JANJALA

TYPE : HILL FORT

DISTRICT : AURANGABAD

HEIGHT : 2180 FEET

GRADE : EASY

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहे. या पर्यटन राजधानीतच जंजाळा किल्ला वसला असुन तो वैशागड किंवा तलतमचा किल्ला म्हणुनही ओळखला जातो. हा किल्ला कधी आणि कुणी बांधला या बाबत इतिहासकारांत मतभेद आहेत. इ.स. पाचव्या शतकातील वाकाटक काळापासून शेकडो वर्षांचा साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दुर्लक्षित आहे. खाजगी वहानाने औरंगाबादहून जंजाळा गडावर जाण्यासाठी औरंगाबाद -अजिंठा- जळगाव रस्त्यावर औरंगाबाद पासून १०५ किमी अंतरावर फर्दापूर गाठावे. फर्दापूरपासून १५ किमीवर सोयगाव हे तालुक्याचे गाव आहे. सोयगावातुन वेताळवाडी किल्ला पाहुन हळदाघाट मार्गाने १४ की.मी.वरील उंडणगावात यावे. येथुन साधारण १२ कि.मी.अंतर पार करून अंभई गावात यावे. तेथील प्राचीन शिवमंदीर पाहुन पुढे १० कि.मी.वरील जंजाळे गाव गाठावे. जंजाळे गाव गडाच्या उंचीवरच वसलेले असुन गावाच्या मागे २ किमीवर जंजाळा किल्ला आहे. जंजाळा गावातून पायवाटेने गडावर जाण्यास ३० मिनीटे लागतात. ... हा किल्ला जंजाळे गावाच्या परिसरात असल्याने गावाचे नावाने जंजाळा म्हणुन ओळखला जातो. समुद्रसपाटीपासून साधारण ३००० फुट उंच व विस्ताराने प्रचंड असलेला हा किल्ला एकशे दहा एकरवर पसरलेला असुन गडावर अवशेषांची लयलूट आहे. जंजाळा किल्ला गावाच्या दिशेने भूदुर्ग तर इतर तीन बाजूने डोंगरी किल्ला आहे. जंजाळा किल्ल्याला एकुण तीन दरवाजे असून पूर्वेकडे वेताळवाडी धरणा जवळून येणारा वेताळवाडी दरवाजा, दक्षिणेस जंजाळे गावाच्या दिशेने असणारा जंजाळा दरवाजा तर पश्चिमेस जरंडी या पायथ्याच्या गावाकडून येणारा जरंडी दरवाजा आहे. या शिवाय किल्ल्यास दोन चोर दरवाजे, मजबूत तटबंदी आणि बरेच बुरुज आहेत. गडाला जरी एकुण पाच दरवाजे असले तरी जंजाळे गावातुन येताना दक्षिणेकडील तुटलेल्या तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो. तटबंदी बाहेरील जागा खोल असुन या भागात खंदक असावा असे वाटते. बऱ्याच लेखात या तटबंदीबाहेर शेतात एक ८ फुटी तोफ असल्याचे वाचनात येते पण अंतुर किल्ल्यावरील तोफ चोरीस गेल्यावर पुरातत्त्व खात्याने येथील तोफ उचलुन औरंगाबादला नेल्याचे गावकरी सांगतात. उध्वस्त तटबंदीतुन गडावर प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला तटबंदीत एक कमानवजा खिडकी व दूरवर वेताळवाडी किल्ला व धरण दिसते. गडाचे पठार प्रशस्त असुन सर्वत्र झाडी माजली आहे. येथुन पुढे गेल्यावर उजव्या बाजूला गडाचा पूर्वाभिमुख २२ फुट उंचीचा जंजाळा दरवाजा व आत दुसरा दरवाजा आहे. या दोन्ही दरवाजाची कमान आजही शिल्लक असुन दोन्ही दरवाजाच्या आतील बाजूस दोन मजली देवड्या व कोठारे आहेत. या दोन दरवाजाच्या आतील मार्ग बाहेरपर्यंत दगडांनी बांधुन काढलेला असुन दरवाजाबाहेर काही कोरीव नक्षीकाम केलेले दगड दिसतात. दरवाजा पाहून पायवाटेने पुढे गेल्यावर डाव्या बाजुस एक प्रचंड मोठा बांधीव तलाव दिसतो. तलावाचे बांधकाम कोसळल्याने त्यात पाणी साठत नाही. तलाव ओलांडून पुढे गेल्यावर डाव्या बाजूस उत्तरांभिमुख जरंडी दरवाजा आहे. गडाच्या पश्चिमेस असणाऱ्या जरंडी गावातून येणारी वाट या दरवाजातून गडावर येते. येथेही दोन दरवाजे असुन या दोन्ही दरवाजाच्या मध्ये देवड्या आहेत. गडाचा हा दरवाजा बाहेरील बाजुने वेगळा नसुन एका बुरुजात बांधलेला आहे. या दरवाजाला गडाच्या आतील बाजुस असणाऱ्या भागात कमानी शेजारी दोन ओळींचे दोन फारसी लिपितील शिलालेख कोरलेले दगड आहेत. जरंडी दरवाजा पाहून डाव्या बाजुने तटबंदिवरून फेरी मारण्यास सुरवात करावी. वाटेत एका ठिकाणी उतारावर तटबंदीच्या आधारे पाणी साठविण्यासाठी बांधलेला बंधारा दिसतो. येथुन पुढे गेल्यावर आपण जरंडी गावाच्या दिशेला असलेल्या टोकावरील बुरुजावर पोहोचतो. येथुन तटबंदीच्या कडेने पुढे जाताना एका ठिकाणी गडाखाली उतरणारी चोरवाट दिसते. गडाच्या या भागात फारसी तटबंदी नसुन प्रत्येक टोकाला मात्र गोलाकार बुरुज बांधल्याचे दिसुन येतात. येथुन पुढच्या बाजुस जाताना उजव्या बाजुला एक उंचवटा असुन त्यावर एका वास्तुचे अवशेष दिसुन येतात. तटबंदीवरून फेरी मारत आपण गडाच्या पुर्व बाजुस येऊन पोहोचतो. येथे गडाची निमुळती होत जाणारी माची असुन या माचीच्या तटबंदीत एक चोरदरवाजा पहायला मिळतो व येथुन आपल्या परतीच्या प्रवासास सुरवात होते. मागे वळल्यावर समोरच एक झाडीने भरलेले टेकाड व त्यावर तीन कमानींची मस्जिद दिसते. पण तिथे न जाता डावीकडे गेल्यास आपण दाट झाडीत लपलेल्या पूर्वाभिमुख वेताळवाडीगड दरवाजापाशी पोहोचतो. हा दरवाजा १५ फूट उंच असून त्याची कमान उध्वस्त झालेली आहे. दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या असुन देवड्यांपासून ते दरवाजा बाहेरपर्यंतची वाट दगडांनी बांधुन काढलेली आहे. दरवाजाच्या बाहेरील अंगास कोरीव काम केलेले आहे. या दरवाजाच्या एकंदरीत बांधणीवरून हा गडावरील सर्वात जुना दरवाजा असावा. या भागात झाडी प्रचंड प्रमाणात वाढली असल्याने येथील अवशेष नीटपणे पहाता येत नाही. दरवाजाच्या आतील बाजुस तटबंदीला लागुनच एक ढासळलेले कोठार आहे. या दरवाजातून उतरणारी वाट वेताळवाडी धरणा जवळून वेताळवाडी गावात जाते. दरवाजाच्या बाहेरून आपण आताच पाहिलेल्या उत्तरेकडील माचीला असलेली लांबलचक तटबंदी व या तटबंदीत असणारा चोर दरवाजा दिसतो. हा दरवाजा पाहुन गडाच्या उंचवट्याच्या दिशेने निघाल्यावर डाव्या बाजुला आपल्याला गडावरील दुसरा सर्वात मोठा तलाव दिसतो. या पायवाटेने उंचवट्यावर न चढता डाव्या बाजुने सरळ गेल्यावर दोन भग्न बुरुज दिसतात. यापैकी एका बुरुजाखाली विखरलेल्या दगडात दोन भागात तुटलेला शरभाच शिल्प असलेला दगड पहायला मिळतो. दगडाच्या एका तुकड्यावर शरभाच डोक व धड कोरलेले असून पाय व नख्या दुसऱ्या दगडावर दिसतात. या शरभ शिल्पाच्या समोर दुसरे शरभशिल्प पडलेले दिसते. या दोन भग्न बुरुजांच्या मध्ये पीराची कबर असुन या कबरीसमोर तीन ओळींचे फारसी लिपितील दोन शिलालेख कोरलेले दगड दिसतात. या दर्ग्यामागे शेवाळाने भरलेला गडावरील तिसरा तलाव असून त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. दर्गा पाहून झाल्यावर त्याला वळसा घालून उजवीकडे जावे. या वाटेने पुढे गेल्यावर एक कमान लागते. हि कमान व आधीचे दोन उध्वस्त बुरुज व त्यावरील शरभशिल्पे पहाता गडाचे हे टेकाड म्हणजे बालेकिल्ला असावा व या बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या आत राजपरिवाराच्या इमारती असाव्यात असे वाटते. टेकाडाला वळसा घालत ही पायवाट दर्ग्यामागे दिसणाऱ्या इमारतींकडे जाते. या भागात प्रचंड प्रमाणात झाडी वाढलेली असुन या झाडीतील अवशेष शोधणे व पाहणे मोठे जिकरीचे आहे. सर्वप्रथम एक खिडकी व घुमट असलेली इमारत दिसते. झाडीमुळे या इमारतीच्या समोरील बाजुस जाणे शक्य नसल्याने खिडकीतून वास्तूत प्रवेश करून हि वास्तू पहावी. या वास्तुच्या आतून डाव्या बाजुने पुढे गेल्यावर एक नक्षीदार सज्जा असलेला बुरुज पहायला मिळतो. या बुरुजावर एक अनोखे शरभाशिल्प कोरलेले आहे पण ते बुरुजाच्या बाहेरील बाजुने पाहायला मिळते. ह्या शरभाला शिंगे असून तीन पायांना धारदार नखं कोरलेली आहेत. ह्या शरभाने सर्वात पुढच्या पायात हत्ती पकडला असून शरभाच्या गळ्यात घुंगरू व पाठीवर बैलाप्रमाणे झूल घातलेली असून झुपकेदार शेपूट आहे. उजव्या बाजूस काही अंतर दाट झाडीतून चालत गेल्यावर अनेक कमानी असलेला अंबरखाना अथवा राणी महाल पहायला मिळतो. याची वरील बाजु कोसळलेली असुन झाडीमुळे अवशेष नीटपणे ओळखु येत नाहीत. त्याच्या समोर अजुन २ इमारतींचे अवशेष दिसतात. राणी महालाच्या पुढील उंचवट्यावर एक मस्जिद असुन हा गडावरील सर्वात उंच भाग असल्याने येथुन गडाचा व इतर बराचसा परिसर नजरेत येतो. मस्जिदीच्या उंचवट्यावरून खाली उतरून १० मिनिटात तलावांच्या मधल्या वाटेने जंजाळा गावाकडे जाता येते. येथे आपली गड फेरी पूर्ण होते. या किल्ल्याचा विस्तार, त्यावरील अवशेष व ३ तलाव पहाता या किल्ल्यावर मोठया प्रमाणावर राबता असावा. संपुर्ण जंजाळा किल्ला पहाण्यासाठी ३ ते ४ तास लागतात. तेथून घटोत्कच लेणी पाऊण तासांवर असुन लेणी पहाण्यास अर्धा तास व लेणी पाहून जंजाळा गावात जाण्यास पाऊण तास लागतो. जंजाळा गावाचे पूरातन नाव जिंजाला होते. घटोत्कच लेण्यातील शिलालेखात अशमाकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकटाक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.स. ५ व्या शतकात खोदल्याची माहिती आहे. इ.स.१५५३मध्ये अहमदनगरच्या बुऱ्हाण निजामशहाने हा गड जिंकून घेतला. त्यानंतर इ.स.१६३१ मध्ये शहाजहानने हा किल्ला जिंकला. गड वनखात्याच्या ताब्यात असल्याने झाडे तोडण्यास बंदी आहे त्यामुळे गडावर प्रचंड प्रमाणात झाडी वाढत चालली आहे व या झाडीनेच किल्ल्यांच्या अवशेषांचा घास घेतला आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!