HINGANI
TYPE : GADHI
DISTRICT : VARDHA
HEIGHT : 0
GRADE : EASY
वर्धा जिल्हा म्हटले कि आपल्याला आठवते महात्मा गांधी यांचे सेवाग्राम पण विदर्भातील या वर्धा जिल्ह्यात एकेकाळी बरेच किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी स्वरुपात अस्तित्वात होते. वर्धा जिल्ह्यातील किल्ल्यांची शोधयात्रा करताना आम्हाला एकुण १० कोट अवशेष रुपात पहायला मिळाले. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे गडकिल्ले महाराष्ट्राचे या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतरत्र कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणक युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. या किल्ल्यांना भेट दिली असता मिळालेली माहिती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातील बऱ्याच गढी पुर्णपणे नष्ट झाल्या असुन केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज वा दरवाजा असे उर्वरित अवशेष काळाशी झुंज देत आहेत. स्थानिकांचे या वास्तु बद्दलचे अज्ञान व उदासीनता या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे.
...
संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत तर काही पार जमीनदोस्त झाले आहेत. हिंगणी येथील देशपांडे सुभेदारांचा वाडा म्हणुन ओळखली जाणारी गढी देखील याला अपवाद नाही. आम्ही पाहीलेल्या सर्व कोटामधील अतिक्रमण न झालेली व मुळ अवशेष शिल्लक असलेली हि एकमेव गढी असुन देखील दुर्लक्षामुळे दुरावस्थेत आहे. सेलु तालुक्यात असलेल्या हिंगणी गढीला भेट देण्यासाठी तालुक्याचे शहर सेलु हे सर्वात जवळचे ठिकाण आहे. वर्धा ते सेलु हे अंतर १६ कि.मी. असुन सेलु ते हिंगणी हे अंतर १० कि.मी. आहे. सेलु येथुन हिंगणीला जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. गावात हि गढी सुभेदार वाडा म्हणुन प्रसिध्द असल्याने बस थांब्यावर उतरून ५ मिनीटात गावाच्या टोकाला नदीकाठावर असलेल्या या गढीत पोहचता येते. आयताकृती आकाराची हि गढी पुर्वपश्चिम एका उंचवट्यावर एक एकर परिसरात पसरली असुन गढीचे प्रवेशद्वार असलेली तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली आहे. रस्त्याकडून गढीत प्रवेश केल्यावर उजव्या बाजुला मुर्ती नसलेले एक मंदिर असुन डाव्या बाजुला कोरडी पडलेली विहीर आहे. विहीरीच्या पुढील भागात घडीव दगडात बांधलेला वाड्याचा चौथरा असुन या चौथऱ्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या वाडयाच्या भिंती व त्यातील कोनाडे आजही शिल्लक असुन वाडयाच्या आतील भागात पाण्याचे टाके आहे. गढीच्या पुढील भागात मोठया प्रमाणात काटेरी झुडुपांचे जंगल वाढले असुन आत नीटपणे फिरता येत नाही. या काटेरी झुडुपांमधुन अवशेष शोधावे लागतात. उजवीकडील तटबंदीत एक कोठार असुन डावीकडील तटबंदीत एक खोल तळघर दिसुन येते. गावकरी या ठिकाणी वाड्याबाहेर पडणारे भुयार असल्याचे सांगतात पण या तळघराच्या तोंडावर मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने आत उतरता येत नाही. गढीच्या मागील भागात म्हणजेच पश्चिम दिशेला असलेले दोन बुरुज आजही ढिगाऱ्याच्या रुपात उभे आहेत. काटेरी झाडीमुळे गढीच्या इतर भागात फिरता येत नाही. गढी फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. नागपुरच्या भोसले राजवटीत रघुनाथपंत देशपांडे या सुभेदाराने इ.स.१८०० च्या सुमारास हिंगणी गाव वसवले व त्याच काळात हि गढी बांधली गेली.
© Suresh Nimbalkar