HIRAKOT

TYPE : GROUND FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 0

GRADE : HARD

रायगड जिल्ह्यातील अलीबागच्या वायव्येस बसस्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर रामनाथ भागात हिराकोट तलावाशेजारी हा भुईकोट उभा आहे. कुलाब्या जवळ किनाऱ्यावर असलेला हा कोट कुलाब्याच्या संरक्षणात्मक घेऱ्यातील भाग होता. इ.स. १८४३ साली आंग्रे संस्थान खालसा झाल्यापासुन हिराकोट किल्ल्यात जिल्हा उपकारागृह आहे. किल्ल्याचे क्षेत्र प्रतिबंधित असल्याने आपल्याला आत प्रवेश मिळत नाही व हा कोट तेथील पोलिसांच्या परवानगीने फक्त बाहेरून बघता येतो. रायगड ग्याझेट मधील नोंदीनुसार किल्ल्याचा पश्चिमाभिमुख दरवाजा आजही शिल्लक असुन काही पायऱ्या चढुन तेथवर जाता येते. दरवाजावर शनीला पायाखाली तुडवणाऱ्या मारुतीचे शिल्प असुन दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. किल्ल्याच्या मागील बाजुस थोडं मोकळं मैदान असुन तिथुन हिराकोट किल्ल्याची भक्कम व अभेद्य तटबंदी नजरेस पडते. किल्ल्याला एकूण सहा बुरुज असुन तटबंदीसाठी प्रचंड अशा घडीव दगडांचा वापर केलेला आहे. ... प्रचंड आकाराचे हे दगड एकमेकावर रचताना चुन्याचा अजिबात वापर केला गेला नाही. हे दगड एकावर एक कसे चढवले असतील हा प्रश्न मनात आल्यावाचून रहात नाही. या भुईकोट किल्ल्याचे आतील क्षेत्र मोकळ्या जागेसह 30 गुंठे आहे. किल्ल्याचा बाहेरील भाग जुनाच असुन आतील भागात सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. किल्ल्यात पुर्वी असणारी विहीर बुजविण्यात आलेली आहे. किल्ल्यासमोर तलाव असुन त्यास हिराकोट तलाव म्हणतात.किल्ला बांधण्यासाठी माती खणुन काढल्याने हा तलाव निर्माण झाला आहे. अलिबाग येथील हिराकोट वास्तूला विशेष इतिहास आहे. सतराव्या शतकाच्या अखेरीस कान्होजी आंग्रे यांनी अलिबाग हे गांव वसवून कुलाबा हे आपलें मुख्य ठाणें बनविलें. आंग्रयांच्या भरभराटीच्या वेळीं या गांवाला विशेष महत्त्व होते. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हा भुईकोट किल्ला १७२० मध्ये बांधला. या किल्ल्यात कान्होजी आंग्रे यांचा खजिना असे. इ.स.१८४० मध्ये २८ मार्चला संभाजी आंग्रे आपल्या आरमारासह साखर या गावी आले व त्यांनी हिराकोट किल्ला जिंकला. .इ.स.१७४० मधे बाजीराव पेशवे यांचे पुत्र बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब ससैन्य कोकणात उतरले होते. बाळाजी बाजीरावने संभाजी आंग्रेच्या सैन्याचा पराभव करुन हा कोट घेतला होता. त्यांचा मुक्काम याच हिराकोटात होता. एके दिवशी बाजीराव पेशव्यांचा नर्मदेकाठी रावेरखेडी मृत्यू झाला आहे ही बातमी दूताकरवी हिराकोटात नानासाहेबांना मिळाली आणि हिराकोटात जाताना पेशवापुत्र असणारे नानासाहेब हिराकोटातून बाहेर पडले ते पेशवा होण्यासाठीच. अलिबागची ग्रामदेवता असलेली कलंबिका देवीची मूर्ती अलिबाग तालुक्यातील नवगावच्या समुद्रात कोळी बांधवांना मिळाली. तिला किनाऱ्यावर आणून तिची स्थापना करून पूजाअर्चा सुरू केली होती. यानंतर सरखेल कान्होजी आंग्रेंनी अलिबागमध्ये ही मूर्ती आणून हिराकोट किल्ल्यात आंग्रे घराण्याची कुलदेवता म्हणुन या कळंबिका देवीची स्थापना करण्यात आली. ३० डिसेंबर १७६१ रोजी हिराकोट किल्ल्यास आग लागली व या आगीत लक्ष्मण आंग्रे व त्यांची दाई जळाली. पुढे ९ ऑगस्ट १७७८मध्ये मध्यरात्री परत हिराकोटला आग लागली व या आगीत किल्ल्यातील वाद व दोन बुरुज जळाले. इ.स.१७८२ नंतर सलग तीन वर्षे हिराकोटला आग लागण्याचे सत्र चालूच राहिले. इ.स.१७९७ला बाबुराव आंग्रे यांनी तोफखान्यासह जयसिंगराव आंग्रे यांच्यावर चढाई केली आणि हिराकोटास वेढा घातला. जयसिंगराव चार-पांच लोक घेऊन कुलाबा किल्ल्यास गेल्यावर पांच ते सहा दिवसांनी बाबुराव आग्रेनी हिराकोट जिंकला. नंतर ३० डिसेंबर १८४३ ला आंग्र्यांचे इथले अधिपत्य संपले व इंग्रजांनी हा कोट घेतला. इथे कारागृह करण्यात आले व आंग्र्यांच्या कुलदैवताला शहरात बालाजी नाक्यावर स्थापना करून मंदिर बांधले. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला हा हिराकोट किल्ला अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. पुरातत्त्व विभागाने अलीकडे त्याला संरक्षित वास्तू म्हणून जाहीर केले आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!