HOTTAL
TYPE : GROUP OF ANCIENT SHIVMANDIR
DISTRICT : NANDED
नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यात असलेल्या होट्टल गावाला ऐतिहासिक वारसाबरोबर ११ व्या शतकातील मंदिरांचा सांस्कृतीक वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर असलेल्या या गावात सिद्धेश्वर, रेब्बेश्वर,सोमेश्वर व परमेश्वर या नावानी ओळखली जाणारी चार प्राचीन मंदिरे आहेत. कल्याणी-चालुक्य राजवटीने बांधलेली हि मंदिरे मूर्तिभंजकांनी विध्वंस केल्याने पडून होती पण पुरातत्व खात्याने यातील सिद्धेश्वर व रेब्बेश्वर मंदिराची अलीकडील काळात पुनर्बांधणी केल्याने हि दोन मंदिरे आज पुन्हा दिमाखात उभी आहेत. मुंबई - देगलूर हे अंतर साधारण ६५० कि.मी. असुन देगलूर या तालुक्याच्या ठिकाणावरून होट्टल गाव १० कि. मी. अंतरावर आहे. रेल्वेने जाण्यासाठी उदगीर हे जवळचे रेल्वेस्थानक असुन उदगीर ते होट्टल हे अंतर ५५ कि.मी.आहे. होट्टल गावात प्रवेश करताना सर्वप्रथम नजरेस पडते ते सिद्धेश्वर मंदिर. चार फूट उंचीच्या चौथऱ्यावर उभारलेले हे पुर्वाभिमुख मंदीर ७२ x ४४ फूट आकाराचे असुन त्याला मुखमंडप, दोन अर्धमंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह हे भाग असुन बाहेरून फेरी मारण्यासाठी प्रदक्षिणापथ आहे.
...
मंदिराचा चौरस सभामंडप ३५ x ३५ फूट आकाराचा असुन त्यात नृत्यगायनाचे कार्यक्रम करण्यासाठी १५ x १५ फुट आकाराची रंगशिळा आहे. मंदिराच्या उत्तर व दक्षिण दिशेला १० x ५ फूट आकाराचा अर्धमंडप असुन संपुर्ण मंडपाचे छत म्हणजे अप्रतिम कोरीव कामाचा अविष्कार आहे. यात भौमितिक नक्षीकाम केलेले असुन सुंदर कीर्तिमुखे कोरलेली आहेत. मंदिराचे गर्भगृह सभामंडपाच्या खालच्या पातळीत असुन गर्भगृहाच्या दरवाजाच्या चौकटीवर पाने,फुले,प्राणी यांची नक्षी कोरली आहे. गर्भगृहाच्या द्वारललाटबिंबावर चालुक्य मंदिरशैलीचे वैशिष्ट्य असलेली गजलक्ष्मी कोरलेली आहे. मंदिराच्या बाह्यांगावर अनेक देवदेवता व सुरसुंदरी कोरलेल्या असुन त्यात षड्भुजी नृत्य गणेशाची एक सुंदर मुर्ती पहायला मिळते. बाह्यांगावरील देवकोष्ठकात शिवाच्या केवल, वृषभारूढ, भैरव, नटेश, अंधकासूरवध स्वरूपातील मुर्ती पहायला मिळतात. गर्भगृहात प्रवेश बंद असताना आतील शिवलिंगावर अभिषेक करता यावा यासाठी मंदिराच्या प्रदक्षिणापथावर दगडी रांजण बसवलेला असुन यात ओतलेल्या पाण्याचा दगडी पन्हाळीतून शिवलिंगावर अभिषेक होतो. या मंदिराबाबत राजा सोमेश्वर द्वितीय (इ.स. १०६८-१०७६) याचा शिलालेख या मंदिरात आहे. लक्ष्मणाने कार्तिक पौर्णिमेला लिहिलेल्या या लेखाच्या मजकुरातून सिद्धुगी या अधिकारी व सामंताने ते देऊळ बांधल्याचे कळते. त्याने स्वतःला महामंडलेश्वर ही पदवी लावली होती. या शिलालेखात “ तेन संस्थापित: स्थाणु: कल्याणे गुणिनां गृहे पुरे चालुक्यचंद्रस्य सोमेश्वरमहिपते: ।।३३।। निष्कं द्रम्मं च भूमिशो ग्रामे ग्रामे पुरे पुरे ददौ तस्मै स देवाय चंद्रराशिगुरो: पुर: ।।३४।। ” अशी अक्षरे येतात. हा शिलालेख नागरी भाषेत पद्यात्मक कोरलेला असून त्यात एकूण ४३ कडवे येतात. पैकी ३३, ३४, ४१ व ४२ क्रमांकाचे कडवे प्रत्येकी दोन ओळींचे व उरलेली ३९ कडवी प्रत्येकी चार ओळींचे म्हणजे एकूण १६४ ओळीत शिलास्तंभाच्या दोन बाजूंवर हा लेख लिहिलेला आहे. या शिलालेखात काळाचा उल्लेख येत नसला तरी हा लेख चालुक्य नृपती सोमेश्वर दुसरा याच्या काळातील म्हणजेच इ.स. १०६८ ते १०७६ काळातील असावा. सुरुवातीला शिवाच्या स्तुतीनंतर गोदावरीची उपनदी असलेल्या मांजरा नदीच्या तीरावरील अगस्ती आश्रमाचे वर्णन सदर शिलालेखात येते. त्यानंतर चालुक्यांचे मांडलिक घराणे वन्हीकुळाची माहिती दिलेली आहे. या कुळातील ढोरराजाने चालुक्य राजा तैल दुसरा व परमार मुंजा यांच्यात झालेल्या लढाईत महत्त्वाची कामगिरी केलेली होती. त्याचा मुलगा उत्तम. उत्तमचा मुलगा कालिचोर आणि कालिचोरचा मुलगा अर्ग याची स्तुती पुढील काही कडव्यात येते. अर्ग यास रैभेय असेही म्हटलेले आहे. त्याचा मित्र सिद्धुगी याने चालुक्यांची राजधानी कल्याणी येथे सिद्धेश्वराचे मंदिर बांधले व या मंदिरासाठी अर्ग याने त्याच्या अधिकारातील हजार गावातून प्रत्येकी एक द्रम्म (सुवर्ण नाणे) व एक निष्क (चांदिचे नाणे) गोळा केले असा उल्लेख या शिलालेखात आहे. याच शिलालेखातील एका कडव्यात शिलालेख करवून घेणाऱ्याने “ कवी हा राजाचा खरा मित्र असतो कारण तोच राजाला त्याच्या काव्यातून अजरामर बनवितो ” असे म्हटलेले आहे. शेवटच्या ओळीत लक्ष्मणाने हा लेख लिहिल्याचा संदर्भ येतो. या मंदिरासमोर काही अंतरावर महादेवाचे दुसरे मंदिर असुन ते चालुक्यांचा एक अधिकारी रेब्बनायकाने बांधल्यामुळे त्याला रेब्बेश्वर नावाने ओळखले जाते. चार फूट उंचीच्या चौथऱ्यावर पुर्वाभिमुख असलेले हे मंदिर ७२ x ५५ फुट आकाराचे असुन त्याचे मुखमंडप, गूढमंडप, अंतराळ व गर्भगृह असे भाग पाडले आहेत. गर्भगृहाच्या दरवाजाच्या ललाट बिंबस्थानावरही गजलक्ष्मी शिल्प आहेत. देवळाचे बाह्यांग व अंतर्भाग सुंदर शिल्पाकृतींनी सुशोभित केल असला तरी सिध्देश्वर मंदिरापेक्षा शिल्प कमी प्रमाणात आहेत. या रेब्बेश्वर मंदिराजवळ २४.१०.११२० चा कन्नड भाषेतील शिलालेख मिळाला असुन यात राजा विक्रमादित्य सहावा याचा अधिकारी रेब्बनायकाने हे देऊळ बांधून त्याला होट्टल व मदनूरचे काही उत्पन्न दान दिल्याचे कळते. या शिलालेखाची अक्षरे“ स्वस्ती श्रीमक चालुक्य विक्रमा वर्शदा ४५ नेया सर्वारी संवत्सरदा अस्वाईजाद अमावस्ये सूर्य ग्र हनादाम्दु कालेयनायकन अनातीयीम बिरारासम श्री स्वयंभू रेब्बेश्वरदेवा रग्गा अल्वा पोट्टाला मा(दा)नुरा अम्का(दे)रेया धारापुरव्वकम मदि बितारु मंगला महा(श्री) ” या शिलालेखातील वर्ष चालुक्य विक्रमवर्ष ४५ सर्वरी अश्वयुज अमावस्या सूर्यग्रहण असे आहे. इ.स. प्रमाणे त्यादिवशी वार होता रविवार दिनांक २४ ऑक्टोबर ११२०. कालेयनायकाच्या आज्ञेवरुन बिरारसाने पोट्टाला आणि मदनुरु म्हणजेच हल्लीचे होट्टल आणि मदनूर हि गावे स्वयंभू रेब्बेश्वराला दान दिल्याचा उल्लेख येतो. यानंतर गावाबाहेरील एका शेतात असलेले तिसरे मंदीर म्हणजे सोमेश्वर मंदिर. त्रिदलीय म्हणजे तीन गर्भगृहाची रचना असणारे हे मंदिर ७६ x ६५ फूट आकाराचे असुन मंदीराचा चौथरा पुर्णपणे मातीत गाडला गेला आहे. हे मंदीर त्रिपुरुषदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवतांचे असुन मंदिरात शिव, विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यासाठी स्वतंत्र अशी तीन गर्भगृहे आहेत. या गर्भगृहांच्या दरवाजावर त्या देवतांचे द्वारपाल असुन ललाटबिंबावर गणेश व गजलक्ष्मी कोरलेली आहे. या मंदिराचे मुखमंडप, गूढमंडप व अंतराळ असे भाग पडले असुन गूढ मंडपाला १४ कोरीव स्तंभ आहेत. मंदिरांचे बाह्यांग देवदेवता व सूरसुंदरींनी जागोजाग सजले असले तरी बाहेर वाढलेल्या दाट काटेरी झुडूपामुळे मंदिराची प्रदक्षिणा करता येत नाही. या मंदीरात विष्णू, नृसिंह, सुर्य यांच्या सुंदर मुर्ती पहायला मिळतात. दुर्दैवाने या मंदिराची सध्याची स्थिती खूपच वाईट असुन समोर उकीरड्यावर अनेक कोरीव शिल्प पडलेली आहेत. शिवाय सांडपाण्याच्या नालीजवळ शिव-हरेश्वराची सुंदर मुर्ती पडली आहे. येथे मंदिराबाहेर दोन्ही बाजुस कोरलेला कन्नड भाषेतील शिलालेख असून त्यावर खालीलप्रमाणे अक्षरे कोरली आहेत. “(स्व)स्ती श्रीमत रेब्बे(यना)य(कं) अवरा........(मम)डळीकन इरेया.......नम अवरा प्रधानरम (श्री)(म)क चालुक्य विक्रमा (व)र्शदा २६ नेया विशा (साम)वत्सरदा कार्तिका सु ८ ब्रिहावारदा उत्तरायणा संक्रातीनिमित्तदल आग्रहा राव इरियेगा साळेया त्राईपुरुषदेवरीगम आलिया.......बाळिया .....सर्वनामस्या......कालगरच्ची धारा.....कामयादी....स्वदत्तम परदरा....वा यो हा संधराम शा... हसरानी “या शिलालेखाच्या दुसऱ्या बाजूची झीज झाली असुन यामध्ये उल्लेख केलेले वर्ष म्हणजे चालुक्य विक्रम वर्ष २६ विशु कार्तिकी ८ गुरुवार, उत्तरायण संक्रांती. इ.स. प्रमाणे या दिवशी तारीख होती ३१ ऑक्टोबर ११०१. संक्रमणाच्या पर्वावर चालुक्य नृपती विक्रमादित्य सहावा याचा अधिकारी रेब्बेनायक व इतरांनी मंदिराच्या दैनंदिन विधीकार्यासाठी त्रैपुरुषदेवालयाला व जवळच्या एरिगे (येरगी) येथील अग्रहाराला दान दिल्याचा उल्लेख या शिलालेखात येतो. या मंदिराजवळ घडीव दगडात बांधलेली पुष्करणी असुन शेवाळाने तिचे पाणी हिरवेगार झाले आहे. यानंतर गावाबाहेर असलेले चौथे मंदिर म्हणजे परमेश्वर मंदिर. तीन फूट उंच चौथऱ्यावर असलेले हे मंदिर ५४ x २५ फुट आकाराचे असुन त्याचे मंडप, अंतराळ व गर्भगृह असे भाग पाडले आहेत. गर्भगृहाच्या ललाटबिंबावर गजलक्ष्मी कोरली असुन संपुर्ण मंदिराभोवती प्रदक्षिणापथ बांधलेला आहे. या मंदिराची बांधणी चालुक्य नृपती विक्रमादित्य सहावा याने केली आहे. होट्टलची हि शिल्पसंपदा संपुर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. मध्ययुगात मराठवाडा व दक्षिणेत सत्ता असणाऱ्या कल्याणीच्या चालुक्यांचे मांडलिक असलेले वान्हीकुलची पोट्टल / होटलूर या नावाने ओळखली जाणारी हि उपराजधानी होती. पोटल म्हणजे उंच डोंगर होय. भौगोलिकदृष्ट्या ते गावच मुळात उंच जागेवर वसलेले असून, भाषाशास्त्रानुसार कन्नड भाषेत 'प' चे 'ह'मध्ये रुपांतर होते. शिवाय या घराण्यातील राजा जयसिंह द्वितीय याच्या शिलालेखात उल्लेखिलेले होट्टलकेरे हे स्थळ म्हणजेच होट्टल होय. त्याचे होट्टलला इ.स. १०३३ मध्ये वास्तव्य होते.
© Suresh Nimbalkar