KHAMLOLI KOT

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : PALGHAR

HEIGHT : 100 FEET

GRADE : EASY

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. सफाळेजवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला खामलोली कोट हा असाच एक अपरिचित कोट. पश्चिम रेल्वेचे सफाळे स्थानक ते खामलोली कोट हे अंतर २० कि.मी. असुन मुंबई-अहमदाबाद मार्गावर वारई फाट्यापासून हे अंतर ७ कि.मी. आहे. वराई फाटा तसेच सफाळे स्थानक येथुन खामलोली गावास जाण्यासाठी खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. सफाळेहुन जाताना पहिले तांदुळवाडी फाटा नंतर पारगाव फाटा नंतर दहिसर गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून खामलोली गाव साधारण ४ कि.मी.आत असुन या मार्गावर वाहनांची फारशी सोय नाही त्यामुळे शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. गावात आल्यावर कोटाकडे जाण्यासाठी माडी अशी विचारणा करावी. साधारण १०० फुट उंचीच्या टेकडावर एका घराच्या आवारात या कोटाचे अवशेष नजरेस पडतात. ६० x ४० फुट आकाराची हि इमारत असुन या वास्तुची सद्यस्थितीतील उंची ३०-३५ फुट आहे. या वास्तुची एकंदरीत उंची पहाता हि वास्तु म्हणजे टेहळणीचा मनोरा असावा. ... या इमारतीच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा व चुन्याचा वापर केलेला आहे. इमारतीच्या केवळ दोन भिंती शिल्लक असुन त्यात वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी असलेल्या खोबण्या पाहता हि वास्तु ३ ते ४ मजली असावी. वास्तुचे स्थान-आकार व अवशेष पहाता हि वास्तु म्हणजे गढीवजा टेहळणी बुरुज असावा. या बांधकामापासुन काही अंतरावर एक दगडी कोठार पहायला मिळते. या कोटाची व्याप्ती त्या कोठारापर्यंत असण्याची शक्यता आहे पण मधील अवशेष शेतीमुळे पुर्णपणे भुईसपाट झाले आहेत. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन उंची जास्त असल्याने वरील भाग केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. या आधी कोसळलेला कोटाचा वरील भाग या भिंतीशेजारी पडलेला आहे. कोटाच्या आतील बाजुस दगडगोटे याने भरलेले पाण्याचे कोरडे टाके आहे. कोट व शेजारील कोठार पाहण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. या कोटाविषयी कोणतीही ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावच्या नावाने खामलोली माडी म्हणुन ओळखले जाते. खामलोली गाव वैतरणा व सुर्या नदीच्या संगमाजवळ वसलेले असुन त्यावरूनच या कोटाचे महत्व लक्षात येते. पोर्तुगीज काळात या दोन्ही नदीतुन होणाऱ्या सागरी वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठीच या कोटाची निर्मीती करण्यात आली असावी. १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९ च्या वसई मोहिमे दरम्यान हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला. हा कोट पुर्णपणे नष्ट होण्याआधीच याला भेट द्यायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!