हल्ला चढविला आणि किल्ल्यावर युनियन जेक फडकवला पण हार मानतील ते मावळे कसले. या दरम्यान इंग्रजांच्या कैदेत असलेले जयसिंग आंग्रे याच्या पत्नी रणरागिणी सकवारबाई हिने पुन्हा खांदेरी वर प्रतिहल्ला चढवून या किल्ल्यावर भगवा फडकवला. पण इंग्रजाकडून तिला आमिष दाखविण्यात आले कि खांदेरी वरचा ताबा सोडला तर जयसिंग आंग्रेची सुटका करण्यात येईल. पती प्रेमापोटी तिने या किल्ल्याचा ताबा सोडला. पण इंग्रजांनी जयसिंग आंग्रेंचा वध केला आणि रणरागिणी सकवारबाईस तुरुंगात डांबले. पुढे १८१४मध्ये खांदेरी पेशव्यांच्या ताब्यात गेला. १८१७ मध्ये त्याचा ताबा परत आंग्रेकडे गेला. १८१८ मध्ये ‘खांदेरी’ किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला तो कायमचाच.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!