HINGLAJ

TYPE : FORTRESS

DISTRICT : AMRAVATI

HEIGHT : 0

GRADE : EASY

अमरावती जिल्ह्यात गढीकोटांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहे. यात गाविलगड सारखा बलाढ्य किल्ला,अचलपुरचा नगरदुर्ग व आमनेरचा लहानसा किल्ला यांचा सामावेश होतो. या भागात प्रशासकीय कामासाठी गढ्यांची निर्मीती करण्यात आली पण त्याही अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहेत. यात करजगाव,सुलतानपुरा व हिंगलाज या गढ्या येतात पण यातील किती गढ्या प्रशासकीय कामासाठी वापरात होत्या यात शंकाच आहे. संपुर्ण अमरावती जिल्ह्यात मध्ययुगीन काळातील या तीन गढ्या दिसुन येतात. यातील हिंगलाज गढी हि देवस्थानाची गढी असुन यात असलेल्या हिंगलाज देवीच्या मंदिरामुळे या गढीला व गावाला हिंगलाज नाव पडले आहे. सपाट भागावर असलेले गढीचे एकुण बांधकाम पहाता हि प्रशासकीय गढी नसुन मंदिराच्या रक्षणासाठी उभारलेला कोट आहे. हिंगलाज गढी अमरावती शहरापासुन २५ कि.मी. तर बडनेरा शहरापासुन १७ कि.मी.अंतरावर आहे. हिंगलाज गावात प्रवेश करताना डावीकडील रस्ता आपल्याला थेट गढीच्या दरवाजात घेऊन जातो. हिंगलाज गढीचे मुख्य गढी व त्याभोवती परकोट असे दोन भाग पडलेले असुन परकोटाचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेला दोन बुरुजामध्ये बांधलेले आहे. ... मुख्य दरवाजाचे लाकडी दार आजही शिल्लक असुन या दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकरयाच्या देवड्या आहेत. या शिवाय परकोटात प्रवेश करण्यासाठी पुर्व व उत्तर असे दोन लहान दरवाजे आहेत. गढीची तटबंदी साधारण २० फुट असुन गढीचे खालील अर्धे बांधकाम दगडात तर वरील उर्वरीत बांधकाम विटांनी केलेले आहे. संपुर्ण परकोटाचा परीसर साधारण एक एकर असुन आतील गढीचे क्षेत्र ९ गुंठे आहे. मुख्य दरवाजाने परकोटात प्रवेश केल्यावर समोरच आतील गढीची तटबंदी व त्यातील बुरुज आडवा येतो. या बुरुजाच्या डावीकडे मुख्य गढीत जाण्यासाठी दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या डावीकडे काटकोनात परकोटात येण्याचा दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाबाहेर असलेल्या तटबंदीत एक मोठे कोठार असुन बुरुजात एक खोली आहे. या दोन्ही ठिकाणी सध्या देवतांची स्थापना करण्यात आली आहे. हे पाहुन आतील दरवाजाने गढीत प्रवेश केल्यावर आपण परकोटाच्या दुसऱ्या भागात येतो. या भागात आपण आलो तो, एक मुख्य गढीत जाणारा व एक परकोटाच्या दुसऱ्या भागात जाणारा असे तीन दरवाजे आहेत. गढीच्या मुख्य भागात जाणाऱ्या दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना आहे. येथे दोन मंदिरे असुन विटांनी बांधलेला एक उंच मनोरा व एक वेगळ्याच धाटणीची विहीर आहे. मनोऱ्याची उंची बुरुजांपेक्षा जास्त असुन त्यावरून दूरवर नजर ठेवता येत असे. विहिरीची रचना अशा प्रकारे केली आहे कि परकोटाच्या या भागातुन पायऱ्या उतरून पाणी घेता येईल तर तटबंदी बाहेरून म्हणजे परकोटाच्या दुसऱ्या भागातुन पोहऱ्याने पाणी काढता येईल. या दिशेला असलेली तटबंदी चांगलीच रुंद असुन या तटबंदीत खोल्या आहेत. येथुन परकोटात जाणऱ्या दरवाजाच्या आतील भागात चुन्यामध्ये काही शिल्प कोरलेली असुन एक खोली आहे. हे सर्व पाहुन मुख्य गढीत प्रवेश केल्यावर समोरच मध्यभागी हिंगलाज देवीचे मंदिर आहे. या मंदिराभोवती तटाला लागुन असलेल्या ओवऱ्यांचे आता घरात रुपांतर झाले आहे. मंदीरात तांदळा स्वरूपातील हिंगलाज देवीची मूर्ती असुन एक विनायकाची मूर्ती आहे. मंदिरावर देवीची महती सांगणारा फलक असुन त्यावर अमृतगीर महाराज व चिमणाजी यांनी इ.स.१३०३ मध्ये या गढीची निर्मीती केल्याचा उल्लेख आहे. सातशे वर्ष जुनी असणारी ही वास्तू आज काळाच्या ओघात जीर्ण झाली आहे. संपुर्ण गढी फिरण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!