KAMBE KOT

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : THANE

HEIGHT : 0

GRADE : EASY

प्राचीन काळी कल्याण हे महत्वाचे बंदर होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडीमार्गे जहाजांची ये-जा चालत असे. ह्या जलमार्गावर घोडबंदर, नागलाबंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदरांचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी उल्हास खाडीच्या दक्षिणेला घोडबंदर, नागलाबंदर, गोमुख व ओवलेकोट हे चार किल्ले बांधले गेले तर उल्हास खाडीच्या उत्तरेला नागले, खारबाव, फिरंगकोट, कांबेकोट हे छोटे कोट बांधले गेले. कल्याणच्या खाडीकिनारी मराठ्याच्या आरमाराच्या वाढत्या हालचाली पाहून पोर्तुगीजांनी कामवारी खाडीकिनारी कांबे गावात एका छोट्या टेकाडावर टेहळणीसाठी व कामवारी नदीचे संरक्षणाच्या हेतूने हा चौकीवजा किल्ला बांधला. कांबे बरोबरच खारबाव, पिंपळास-गड, फिरंगकोट असे किल्ले बांधून शिबंदी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय व्यापाराचं ठिकाण आणि लढाऊ जहाजबांधणीच्या मराठ्यांच्या आरमारावर वचक बसवण्यासाठी पोर्तुगीजांनी ही रणनीती केली असावी. कांबेकोटास जाण्यासाठी वसई-चिंचोटी -अंजूरफाटा-भिवंडी मार्गावरील खारबाव किल्ला पाहुन फिरंग कोटास जाता येते ... व तेथुन कांबे कोटास जाता येते अथवा भिवंडीमार्गे ८ कि.मी.वरील कांबे गाव गाठावे. ५० फुट उंचीच्या लहानशा झाडीभरल्या टेकाडावर कांबेकोट वसलेला असुन या कोटाविषयी स्थानिकांना किल्ला म्हणुन काहीही माहित नाही. कोटाविषयी विचारताना पीराचे ठिकाण विचारले असता स्थानिक अचुक ठिकाण सांगतात.हे पीराचे ठिकाण कोटाच्या आत वसलेले आहे. तिथे जाण्यापूर्वी या कोटाची पुर्ण माहिती घेऊनच जावे. पोर्तुगीजांनी बांधलेल्या या किल्ल्याचे आता फक्त अवशेषच उरलेत. कांबेकोटाचा आकार साधारणपणे आयताकृती असुन आज केवळ तटबंदीचा पाया,इमारतीचे काही चौथरे व तटबंदीमधील दोन बुरुजांचे पाया शिल्लक आहेत. इतिहासाच्या ह्या साक्षीदाराची पार दैनावस्था झालेली आहे. कोटाचा कचराकुंडी व शौचालय म्हणुन वापर होत असल्याने आत दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य आहे. कोटाची आतील सफर अतिशय सावधपणे करावी लागते. कोटाची मोठया प्रमाणात पडझड झाल्याने यात संरक्षणाची सोय होती कि नाही हे कळण्यास वाव नाही. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड, चिकटमाती, चुना यांचा वापर केला गेलेला दिसतो. उपलब्ध अवशेष व ऐतिहासिक संदर्भ तसेच या कोटाचे आकारमान पाहता या कोटाचा वापर पोर्तुगीजकालीन प्रशासकीय कार्यालय तसेच जकातीचे व टेहळणीचे ठाणे म्हणुन केला असावा. कोट छोटेखानी असून दहा मिनिटात पाहून होतो. आज जरी किल्ला पुर्णपणे अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान आणि कामवारी नदीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहाता येते.लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. इ.स.१७३० मध्ये मराठयांनी पिलाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली कांबे कोट जिंकला अशी नोंद आढळते. यावेळी ८ पोर्तुगीज अधिकारी,१६०० शिपाई व १००० रयत कैद झाली. पुढे मराठा-पोर्तुगीज तहात हा किल्ला पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. इ.स. १७३९च्या या वसई मोहिमेत खारबाव, कांबे, फिरंगीपाडा हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. किल्ला पाहण्याच्या हेतुने येथे येणाऱ्याचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. इतिहासकाळात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या गड-किल्ल्यांचा ठेवा आज जपायला हवा, अन्यथा येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याच्या अस्तित्वाच्या खुणा शोधाव्या लागतील.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!