KATHAPUR

TYPE : FORTRESS / CITY FORT

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका घोडनदीच्या पाण्यामुळे शेती उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असल्याने सधन शेतकऱ्यांचा तालुका म्हणुन ओळखला जातो. पण आपली या तालुक्याशी ओळख होते ते येथील गढीकोटामुळे. वास्तु अवशेषांनी परिपुर्ण असलेली अशीच एक दुर्लक्षित गढी आपल्याला काठापूर(बुद्रुक) गावात घोडनदीच्या काठावर पहायला मिळते. काठापूर(बुद्रुक) हे गाव पुणे शहरापासून ७० कि.मी. अंतरावर तर मंचर शहरापासून ३० कि.मी अंतरावर आहे. गावात जाण्यापुर्वी घोडनदीच्या पुलावरून गढीची प्रशस्त तटबंदी व दरवाजावरील सज्जे आपले लक्ष वेधुन घेतात. त्यानंतर गावात प्रवेश करताना लागणारी प्रचंड मोठी वेस पहाता कधीकाळी हे गाव तटबंदीच्या आत असल्याचे जाणवते. घडीव दगडात बांधलेला हा दरवाजा २० फुट उंच असुन दरवाजाच्या दोन्ही बाजुस कोरीव व्यालमुर्ती बसवलेल्या आहेत. या दरवाजाच्या कमानीची काही प्रमाणात पडझड झालेली असली तरी त्यात असलेली लाकडी दारे आजही शिल्लक आहेत. या मुख्य दाराला लहान दिंडी दरवाजा असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. गावकरी या गढीला राजवाडा / वाघाचा वाडा म्हणुन ओळखत असल्याने आपण सहजपणे या गढीजवळ पोहोचतो. ... गढीच्या परीसरात मोठ्या प्रमाणात काटेरी झुडुपांचे साम्राज्य असुन त्यातुन वाट काढत गढीच्या दरवाजाजवळ पोहोचावे लागते. चौकोनी आकाराची हि गढी साधारण अर्धा एकरवर पसरलेली असुन गढीच्या चार टोकावर गोलाकार आकाराचे चार बुरुज आहेत. या बुरुजावर असलेल्या चर्यामुळे त्याला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. गढीची तळातील १० फुट उंच तटबंदी घडीव दगडात बांधलेली असुन त्यावरील बांधकाम विटांनी केलेले आहे. हि तटबंदी साधारण २५-३० फुट उंच आहे. या बांधकामात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या तसेच तोफांसाठी झरोके दिसुन येतात. गढीचा दरवाजा उत्तराभिमुख असुन त्यातील लाकडी दारे आजही चांगल्या स्थितीत आहेत. दरवाजाचे तळमजल्यापर्यंत बांधकाम घडीव दगडात केलेले असुन त्यावरील दोन मजली सज्जाचे बांधकाम विटांनी करून त्याला चुन्याचा गिलावा देण्यात आला आहे. या सज्जाच्या वरील भागात राजस्थानी शैलीतील दोन घुमटाकार छत्र्या उभारल्या आहेत. दरवाजाच्या आतील बाजुस माती जमा झाल्याने तो उघडला जात नाही त्यामुळे दरवाजा शेजारी उध्वस्त झालेल्या तटबंदीतुन गढीत प्रवेश करावा लागतो. गढीत प्रवेश केल्यावर बाभळी व घाणेरीची प्रचंड वाढलेली झुडपे दिसुन येतात. या झाडीतुन वाट काढतच गढीतील वाड्याचे अवशेष पाहावे लागतात. गढीच्या मध्यभागी वाड्याचा प्रशस्त चौथरा असुन त्याचा बहुतांशी भाग वरील पडझडीमुले गाडला गेला आहे. या चौथऱ्याखाली दोन तळघरे असुन चौथऱ्याच्या मागील भागात कोरडी पडलेली विहीर पहायला मिळते. तटबंदीच्या भिंती आजही चांगल्या स्थितीत आहेत. गढीच्या अंतर्गत भागातील वास्तु पुर्णपणे भुईसपाट झाल्याने गढी पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. गढीच्या आवारात एक समाधी असुन गढीच्या डाव्या बाजूस तटबंदीला लागून नदीपात्रात एक विहीर आहे. गढीपासुन काही अंतरावर नदीपात्रात कोरीव काम असलेली तीन पेशवेकालीन मंदीरे आहेत. या गढीत असलेल्या दोन तोफा गावातील शाळेसमोर ठेवल्याचे वाचनात येते पण सध्या तेथे एकच तोफ पहायला मिळते. या शिवाय गावाची पाण्याची सोय म्हणुन या गढी सोबत बांधलेली बारव गावाबाहेर पहायला मिळते. हि बारव आता करंडे कुटुंबाची खाजगी मालमत्ता आहे. सरदार मल्हारराव होळकर यांच्या सैन्यात संताजी हैबतराव वाघ हे एक महत्वाची असामी होते. माळव्यामधील महिंदपूर हा होळकरांचा परगणा त्यांच्या ताब्यात होता. वाघ घराण्याने या परगण्याची जहागिरी एकदम चोख संभाळली होती. स्थानिक लोक या वाघ सरदारांना “वाघ राजा” म्हणूनच ओळखत होते. संताजी हैबतराव वाघ यांनी गाजवलेल्या शौर्यामुळे त्यांना काठापूर येथे काही जमीन इनाम मिळाली व त्यांनी येथे या गढीची उभारणी केली. संताजी वाघ हे १७६१ च्या पानिपत युद्धात धारातीर्थी पडले. सन १७६५ मध्ये होळकरांकडून संताजी वाघ यांच्या वंशजांना मध्यप्रदेशातील महिंदपूर परगणा व अन्य काही गावे तसेच महाराष्ट्रातील काठापूर(बुद्रुक), काठापूर(खुर्द), अवसरी(बुद्रुक) या गावांची जहागिरी देण्यात आली. संताजी वाघ यांची कन्या प्रिताबाई हिचा विवाह सुभेदार मालेराव होळकर यांच्याशी लावून देण्यात आला होता. त्यामुळे वाघ हे एकप्रकारे होळकर यांचे आप्तच होते. सध्या ही गढी नंदकुमार काळे यांनी विकत घेतलेली असुन मूळ गढी कायम ठेवत त्यांचा येथे ऐतीहासकालीन व पर्यावरण पुरक पर्यटन सुरु करण्याचा विचार आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!