JINTI
TYPE : FORTRESS/CITY FORT
DISTRICT : SOLAPUR
HEIGHT : 0
कधी कधी दुरच्या गोष्टी पहाण्याच्या नादात आपल्याला जवळच्या गोष्टी दिसत नाही या गोष्टीची जाणीव मला विचखेडे येथील भुईकोट पाहील्यावर झाली. अनेकदा धुळे –नागपुर महामार्गाने प्रवास करताना तसेच जळगाव येथील दुर्गभ्रमंती करताना हा किल्ला आपल्या नोंदीत कसा आला नाही याचे आजही मला आश्चर्य वाटते. कागदोपत्री किल्ला अशी कोणतीही नोंद नसलेला हा कोट आजही त्याच्या अंगावर मोठया प्रमाणात तटाबुरुजांचे व इतर अवशेष बाळगुन आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून धुळ्याहून जळगावकडे जाताना महामार्गावर बोरी नदीच्या काठी १००-१२५ घरांचे विचखेडे नावाचे लहानसे गाव आहे. हे गाव या किल्ल्यातच वसलेले आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील हे गाव जळगाव पासुन ६० कि.मी.अंतरावर तर धुळे शहरापासुन ३० कि.मी. अंतरावर आहे. धुळ्याहून जळगाव कडे जाताना बोरी नदीचे पात्र ओलांडल्यावर नदीच्या काठावर पुलाच्या दोन्ही बाजुला या भुईकोटाची तटबंदी व बुरुज दिसुन येतात.
...
राष्ट्रीय महामार्गाने या किल्ल्याचे दोन भाग पडले असुन डाव्या बाजुस किल्ल्याचा एक बुरुज व काही तटबंदी पहायला मिळते. महामार्गामुळे या बाजुची तटबंदी व बुरुज मोठया प्रमाणात उध्वस्त झाली आहे. उजव्या बाजूस किल्ल्याची तटबंदी व बुरुज आजही शिल्लक असुन या तटबंदीच्या आत विचखेडे गाव वसले आहे. महामार्गावर उतरून नदीकाठाने किल्ला पहाण्यास सुरवात केल्यावर या वाटेवर किल्ल्याच्या नदीच्या बाजुने असलेल्या तटबंदीत एकुण पाच बुरुज पहायला मिळतात. या बुरुजांना व तटाला सुरवातीचे दोन बुरुज व तटबंदी पार केल्यावर तटाला लागुनच एक मंदिर आहे. याच्या पुढील भागात जुना राष्ट्रीय महामार्ग असुन या मार्गाने किल्ल्याचे दोन भाग करून येथील तटबंदी उध्वस्त केली आहे. या वाटेने गावात प्रवेश केल्यावर उजवीकडे वळल्यावर ५-६ घरे पार केली कि एक पायवाट नदीकडे जाताना दिसते. या पायवाटेच्या टोकाला तटबंदीत दोन बुरुज असुन या दोन बुरुजामध्ये पायऱ्या बांधल्या आहेत. येथे नदीच्या बाजुने गावात शिरणारा पश्चिमाभिमुख दरवाजा आज केवळ अवशेष रुपात शिल्लक आहे. हा दरवाजा पाहुन परत फिरल्यावर पुढे जाताना वाटेच्या उजव्या बाजुस महादेवाचे पुरातन मंदिर व दीपमाळ आहे. येथुन सरळ जाऊन दक्षिणेकडील तटबंदीतुन बाहेर आल्यावर समोरील शेतात एक जुनी कबर दिसते. तटबंदी बाहेरील या शेतात किल्ल्यातुन बाहेर येणारा एक भुयारी मार्ग आहे पण या भुयाराचे किल्ल्याच्या आतील तोंड बुजवले आहे. कोटाची दक्षिणेकडील तटबंदी पुर्णपणे शिल्लक असुन या तटबंदीत एकुण चार बुरुज आहेत. यातील एक बुरुज बाहेरील बाजुने काही प्रमाणात कोसळलेला असुन एका बुरुजावर पीराचे स्थान आहे. या बुरुजातुन तटाबाहेर पडण्यासाठी लहान दरवाजा आहे. या तटबंदीला पुर्णपणे वळसा घालुन आपण किल्ल्याच्या पुर्वाभिमुख दरवाजाने पुन्हा गावात प्रवेश करतो. हा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन दरवाजा समोर मारुतीचे नव्याने बांधलेले मंदिर आहे. या वाटेने पुढे आल्यावर आपल्याला एका उध्वस्त वाड्याचा दरवाजा व अवशेष पहायला मिळतात. वाड्याबाबत चौकशी केली असता हा वाडा शिंदे देशमुखांचा असुन ते पुण्यात स्थायिक झाल्याचे गावकऱ्यानी सांगितले. वाटेच्या उजव्या बाजुस एक पुरातन नागमंदिर असुन या मंदीरात सुंदर नागशिल्प आहे. पुढे वाटेच्या डाव्या बाजुस एका बुरुजाकडे जाणारी वाट आहे. या बुरुजाच्या शेजारील तटबंदीत आतील बाजुने तटावर जाण्यासाठी जिना आहे. तटबंदीत बांधलेल्या या जिन्याला आत शिरण्यासाठी कमानीदार दरवाजा असुन या बुरुजावर एक कबर आहे. गावात फेरी मारताना पुर्वी ७ विहिरी असल्याचे गावकरी सांगतात पण सध्या मात्र २ चौकोनी आकाराच्या विहिरी पहायला मिळतात. याशिवाय गावात एक गणपतीचे मंदिर आहे. वाढत जाणाऱ्या लोकवस्तीने जुन्या वास्तु मोठया प्रमाणात नष्ट झाल्या आहेत. दक्षिणोत्तर पसरलेल्या या आयताकृती कोटाचा आतील परीसर २५ एकरचा असुन संपुर्ण किल्ला पहाण्यास एक ते दिड तास लागतो. किल्ल्याच्या इतिहासाबाबत गावकऱ्यांना विचारले असता ते या किल्ल्याचा संबंध पारोळा येथील किल्ल्याशी व राणी लक्ष्मीबाई यांच्या वंशजांशी जोडतात पण गावात असणारा शिंदे यांचा वाडा व नागमंदीर काही वेगळेच दर्शवीतात. जुन्या कागदपत्रात विचखेडे गावाचा उल्लेख पारोळा शेजारील छोटे शहर असा येतो.
© Suresh Nimbalkar