JATH

TYPE : GADHI/ NAGARKOT

DISTRICT : SANGALI

HEIGHT : 0

GRADE : EASY

प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठा सत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. उमराणी येथील प्राचीन मंदिरात इ.स. ११ व १२ व्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात. यात कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दान दिल्याची नोंद येते. पुढे मुस्लीम राजवटीत इ.स.१६८१ मध्ये विजापुरच्या आदिलशहाने सटवाजी डफळे यांना जतची जहागिरी दिल्यावर जत संस्थान व डफळे राजघराणे उदयाला आले. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला. पेशवाईच्या काळात जत हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर डफळे घराण्याची सत्ता होती. सावनुरच्या नबाबाच्या बंदोबस्तासाठी जाताना डिसेंबर १७५५ मध्ये बाळाजी पेशवे यांनी जत येथे मुक्काम केल्याच्या नोंदी आढळतात. ... तसेच कर्नाटक स्वारी दरम्यान थोरले माधवराव पेशवे देखील जत येथे मुक्कामी असल्याच्या नोंदी आढळतात. डफळे संस्थानाची राजधानी असलेले जत हे एक महत्वाचे शहर असल्याने या संपुर्ण शहराभोवती कोट होता किंबहुना जत शहर हे या नगरदुर्गातच वसले होते. आज वाढलेल्या वस्तीने हा संपुर्ण कोट नामशेष झाला असुन या कोटाचे केवळ प्रवेशद्वार, त्यातील लाकडी दरवाजा त्या शेजारील एकमेव बुरुज व काही प्रमाणात तटबंदी शिल्लक आहे. या वास्तुचे सिमेंटने काही प्रमाणात नुतनीकरण करण्यात आले आहे. नगरदुर्गाची खुण सांगणारी हि एकमेव वास्तु आज उभी आहे. कधीकाळी जत शहर या वास्तुच्या आतील भागात होते पण आज मात्र हि वास्तु शहराच्या मध्यभागी आहे. दरवाजाच्या समोरील भागात मारुतीचे मंदीर असुन या मंदीरात जुन्या मंदिराचे कोरीव खांब तसेच काही विरगळ पहायला मिळतात. या दरवाजाच्या आतील भागात काही अंतरावर सरदार डफळे यांची साधारण एक एकर परिसरात पसरलेली गढी आहे. चौकोनी आकाराच्या या गढीला चार टोकाला चार बुरुज असुन दोन दरवाजे आहेत. यातील एका दरवाजावर नक्षीदार लाकडी नगारखाना उभारलेला असुन या भागात चिंगी बाबांचे मंदीर आहे. गढीचा उरलेला भाग खाजगी मालमत्ता असुन पडीक झाल्याने धोकादायक असुन पहाता येत नाही. गढीच्या आतील भागात आपल्याला चौसोपी वाड्याचा घडीव दगडात बांधलेला चौथरा पहायला मिळतो. नगरदुर्गाचा दरवाजा व गढी पहाण्यास एक तास पुरेसा होतो. जत शहरात या वास्तुची विचारणा करताना चिंगी बाबांचे मंदीर अशी विचारणा केल्यास या वास्तुपर्यंत सहजपणे पोहचता येते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!