KANHERSAR

TYPE : MANSION

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

पुणे जिल्ह्याची दुर्ग भटकंती करताना आपल्याला पुणे शहराच्या आसपास पेशवेकाळात उदयास आलेल्या काही गढी पहायला मिळतात. खेडपासुन काही अंतरावर असलेल्या कण्हेरसर गावात आपल्याला होळकरांचे दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड यांचा गढीसदृश्य पेशवेकालीन वाडा पहायला मिळतो. काळाच्या ओघात त्याची बरीचशी पडझड झाली असली तरी काही प्रमाणात तो आपले वैभव आजही टिकवुन आहे. कण्हेरसर हे ठिकाण पुणे जिल्ह्यात खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरूनगर येथुन १५ कि.मी. अंतरावर आहे.राजगुरुनगर हे शहर असल्याने मुंबई-पुणे येथून तेथे जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे पण पुढे मात्र खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. सद्यस्थितीत उभा असलेला वाडा हा एक एकरवर पसरलेला असुन याच्या आसपास असलेली मोकळी जागा व तटबंदी पहाता पूर्वी याचे क्षेत्रफळ दोन एकरपेक्षा जास्त असावे. आता उभा असलेला वाडा हा वंशजांच्या वाटणीत विभागला गेला असुन तटबंदीच्या आत असलेले बांधकाम नव्या जुन्याचा संगम आहे. पण वाड्याचा एकुण परिसर पहाता हा वाडा तीन ते चार चौकी असावा. शिल्लक असलेल्या वाड्याच्या बांधकामात आजही चंद्रचुड यांचे वंशज वास्तव्यास असुन काही वंशज मुंबई-पुणे येथे रहात असल्याने तो भाग बंद आहे. ... वाड्याबाहेर चंद्रचुड घराण्यातील हरी लक्ष्मण चंद्रचुड यांची समाधी असुन या समाधीमागे एक विहीर आहे. या समाधी समोरच १२ फुट उंचीचा कलाकुसर केलेला मंडप बांधलेला आहे. वाडा पाण्याच्या बाबतीत परिपुर्ण असुन वाडयाला पाणीपुरवठा करण्यासाठी एकुण तीन विहिरी आहेत. या विहीरी वाडा सर्वार्थाने नांदता असताना त्यात किती लोक रहात असावेत याची साक्ष आहे. मुख्य वाड्यातील बैठकीची खोली प्रशस्त व सुस्थितीत असुन त्याचे लाकडी बांधकाम अडीचशे वर्षानंतर आजही टिकवुन आहे.बैठकीच्या खोलीला लागुनच देवघर असुन देवघरात नृसिंहाची सुंदर मुर्ती आहे. वाड्याचा काही भाग वापरात असल्याने तेथे जाता येत नाही.संपुर्ण वाडा व आसपासचा परिसर फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात कन्हेरसर व निमगाव येथील चंद्रचूड घराणे नावलौकिक मिळवून होते. निमगाव, नागना भागातील पूर, खेड या गावच्या पाटीलकी त्यांनी खरेदी केल्या होत्या. मल्हारराव होळकरांच्या काळात यशवंतराव चंद्रचूड यांचे बाजी व गंगाधर हे पुत्र स्वकर्तृत्वाने उदयास आले होते. पण या घराण्याचे नाव खऱ्या अर्थाने लौकिकास आणणारा सरदार म्हणजे गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबातात्या. गंगाधर उर्फ गंगोबातात्या यांना मल्हारराव होळकर यांच्याकडे फडणिशी मिळविली. किंवा मल्हारराव होळकरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पेशव्यांनी गंगाधर यशवंत चंद्रचूड यांची आपल्या मर्जीतील एक कारभारी म्हणुन मल्हारराव होळकरांच्या पदरी त्यांची नेमणूक केली असावी. एकाच वेळी पेशवे व होळकर अशा दोघांच्या मर्जी संपादन करणारं इतिहासातलं हे एक व्यक्तिमत्त्व होतं. होळकरांच्या पदरी नोकरीस लागल्यावर गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी मोठी प्रगती केली. मुत्सद्देगिरी व कारकुनीच्या सोबतच त्याला राजकारण आणि मैदानी कामगिरीची जोड मिळाली. होळकरांच्या पदरी राहून त्यांची होळकरांवर निष्ठा बसली व त्यांनी पेशव्यांकडे काहीसे दुर्लक्ष केले. होळकरांचा पक्ष घेऊन त्यांनी माळव्यात संस्थानाच्या भरभराटीसाठी काम केले. इ.स. १७५० नंतर गंगाधर यशवंत चंद्रचूड याने होळकरांच्या मोठमोठ्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला. इ.स. १७५१ मध्ये मोगल वजीर सफदरजंग व रोहिले यांच्या भांडणात शिंदे-होळकरांनी सफदरजंग याचा पक्ष घेतला. यावेळी झालेल्या लढाईत गंगाधर यशवंत चंद्रचूड आणि निमगावच्या लोकांनी मोठा पराक्रम गाजवला. मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले त्यावेळेस गंगाधर चंद्रचूड व तुकोजी होळकर यांनीच प्रामुख्याने होळकरांच्या सैन्याचे नेतृत्व केले. विष्णुभक्त असलेल्या गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी इ.स.१७५६ नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेल्या सुंदरनारायण मंदीराची स्थापना केली. इ.स.१७६० मध्ये बुराडी घाटच्या लढाईनंतर अब्दालीसोबत झालेल्या लढाईत २७ फेब्रुवारी १७६० रोजी गंगोबाने दिल्लीजवळील सिकंदरा या नजीबखानाच्या जहागीरीतील प्रदेशावर स्वारी करून लूट मिळवली होती. पुढल्या काळात अब्दालीशी लढताना होळकरांच्या सैन्यात गंगाधर यशवंत चंद्रचूड हाही होता. पानिपत लढाईच्या एक वर्ष आधी मार्च महिन्यात मल्हाररावाचे सरदार आणि अब्दाली यांच्यात सामना झाला होता. या लढाईत शेट्याजी खराडे, शिवाजी खराडे, आनंदराव रामजी यादव व गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी भाग घेतला पण गंगाधर यशवंत चंद्रचूड खेरीज बाकी सर्व मंडळी ठार झाली. अफगाण सैन्याने छापा मारून गंगोबाला उधळून लावले. मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी म्हणुन अहिल्याबाई होळकरांचे नाव समोर आले. ही बाब गंगाधर यशवंत चंद्रचूड यांना पटली नाही. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना उत्तरेत बोलावले पण हा डाव यशस्वी झाला नाही. गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी होळकर दरबारातील आपले स्थान गमावले व राघोबा दादाचा पक्ष घेतल्याने तो पेशव्यांच्या मर्जीतुन देखील उतरला. त्यांना २० वर्षाची राजकीय कैद नशिबी आली. इ.स.१७७२ मध्ये ३० लाख रुपये दंड भरल्यावर फेब्रुवारी १७७२ मध्ये त्यांची सुटका झाली व ते निमगावात परत आले. २० फेब्रुवारी १७७४ मध्ये त्यांचा मृत्यु झाला. याचा वंशातील यशवंतराव चंद्रचूड व त्यांचे पुत्र डॉ धनंजय चंद्रचूड यांनी भारताचे सरन्यायाधीश पद भूषवले आहे. पिता व पुत्र सरन्यायाधीश होणे ही बाब अत्यंत दुर्मिळ असून कन्हेरसर गाव व राजगुरूनगर तालुक्यासाठी हि अभिमानाची गोष्ट आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!