JAIGAD
TYPE : COASTAL FORT
DISTRICT : RATNAGIRI
HEIGHT : 195 FEET
GRADE : EASY
महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. हि किनारपट्टी संरक्षित करण्यासाठी समुद्राच्या आत तसेच किनाऱ्यावर विविध राजसत्तांचा काळात अनेक किल्ले बांधण्यात आले. अरबी समुद्रात जयगड खाडीमार्गे चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या खाडीच्या उत्तरेला विजयदुर्ग तर दक्षिणेला जयगड या किल्ल्यांची निर्मिती केली गेली. रत्नागिरी जिल्ह्यात असणारी हि दुर्गजोडी शास्त्री नदीच्या मुखाशी असलेल्या डोंगर उतारावर वसलेली असुन जयगडचा बालेकिल्ला हा समुद्राला लागुन असलेल्या २०० फुट उंच टेकडीवर बांधला आहे. डोंगरी किल्ले ज्याप्रमाणे एखाद्या खिंडीने वेगळे होतात त्याप्रमाणे हे दोन्ही किल्ले शास्त्री नदीच्या पात्राने वेगळे झाले आहेत. जयगड हे रत्नागिरी तालुक्यातील सर्वात शेवटचे गाव असुन खाडी पलीकडे गुहागर तालुक्याला सुरुवात होते. मुंबई-गोवा सागरी वाहतुक चालु असताना जयगड एक महत्त्वाचं बंदर होतं. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर ओलांडल्यावर जयगडाला जाण्यासाठी निवळी फाटा लागतो.
...
येथून निवळी-जयगड हे अंतर ४४ किलोमीटर आहे. रत्नागिरीहुन गणपतीपुळे- मालगुंड मार्गेही जयगडला जाता येते. हे अंतर ४५ किलोमीटर आहे. जयगड गाव किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले असुन गावात जाणाऱ्या फाट्यावरील पोलीस चौकीपासून पाच मिनिटांत आपण गाडीरस्त्याने बालेकिल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचतो. जयगड हा बालेकिल्ला व त्याखाली पडकोट असलेला परिपूर्ण असा किल्ला आहे. जयगडची रचना यशवंतगड, गोपाळगड यांच्यासारखीच असुन डोंगराच्या पठाराकडील भागात भक्कम तटबंदीचा बालेकिल्ला व समुद्राकडे उतरत जाणारी पडकोटाची तटबंदी अशी याची बांधणी आहे. पठार समुद्रात काहीसे आत घुसलेले असल्यामुळे हा किल्ला उत्तर, पूर्व आणि पश्चिम या तिन्ही बाजूंनी समुद्राच्या पाण्याने वेढलेला आहे. किल्ल्याभोवती पंधरा फूट लांबीचा व तितक्याच खोलीचा कातळकोरीव कोरडा खंदक असुन शत्रू तटाला येवून भिडू नये म्हणून हा खंदक पठारावर बालेकिल्ल्या भोवती खोदलेला आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडून तटबंदीला वळला घालून गेलेला हा खंदक दोन्ही बाजुंनी खालपर्यंत गेलेला आहे. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूस खंदकात पडकोटाचा दरवाजा असुन हि वाट परकोटातुन खाली जयगड बंदराकडे जाते. किल्ल्याचा मुख्य दरवाजा मजबूत अशा दोन बुरुजांमधे लपवलेला असुन प्रवेशव्दारावर दोन बाजूला कमळाची फुले कोरलेली आहेत. या दरवाजावर काही वर्षापुर्वीपर्यंत सीमाशुल्क खात्याचे दोन मजली विश्रामगृह होते पण सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे. बुरुजावारच विश्रामगृह बांधल्याने बुरुजाच्या बांधकामाची मोठया प्रमाणात वाताहत झालेली आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या या संपुर्ण गडाचे क्षेत्रफळ साधारण १८ एकर असुन बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ५ एकर तर परकोटाचे क्षेत्रफळ १३ एकर इतके आहे. परकोटाचा बराचसा भाग खाजगी मालमत्तेत आहे. बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा पुर्वाभिमुख तर परकोटाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. याशिवाय बालेकिल्ल्याला समुद्राच्या बाजुने दक्षिण दिशेला अजुन एक लहान दरवाजा असुन परकोटाला दोन अतीरिक्त दरवाजे व एक लहानसा चोर दरवाजा आहे. मुख्य दरवाजातुन आत शिरल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकऱ्याच्या देवड्या असुन आत आल्यावर समोरच डावीकडील तटबंदीला लागुन एक प्रशस्त कोठार दिसते. या कोठाराशेजारी एका पायऱ्या असलेल्या वास्तुचा चौथरा दिसुन येतो. कोठाराच्या अलीकडून दरवाजाच्या वरील बाजूस जाण्यासाठी पायऱ्या असुन तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग असे दगडी जिने आहेत. एका ठिकाणची पडझड वगळता किल्ल्याची तटबंदी आजही पुर्णपणे शिल्लक असल्याने सर्वप्रथम तटावरून संपुर्ण गडाला फेरी मारून घ्यावी व नंतर अंतर्गत किल्ला पाहावा. किल्ल्याची जांभा दगडापासून बनविलेली मजबूत तटबंदी व बुरुज आजही सुस्थितीत आहेत. तटबंदीत व त्यामधील गोलाकार बुरुजात जागोजाग माऱ्याच्या जागा केलेल्या आहेत. तटावर चढुन गडफेरीला सुरवात केल्यावर दरवाजापासून दुसऱ्या बुरुजावर सीमाशुल्क खात्याची उध्वस्त कौलारू इमारत आहे. या इमारतीपासून दोन बुरुज पार केल्यावर थोड्या प्रमाणात तटबंदी ढासळलेली असल्याने हा भाग थोडा सांभाळून पार करावा किंवा खाली उतरून जिन्याने परत फांजीवर चढावे. येथुन एक बुरुज पार केल्यावर आपल्याला गडावरील सर्वात उंच असणारा छप्पर नसलेला तीन मजली (तळ मजला धरून) बुरुज लागतो. हा बुरुज माडी बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजात जाण्यासाठी तटावर दोन्ही बाजूस दरवाजे असुन बुरुजात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या व तोफ़ांचा मारा करण्यासाठी खिडक्या आहेत. या बुरूजावरून संपूर्ण खाडीचा परिसर नजरेस पडतो. या नंतरच्या बुरुजावर इंग्रजांच्या काळात बांधलेली साधारण त्रिकोणी आकाराची इमारत दिसते. हि इमारत म्हणजे जहाजांना दिशा दाखविण्यासाठी किल्ल्यावर असणारा ब्रिटीश काळातील जुना दीपस्तंभ आहे. हा दीपस्तंभ १९३२ सालापर्यंत वापरात होता. या बुरुजाखाली किल्ल्याचा समुद्राच्या बाजुला असणारा दुसरा लहान दरवाजा असुन या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. येथेदेखील दरवाजा शेजारी तटबंदीला लागुन एक मोठे कोठार दिसते. हे पाहुन झाल्यावर परत फांजीवर चढावे व तटाला फेरी मारत अवशेष पहात आपण जेथुन तटावर चढलो तिथे यावे. या भागात तटावर आपल्याला एक शौचकुप पहायला मिळते. सन १८६२ मधील एका संदर्भानुसार किल्ल्यावर ५५ तोफा होत्या पण आज त्यातील एकही तोफ तटबंदीवर अथवा बुरुजावर दिसत नाही. संपुर्ण गडाच्या तटबंदीत एकूण २८ बुरुज असुन यातील बारा बुरूज बालेकिल्ल्याला तर उर्वरित सोळा बुरुज परकोटाच्या तटबंदीत खाडीलगत आहेत. बुरूजावरून खाली आल्यावर समोरच एक चौकोनी अंदाजे पन्नास फूट खोल विहिर असुन या विहिरीशेजारी एक लहानसे टाके बांधलेले आहे. तटबंदीच्या डाव्या कोपऱ्यावर अजुन एक कोठार असुन आतील अवशेष पहाता हे दारुगोळा कोठार अथवा लोहारखान्याची इमारत असावी. येथुन बालेकिल्ल्याच्या मध्यभागी एक छत नसलेली तीन मजली उंच इमारत दिसुन येते. स्थानिक लोक या इमारतीस कान्होजी आंग्रेचा वाडा अथवा राजवाडा म्हणुन ओळखतात पण या इमारतीची एकंदर रचना पहाता हे प्रशासकीय कार्यालय आहे. या इमारतीच्या डाव्या बाजूस चुना बनविण्याचे मिश्रण एकत्रित करण्यासाठी लागणारा हौद असुन त्यावर पाणी सोडण्यासाठी असणारी पन्हाळी व शेजारी चुना मळण्याचा घाणा दिसुन येतो. गडाच्या डाव्या बाजुच्या तटबंदीखाली सैनिकांना रहाण्यासाठी ओवऱ्या दिसुन येतात. याच्या पुढील भागात ओबडधोबड दगडांचे एक कुंपण असुन या कुंपणाच्या आत दोन चौकोनी बांधीव खोल विहिरी आहेत. या विहिरींमध्ये बारामाही पिण्यायोग्य पाणी असले तरी ते काढण्याची सोय मात्र नाही. या विहिरीसमोर दोन दगडी ढोणी आहेत. वाडयाच्या उजव्या बाजुला दोन वास्तुंचे चौथरे असुन अलीकडील चौथऱ्यामागे पावसाचे पाणी साठवण्यासाठी दोन भागात विभागलेला एक भलामोठा चौकोनी हौद बांधलेला आहे. दुसऱ्या चौथऱ्यासमोर एक समाधी आहे. हौदाला लागुन उजव्या बाजुला खास कोकणी ढंगाचे कौलारू गणेश मंदिर आहे. मंदिरात गणेशाची तसेच हनुमानाची मुर्ती आहे. मंदिरासमोरील चौथऱ्यावर पूर्वी दोन दीपमाळा होत्या ज्यातील सध्या एकच शिल्लक असुन दुसऱ्या दीपमाळेचा केवळ पाया शिल्लक आहे. दीपमाळेजवळ तटाला लागुनच किल्ल्याच्या बांधकामासाठी बळी गेलेल्या जयबाचे स्मारक आहे. मंदिरामागे एक मोठी पडकी वास्तु तग धरून उभी आहे. या वास्तुचे आकारमान व उर्वरित अवशेष पहाता हि वास्तु म्हणजे किल्ल्यावरील सदर व किल्लेदाराचा चौसोपी वाडा असावा. वाड्याच्या उजव्या भागात दोन कमानी असुन त्यातील एक कमान मोडकळीस आलेली आहे. डाव्या बाजूच्या वाड्याची एकमेव कमान मात्र आजही सुस्थितीत आहे. वाडयाच्या मागील बाजूस काही अलीकडील काळात बांधलेली घरे तसेच एक तुळशी वृंदावन दिसुन येते. येथे आपली बालेकिल्ल्याची फेरी पूर्ण होते. बालेकिल्ला पाहण्यास एक तास पुरेसा होतो. बालेकिल्ला पाहुन झाल्यावर परकोट पहाण्यासाठी मुख्य दरवाजातून बाहेर पडून पडकोटाच्या दरवाजात शिरावे. खंदकामधील या दरवाजातून आत गेल्यावर खंदकाच्या टोकाला खालच्या भागात जाण्यासाठी पायऱ्या व बांधीव दगडी वाट आहे. पण खाली न जाता डाव्या बाजुला बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या दिशेने गेले असता तटाखाली जांभ्या दगडातील नैसर्गिक गुहा आहे. यात जयगड ग्रामस्थ घाटगे यांची कुलदेवता मोहमाया देवीचे मंदिर आहे. या मंदिरात वर चढण्यासाठी दगडात खाचा केलेल्या आहेत. या गुहेच्या पुढील बाजूस काही अंतरावर वरच्या बाजूस एक आणि खालच्या बाजूस एक असे दोन साधारण वीस फ़ूट उंचीचे दगडी खांब पाहायला मिळतात. जमिनीच्या वरील पातळीपासून किती फुट खाली खोदले याचे मोजमाप करण्यासाठी ते सोडले आहेत. येथुन परत परकोटाच्या दरवाजाजवळ येऊन परकोटाच्या तटबंदीवर चढावे. तटबंदीच्या या टोकाला एक बुरुज असुन तेथुन बालेकिल्ल्याचा दरवाजा आणि खाडी व खालचे बंदर यावर नजर ठेवता येते. या तटबंदीवरून खाली उतरत गेल्यावर आपण परकोटाच्या उत्तरेतील तटबंदीत असणाऱ्या दरवाजावर पोहोचतो. हा दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला असुन दरवाजाच्या आतील बाजुस तटाला लागुनच हनुमानाचे मंदिर आहे. या वळणदार दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाशेजारी असणारा एक बुरुज मोठया प्रमाणात ढासळलेला आहे. दरवाजाबाहेर खालच्या बाजूला एक विहिर असुन समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या या विहिरीचे पाणी मात्र गोड आहे. दरवाजाबाहेरुन तटबंदीच्या दिशेने खाली चालत गेल्यावर तटबंदीत असलेला एक लहानसा चोर दरवाजा दिसतो. या दरवाजातून आत शिरल्यावर समोरच एक लहान आयताकृती बांधीव विहीर दिसते. सध्या हि विहीर कोरडी पडलेली आहे. येथुन तटबंदीवरून चालत आपण परकोटाच्या समुद्राकडील सर्वात मोठया बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाला समुद्राच्या दिशेने तोफेच्या मारगीरीसाठी आठ खिडक्या असुन मध्यभागी तळघर आहे. बुरुजाच्या अलीकडील भागातील तटबंदी ढासळली असुन येथील अवशेष पहाता येथे बोटीसाठी धक्का तसेच येथुन थेट समुद्रात उतरणारा दरवाजा असल्याचे दिसुन येते. या धक्क्याच्या व दरवाजाच्या रक्षणासाठी हा बुरुज बांधलेला आहे. बुरुज पाहून समुद्राकडील या तटबंदी वरूनच गडफेरीला सुरवात करावी. या गडफेरीत आपल्याला तटावर काही शौचकुप पहायला मिळतात. या तटबंदीच्या मध्यभागी एक भलामोठा बुरुज असुन त्याला आतील बाजुने वेगळी तटबंदी दिलेली आहे. बुरुजावर एक लहानसे शिवमंदीर आहे. या बुरुजावर एका वास्तुचे अवशेष असुन बुरुजावर येण्यासाठी जमीनीच्या दिशेला एक लहान दरवाजा आहे व या दरवाजाशेजारी दोन लहान बुरुज आहेत. तटबंदीवरून फेरी मारत आपण परकोटाच्या दक्षिणेतील तटबंदीत असणाऱ्या दरवाजावर पोहोचतो. हा दरवाजा दोन बुरुजांमध्ये बांधलेला असुन दरवाजाच्या खालील बाजूस समुद्राच्या दिशेला एक बांधीव टाके आहे. समुद्रातील बोटींना पाणीपुरवठा करण्यासाठी या टाक्याचा वापर होत असावा. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी किल्ल्याच्या बाहेरील बाजुस पायऱ्या बांधलेल्या आहेत. दरवाजा पाहुन मागे फिरल्यावर आपण परकोटात असलेल्या वस्तीत येतो. या वस्तीत जिर्णोध्दारीत शिवमंदिर आहे. परकोटात एकुण ५-६ विहिरी आहेत पण त्यातील काही अलीकडील काळातील आहेत. वस्तीतील पायऱ्यांनी परकोटाच्या दरवाजाकडे येताना वाटेत डाव्या बाजूला काही समाधी व तुळशी वृंदावन पहायला मिळतात. परकोटाच्या दरवाजात आल्यावर आपली संपुर्ण गडफ़ेरी पूर्ण होते. परकोट पहाण्यास दोन तास लागतात. संपुर्ण जयगड किल्ला फिरण्यास एकुण तीन तास लागतात. जयगडाची उभारणी केव्हा आणि कुणी केली याविषयी ठोस पुरावे उपलब्ध नाहीत परंतु याची बांधणी शिवपुर्वकाळात झाली. १३४७ मध्ये अब्दुल मुज्जफर अल्लाउद्दीन बहामनी यांच्या आधिपत्याखाली हा किल्ला होता. त्यानंतर त्याचे उल्लेख मिळतात ते १६ व्या शतकात. बहामनी राजवटीच्या अस्तानंतर विजापुरच्या अदिलशाहाच्या कालखंडात जयगड किल्ल्याचे बरेचसे बांधकाम झाले. याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते कि बांधकाम चालु असताना एक बुरुज काही केल्या तग धरेना त्यासाठी उपाय म्हणून नरबळी द्यावा असे ठरले. यावर जयबा हा बळी जाण्यास तयार झाला व त्याच्या नावावरून गडाला जयगड नाव देण्यात आले. आदिलशहाला जयगडवर आपला अधिकार फार काळ टिकवता आला नाही. १५७८-८० च्या सुमारास संगमेश्र्वरच्या नाईकांनी तो विजापुरकरांकडून जिंकून घेतला. १५८५ आणि १५८८ मध्ये विजापुरकरांनी पोर्तुगीजांच्या मदतीने तो पुन्हा जिंकण्याचे प्रयत्न केले. पण दोन्ही वेळेस त्यांच्या पदरी अपयशच आले. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या कालखंडात किल्ल्यावर मराठ्यांचे स्वामित्त्व आले पण मराठ्यांनी किल्ला कसा व कधी घेतला ते कळत नाही. इ.स.१६९८ला राजाराम महाराजांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांना विजयगडाचे अधिकार दिले. १६९८ पासून कान्होजी आंग्रे यांच्याकडे असणारा हा किल्ला नंतर काही काळ सिद्दीकडे गेला तो १७३३ साली मे महिन्यात मराठयांच्या ताब्यात आला. सन १७१३ साली बाळाजी विश्वनाथ पेशव्याने कान्होजी आंग्रे व शाहु महाराजांमधे तह घडवून आणला त्याप्रमाणे कान्होजीकडे दहा किल्ले दिले त्यामध्ये जयगड देखील होता. सन १७५६ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने तुळाजी आंग्रे यांचा पराभव करून जयगड आपल्या ताब्यात घेतला. नानासाहेब पेशवे व आंग्रे यांच्यातील भांडणाचा फायदा करून घेत इंग्रजांनी कोकण किनारपट्टीवर आपले सामर्थ्थ वाढविले. इ.स. १८१८ मध्ये इंग्रज मराठा युद्धानंतर हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. रत्नागिरी किंवा गुहागर येथून एका दिवसात विजयगड व जयगड हे किल्ले पाहुन परत जाता येते.
© Suresh Nimbalkar