IBRAHIMPUR

TYPE : ANCIENT SHIVMANDIR/ JAIN MANDIR

DISTRICT : KOLHAPUR

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात इब्राहिमपूर नावाचे लहानसे गाव आहे. गावाचे नाव जरी मुस्लीम धाटणीचे असले तरी या गावात चालुक्यकालीन प्राचीन मंदीरे आहेत. हि सर्व मंदीरे एकमेकांजवळ असली तरी यातील एक मंदीर शिवमंदिर असुन उर्वरित दोन्ही जैनमंदिरे आहेत. इब्राहिमपूरला जाण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गडहिंग्लज गाठावे लागते. गडहिंग्लज- अडकुर- इब्राहिमपूर असा गाडीमार्ग असुन गडहिंग्लजपासुन हे अंतर साधारण १९ कि.मी. आहे. प्राचीन मंदिराचा हा समुह गावाबाहेर असुन मंदिराजवळ आल्यावर सर्वप्रथम नजरेस पडते ते ग्रामदेवता पावणाईदेवीचे मंदीर. कौलारू बांधणी असलेले हे मंदीर अलीकडील काळातील असले तरी या मंदिरात काही विरगळ ठेवलेल्या आहेत. या मंदिरामागे असलेल्या गर्द झाडीत काही अंतरावरच शिवमंदिर आहे. भुमीज शैलीत बांधलेल्या या मंदिराचे सभामंडप,अंतराळ व गर्भगृह असे तीन भाग पडले असुन मंदिराचे दगडी बांधकामातील शिखर आजही कायम आहे. मंदिराचे सभागृह दगडी खांबावर तोललेले असुन बाह्यांगावर कोणतेही कोरीवकाम दिसून येत नाही. ... मंदिराच्या परीसरात खूप मोठया प्रमाणावर विरगळ पहायला मिळतात. मंदिराच्या सभामंडपात कार्तिकेय व शेषशायी विष्णुचे झीज झालेले शिल्प असुन इतर काही मुर्ती ठेवलेल्या आहेत. यात काही सतीशिळा व नागशिल्पांचा समावेश आहे. गर्भगृहाच्या दरवाजाच्या चौकटीच्या तळाशी कीर्तीमुखायेवजी दोन गजशिल्प कोरलेली असुन ललाटबिंबावरील गणपतीच्या वरील बाजुस दोन शरभ कोरलेले आहेत. गर्भगृहाबाहेर मंदिराच्या अंतराळात चंद्रशिळा कोरलेली असुन गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. या मंदिरापासुन काही अंतरावर एकमेकांशेजारी दोन जैन मंदिरे असुन मंदिरातील मूर्ती वगळता या दोनही मंदिरावर कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम दिसून येत नाही. हि दोनही मंदिरे एका चौथऱ्यावर उभारलेली असुन मंदिराचे सभामंडप व गर्भगृह असे दोन भाग पडले आहेत. या दोनही मंदिराचा सभामंडप घडीव खांबावर तोललेला आहे. मंदिराचा हा संपुर्ण परीसर पहाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. शिवमंदिराच्या परीसरात मोठया प्रमाणावर असलेल्या विरगळ पहाता या ठिकाणी एखादी मोठी लढाई लढली गेली असावी पण इतिहास मात्र याबाबत अबोल आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!