JAFRABAD JALNA

TYPE : CITY FORT

DISTRICT : JALNA

HEIGHT : 0

केळणा व पुर्णा नदीच्या संगमावर वसलेले जाफराबाद हे जालना जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर. मध्ययुगीन काळापासूनच जाफराबाद हे महत्वाचे शहर असुन या ठिकाणी एक सुंदर किल्ला आहे हे आजही अनेक दुर्गप्रेमीना माहीत नाही आणी केवळ यामुळे या किल्ल्याच्या वाटेला उपेक्षा आलेली आहे. पुर्वी नदीकाठी किल्ला व बाहेर शहर अशी रचना असलेल्या या किल्ल्यात आता आतील बाजुस मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत असल्याने किल्ल्याची दुर्दशा होत चालली आहे. किल्ल्याच्या आत वाढत चाललेली वस्ती याशिवाय एक दोन ठिकाणी झालेली तटबंदीची जुजबी पडझड वगळता संपुर्ण किल्ला आजही चांगल्या स्थितीत आहे. हि स्थिती कायम रहाण्यासाठी मात्र या किल्ल्याचे संवर्धन व देखरेख होणे फार गरजेचे आहे. तालुक्याचे ठिकाण असलेले जाफराबाद हे शहर जालना शहरापासुन ४८ कि.मी.अंतरावर तर बुलढाणा येथुन ६० कि.मी. अंतरावर आहे. छत्रपती संभाजीनगर ते जाफराबाद हे अंतर साधारण ११० कि.मी. आहे. जाफराबाद बस स्थानकात उतरल्यावर चालत ५ मिनिटात आपण नदीकाठी असलेल्या या किल्ल्याच्या उत्तराभिमुख मुख्य दरवाजाजवळ पोहोचतो. ... घडीव दगडात बांधलेल्या या दरवाजाची कमान व त्यावरील नक्षीदार कोनाडे आजही सुस्थितीत असुन दरवाजाच्या वरील भागात असलेली वास्तु मात्र नष्ट झाली आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन काही अंतरावर तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाच्या उजवीकडे काही अंतरावर मोठा गोलाकार बुरुज असुन डावीकडे तटाला लागुन असलेल्या घरांमुळे काही दिसुन येत नाही. २५ फुट उंचीची हि संपुर्ण तटबंदी दगडात बांधलेली असुन तट व बुरुजाच्या वरील भागात चर्या बांधलेल्या आहेत. तटाच्या वरील भागात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या असुन बुरुजावर तोफांसाठी झरोके पहायला मिळतात. अष्टकोनी आकाराचा हा किल्ला ४५ एकरवर पसरलेला असुन संपुर्ण किल्ल्याच्या तटबंदीत लहानमोठ्या आकाराचे एकुण १६ बुरुज आहेत. प्रत्येक कोपऱ्यावर एक असे आठ व चार दरवाजा पासुन काही अंतरावर दोन याप्रमाणे आठ अशी यांची रचना आहे. यातील १२ बुरुज गोलाकार आकाराचे असुन मुख्य दरवाजाजवळ म्हणजे दिल्ली दरवाजा शेजारी असलेले दोन बुरुज षटकोनी आकाराचे आहेत. हे दोन्ही बुरुज घडीव दगडात बांधलेले असुन त्यावर नक्षीकाम केलेले आहे. संपुर्ण किल्ल्याच्या तटबंदीमध्ये चार दिशांना चार असे लहानमोठ्या आकाराचे एकुण चार दरवाजे असुन दोन महादरवाजे तर दोन लहान दरवाजे खिडकी म्हणुन ओळखले जातात. यातील पश्चिम दिशेला व उत्तर दिशेला महादरवाजा असुन उर्वरीत दिशांना लहान दरवाजे आहेत. किल्ल्याचे मुख्य दरवाजे इतके प्रशस्त आहे कि आजही यातुन मोठी चारचाकी वाहने सहजपणे पार होतात. किल्ल्याचे दरवाजे व अवशेष आतील वस्तीत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले असल्याने ते पहाण्यासाठी शक्य झाल्यास एखादा स्थानिक अथवा लहान मुलगा वाटाड्या म्हणुन सोबत घ्यावा. मुख्य दरवाजाने आत शिरल्यावर सरळ रस्त्याने साधारण ४०० पाउले चालल्यावर डावीकडे एक गल्ली दिसते. या गल्लीतुन सरळ गेल्यावर आपण नदीकाठी असलेल्या किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजाजवळ पोहोचतो. या दरवाजाला खिडकी दरवाजा म्हणुन ओळखत असले तरी दुहेरी कमान असलेला हा दरवाजा बऱ्यापैकी मोठा आहे. दरवाजाच्या डावीकडे तटाला लागून तटावर तसेच दरवाजाकडे जाण्यासाठी दोन बाजुस पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी वर चढुन तटावर गेले असता नदीच्या दिशेला असलेल्या तटावरून फेरी मारता येते. या तटबंदी मधील बुरुजावर तोफा ठेवण्याची तसेच पहारेकरी राहण्याची सोय दिसुन येते. दरवाजाबाहेर पडुन नदीपात्रात गेले असता नदीच्या दिशेला असलेली किल्ल्याची संपुर्ण तटबंदी व त्यातील बुरुज पहाता येतात. हि तटबंदी व बुरुज साधारण ३० फुट उंच आहे. नदीच्या दिशेला असलेली हि तटबंदी आजही भक्कम असुन यात दोन मोठे व दोन मध्यम आकाराचे असे चार बुरुज आहेत. हा दरवाजा पाहुन परत मुख्य रस्त्यावर येऊन सरळ गेल्यावर आपण एका चौकात पोहोचतो. या चौकातुन डावीकडे गेले असता आपण निजामकालीन विश्रामगृहाकडे पोहोचतो. किल्ल्यातील हा भाग उंचावर असुन येथुन पुर्णा नदीचे पात्र व दूरवरचा काही प्रदेश नजरेस पडतो. स्थानिक लोक या ठिकाणाला किल्ला म्हणुन ओळखत असल्याने हा बहुदा किल्ल्याच्या आतील बालेकिल्ला असावा. मराठवाड्याचा हा भाग स्वतंत्रपुर्व काळात हैद्राबाद निजामाच्या ताब्यात असल्याने येथे येणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी हे विश्रामगृह बांधले गेले. वापरात नसल्याने सध्या ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त आहे. या विश्रामगृहाच्या आवारात एका चौथऱ्यावर खूप मोठी बांगडी तोफ ठेवलेली असुन जवळच पर्शियन भाषेतील तीन शिलालेख आहेत. येथे किल्ल्यातील वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी निजामाच्या काळात बांधलेली एक विहीर आहे. येथुन पुन्हा चौकात येऊन उजवीकडे वळल्यावर आपण वस्तीबाहेर पडतो. येथे पुन्हा डावीकडे वळल्यावर आपण किल्ल्याच्या तटबंदीमध्ये असलेल्या तिसऱ्या दरवाजाजवळ पोहोचतो. मध्यम आकाराचा हा दरवाजा घडीव दगडात बांधलेला असुन त्याच्या कमानीची काही प्रमाणात पडझड झालेली आहे. या तटबंदी वर सुंदर चर्या बांधलेल्या आहेत. दरवाजाबाहेर पडले असता तटबंदीमध्ये काही अंतरावर असलेला बुरुज नजरेस पडतो. हा दरवाजा पाहुन झाल्यावर पश्चिम दिशेला असलेल्या किल्ल्याच्या चौथ्या व शेवटच्या मुख्य दरवाजा जवळ जावे. किल्ल्याचा हा सर्वात सुंदर दरवाजा असुन बहुतांशी अवशेष या दरवाजाजवळ आहेत. दरवाजा शेजारी षटकोनी आकाराचे दोन बुरुज असुन आतील बाजुस मोठ्या प्रमाणात दालने होती पण सध्या त्यांची पडझड झालेली आहे. दरवाजा शेजारी तटाला लागून पायऱ्या असुन या पायऱ्यांनी तटावर गेले असता तेथे सैनिकांना रहाण्यासाठी बराकी पहायला मिळतात. या दरवाजावरून किल्ल्याचा बहुतांशी भाग तसेच दुरवर गेलेली तटबंदी नजरेस पडते. येथे आपली किल्ल्याची अंतर्गत फेरी पुर्ण होते. याशिवाय किल्ल्याच्या उत्तर दिशेला असलेल्या मुख्य दरवाजाबाहेर मकबरा मशीद नावाची एक मशीद असुन या मशिदीच्या आवारात शाही घराण्यातील काही व्यक्तींची थडगी पहायला मिळतात. मकबरा मशीद हि जुनी मशीद असुन या मशिदीच्या मागील बाजुस अजून एक विहीर आहे. या विहिरीत एका बाजुला आत उतरण्यासाठी पायऱ्या असुन पायऱ्यांच्या वाटेवर दोन बाजुस दोन ओवऱ्या व वरील बाजुस कमानिवजा बांधकाम आहे. विहिरीच्य दुसऱ्या बाजुस आत दोन मजले असुन त्यावरील नक्षीकाम पहाता हे उन्हाळ्याच्या दिवसात थंड हवा खाण्याचे ठिकाण असावे. सध्या या विहिरीत घाणीचे साम्राज्य आहे. संपुर्ण किल्ला व इतर वास्तु पहाण्यासाठी साधारण दोन तास लागतात. जाफराबाद किल्ल्याची बांधणी शाहजहानच्या काळात झाली असावी कारण येथील विहिरीत असलेल्या पर्शियन शिलालेखातील नोंदीप्रमाणे शहाजहानच्‍या आदेशानुसार किल्ल्याची तटबंदी बांधताना या विहिरीचे बांधकाम मुस्‍तफाखान याने हिजरी सन १०४०म्हणजे इ.स. १६३० मध्‍ये केल्याचे दिसून येते. तर येथील मशीद मध्ये असलेल्या दुसऱ्या पर्शियन शिलालेखात औरंगजेबच्‍या आदेशाने रिजाजत खान याने हिजरी सन १०७६ म्हणजे इ.स. १६६४ मध्ये हि मशीद बांधल्याची नोंद येते. जाफराबाद शहराचे नामकरण ओरंगजेबचा सरदार जाफरखान याच्या नावावरून झाले असुन त्याला या गावासोबत इतर ११५ गावाची जहागिरी होती. त्याने या शहराची उभारणी करून त्यास स्वतःचे नाव दिले असले तरी हा किल्ला त्यापूर्वी अस्तिवात असल्याचे येथील शिलालेखावरून दिसुन येते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!