KARANJALAD
TYPE : CITY FORT
DISTRICT : WASHIM
HEIGHT : 0
GRADE : EASY
वाशीम जिल्ह्यात एकही किल्ला नसल्याचे म्हटले जाते पण कारंजालाड शहराला भेट दिली असता हा दावा खोटा असल्याचे दिसुन येते. वाशीम या जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणापासुन कारंजालाड शहर ६६ कि.मी.अंतरावर असुन रेल्वेने जायचे असल्यास अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर रेल्वे स्थानकातुन तेथे जाणे जास्त सोयीचे आहे. मुर्तीजापूर रेल्वे स्थानक ते कारंजालाड शहर हे अंतर ३२ कि.मी.आहे. मध्ययुगीन काळात भरभराटीस आलेल्या या शहराच्या व बाजारपेठेच्या रक्षणासाठी या संपुर्ण शहराला तटबंदी होती व शहरात प्रवेश करण्यासाठी या तटबंदीत एकुण चार दरवाजे होते. हे चार दरवाजे आजही दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरूळ वेस आणि पोहा वेस या नावाने ओळखले जातात. आम्ही आमची भटकंती पोहा दरवाजा पासुन सुरु केली असल्याने या किल्ल्याचे वर्णन त्याच अनुषंगाने केले आहे. मुर्तीजापूर येथुन आल्यास पोहा दरवाजाने आपला करंजा लाड शहरात प्रवेश होतो. हा दरवाजा पोहा गावाच्या दिशेने असल्याने त्या नावाने ओळखला जातो. दोन बुरुजात बांधलेल्या या दरवाजाची पुरातत्व खात्याने अलीकडेच दुरुस्ती केलेली असुन त्याला त्याचे मूळ स्वरूप प्राप्त करून दिले आहे.
...
बुरुजाचा वरील भाग विटांनी बांधलेला असुन त्यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. दरवाजाच्या आत डावीकडील बुरुजात पहारेकऱ्यासाठी खोली असुन या खोलीत पाण्याची विहीर आहे. एक दोन गढीतील अपवाद वगळता माझ्या पाहण्यात आलेली हि दुर्मीळ रचना आहे. या दरवाजा पासुन काही अंतरावर कारंजालाड येथील काण्णव परिवाराने १८७६ साली घडीव दगडात बांधलेले राममंदिर आहे. या मंदीराचा सभामंडप कोरीव लाकडी खांबावर तोललेला असुन मंदिरासभोवती प्राकाराची भिंत आहे. मंदिराच्या आत एक बंदिस्त विहीर आहे. मंदीराचे प्राकाराबाहेरील आवार प्रशस्त असुन त्यात दोन लहान मंदीरे व एक विहीर आहे. किल्ला वगळता कारंजालाड शहरात पाहण्यासारखी अजुन एका वास्तु आहे, ती म्हणजे काण्णव परीवाराचा बंगला. हि वास्तु पोहो दरवाजाच्या बाहेरील बाजुस काही अंतरावर असुन आवर्जुन पहावी अशीच आहे. कृष्णाजी काण्णव या कापसाच्या व्यापाऱ्याने इंग्रजांच्या काळात इ.स. १८९८ ते इ.स.१९०३ साली परदेशी वास्तुविशारदच्या देखरेखेखाली हा बंगला बांधला. त्यावेळी हा बंगला बांधण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला. कारंजा येथील कृष्णाजी काण्णव यांची व्यापाराच्या निमित्ताने मुंबईला ये-जा असे. तेथील ब्रिटीश व पोर्तुगीज स्थापत्य पाहून ते प्रभावीत झाले. त्यांनी कारंजात पोर्तुगीज शैलीतील बंगला बांधण्यास सुरुवात केली. या बंगल्याच्या पाया बांधताना शिसे वापरले गेले. बंगल्यातील लाकडी बांधकामासाठी व सजावटीसाठी ब्रम्हदेशातुन सागवानाचे लाकूड आणले गेले. बंगल्याचे बांधकाम काठेवाडी कारागिरांनी केले असुन लाकडावरील नक्षीकाम राजस्थानी कारागिरांनी केले आहे. बंगल्याचे प्रवेशद्वार सभामंडपासारखे असुन त्याच्या वरील बाजुस गच्ची आहे. दरवाजाचे दोन्ही दर्शनी स्तंभ ओतीव लोखंडाचे असुन जमिनीवरील फरशीसाठी इटालियन संगमरवर वापरलेले आहे.बंगल्यात वापरलेले काच सामान बेल्जियम येथुन मागवलेले आहे. बंगल्याच्या मध्यभागी ३०x ३० फुट आकाराचा चौक असुन वरील मजल्यावर ५०x ४० फुट आकाराचा दिवाणखाना आहे. काण्णव परिवार बंगल्यात वास्तव्यास असल्याने बंगला पाहण्यापुर्वी त्यांची परवानगी घ्यावी. इंग्रजांनी काण्णवांनी बांधलेला बंगला पाहून इथलेच कारागीर श्रीलंकेत नेले आणि तेथे या बंगल्याची प्रतिकृती उभी राहिली. श्रीलंकन व्हाईसरायचे निवासस्थान असलेले हे ठिकाण श्रीलंका स्वतंत्र झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान झाले. काण्णव बंगला पाहुन झाल्यावर पोहा दरवाजाने पुन्हा आत शिरून सरळ अर्धा कि.मी. आल्यावर उजव्या बाजुस मंगरूळ दरवाजा नजरेस पडतो. हा दरवाजा मंगरूळपीर गावाच्या दिशेने असल्याने मंगरूळ वेस म्हणुन ओळखला जातो. दरवाजाचे मूळ नाव त्यावरील शिलालेखात कोरलेले आहे. दोन षटकोनी बुरुजात असलेल्या या दरवाजाची पुरातत्व खात्याने डागडुजी केलेली आहे. बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या असुन त्यावर सुंदर चर्या आहेत. दरवाजाच्या दर्शनी भागात कमानीवर नक्षीकाम केलेले असुन कमानीच्या दोन्ही बाजुस एक मराठी व एक पर्शियन असे दोन शिलालेख कोरलेले आहेत. दरवाजा शेजारील एका बाजूची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक असुन या तटबंदीवरून दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजा शेजारील दोन्ही बुरुजावर तोफा ठेवण्यासाठी ओटे बांधलेले आहेत. मंगरूळ दरवाजाच्या बाहेरील बाजुस रस्त्यापलीकडे ऋषी तलाव. असुन या तलावालगत दुमजली बारव आहे. तलावाच्या काठावर खोलेश्वर मंदिर, हनुमान मंदिर असुन या मंदिर परिसरात सात समाधी आहेत. मंगरूळ दरवाजाच्या आतील परिसरात नगरपालिकेची इमारत असुन हि इमारत म्हणजे नवाबाचा वाडा व त्यासमोर असलेली पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे हत्तीखाना असल्याचे सांगितले जाते. नगरपालिकेच्या इमारतीच्या दरवाजावर दोन पर्शियन शिलालेख आहेत. या इमारतीच्या आत एक भुयार असुन ते ऋषी तलावाकडे निघते असे स्थानिक सांगतात पण रविवारची नगरपालिका बंद असल्याने आम्हाला आतुन हि इमारत पहाता आली नाही. हा परीसर पाहुन झाल्यावर जवळच असलेल्या नृसिंह स्वामी सरस्वती यांच्या मंदीरात दर्शनासाठी जावे व त्यानंतर शेजारी असलेल्या वाड्यातील त्यांच्या जन्मस्थानाचे दर्शन घ्यावे. हे पाहुन झाल्यावर जवळच असलेल्या काष्ठ संघ मंदिरात जावे. कारंजा येथे चार प्रमुख दिगंबर जैन मंदिरे असुन त्यातील हे मंदिर साधारण १४ व्या शतकातील आहे. या मंदीरात ८०० वर्ष जुने अत्यंत सुंदर असे लाकडी कोरीवकाम पहायला मिळते. कारंजा भटकंतीत हे मंदीर न चुकता पहावे. मंदिराच्या पुढील भटकंतीत एक पुष्करणी पहायला मिळते. स्थानीक लोक या पुष्करणीचा उल्लेख चंद्रतळे म्हणुन करतात व या पुष्करणीत एक भुयार असल्याचे सांगतात. पाणी खुप आटल्यावर या भुयाराचे तोंड उघडे पडते असे स्थानिक सांगतात. कारंजा शहरात खुप मोठ्या प्रमाणात तळघरे व भुयारे असुन जुन्या वास्तु पहाताना आपल्याला त्याची प्रचीती येते. आपल्या भटकंतीचा यापुढील टप्पा म्हणजे दारव्हा दरवाजा. हा दरवाजा दारव्हा गावाच्या दिशेने असल्याने दारव्हा वेस म्हणुन ओळखला जातो. मोडकळीस आलेला हा दरवाजा दोन गोलाकार बुरुजात बांधलेला असुन पुरातत्व खात्याकडून संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहे. दरवाजाच्या आतील भागात दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या खोल्या आहेत. दरवाजाच्या दर्शनी भागात कमानीवर नक्षीकाम केलेले असुन कमानीच्या दोन्ही बाजुस एक मराठी व एक पर्शियन असे दोन शिलालेख आहेत. बुरुजाचा वरील भाग विटांनी बांधलेला असुन त्यावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या व चर्या आहेत. यानंतर किल्ल्यात प्रवेश करणारा चौथा आणि शेवटचा दरवाजा म्हणजे दिल्ली दरवाजा. हा दरवाजा किल्ल्याच्या उत्तर दिशेला असल्याने दिल्ली दरवाजा म्हणुन ओळखला जातो. या दरवाजाची पडझड झालेली असुन पुरातत्व खात्याकडून दुरुस्तीचे काम सुरु आहे. दोन षटकोनी बुरुजात असलेला हा दरवाजा म्हणजे मंगरूळ दरवाजाची प्रतिकृती आहे. या दरवाजाच्या दर्शनी भागात असलेल्या कमानीवर दोन पर्शियन शिलालेख असुन त्यात हा दरवाजा बांधणाऱ्याचे नाव व दरवाजाचे नाव फैज दरवाजा असल्याचे नमुद केलेले आहे. याशिवाय शहराच्या मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व त्याजवळ एक तोफ पहायला मिळते. कारंजालाड म्हटले कि आपल्याला आठवते ते दत्तसंप्रदायातील श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान. १४ व्या शतकातील श्रीकरंजमाहात्म्य या गुरुचरित्रात करंजनगर म्हणुन भरभराटीस आलेल्या या नगराचा उल्लेख येतो. गुरुचरित्रामध्ये असलेल्या वर्णनाप्रमाणे करिंज ऋषीच्या नावावरून या गावास कारंजा हे नाव पडले आहे. याच ऋषीच्या नावावरून येथे असलेल्या तलावास ऋषी तलाव अशी ओळख मिळाली आहे. कारंजा गावात व्यापार व सावकारी करणारी लाड आडनावाची अनेक घराणी असल्याने कालांतराने हे शहर लाडांचे कारंजे म्हणुन कारंजा लाड नावाने ओळखले जाऊ लागले. काही जुन्या कागदपत्रात या गावाचा उल्लेख बिबीचे कारंजे असाही येतो. याबाबत असे सांगीतले जाते कि अहमदनगरच्या बादशहाच्या मुलीला कारंजा गाव आंदण (मेहेर) म्हणून दिले होते. वाकाटक राजवट ते देवगिरीचे यादव, ईमादशाही,निजामशाही, मोगल, नागपूरकर भोसले,निजाम अशा अनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत. सतराव्या शतकात कारंजा हे मोठे व्यापारी केंद्र होते. श्रीमंत व्यापारी, सावकार व बाजारपेठेमुळे हे शहर गजबजलेले होते. निजामाच्या काळात नवाब सुभान खान यांनी कारंजा शहराभोवती तटबंदी व त्यात चार दरवाजे उभारले होते. सुरत शहराची श्रीमंती अधोरेखीत करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरत शहर लुटल्याचे सांगितले जाते. मात्र महाराजांनी मोगलांचे व्यापारी ठाणे असलेले कारंजा देखील दोनदा लुटल्याची ऐतिहासीक नोंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजानी हाती घेतलेली शेवटची मोहीम म्हणजे जालना स्वारी. या स्वारीत कारंजा शहर मराठ्यांनी खणत्या लावून लुटले पण त्याआधी म्हणजे इ.स.१६७० साली सेनापती प्रतापराव गुजर यांनी या शहरातुन खंडणी वसुल केली होती.
© Suresh Nimbalkar