HATGAON

TYPE : FORTRESS

DISTRICT : NAGAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात हातगाव येथे मध्ययुगीन कालखंडात विटांचा मोठ्या प्रमाणात वापर करून बांधलेली एक सुंदर गढी पहायला मिळते. हातगाव हे गाव अहमदनगर पासुन ९५ कि.मी.अंतरावर तर शेवगाव या तालुक्याच्या ठिकाणापासुन २५ कि.मी.अंतरावर आहे. गावाच्या मध्यभागी एका लहानशा उंचवट्यावर असलेली हि गढी साधारण आठ गुंठ्यावर पसरलेली असुन गढीच्या चार टोकावर चार गोलाकार बुरुज आहेत.गढीचे तळातील बांधकाम हे घडीव दगडात केलेले असुन त्यावरील संपुर्ण बांधकामात विटांचा वापर केला आहे. या संपुर्ण बांधकामात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. गढीच्या पश्चिम भागात गढीत प्रवेश करण्यासाठी मध्यम आकाराचा दरवाजा आहे. काही पायऱ्या चढुन गेल्यावर या दरवाजाने आपला गढीत प्रवेश होतो. बाहेरील बाजूने गढी सुस्थितीत असली तरी गढीच्या अंतर्गत भागात मात्र मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. पडझड झालेल्या या भागातच भराट यांचे काही वंशज वास्तव्यास असुन काही वंशज गढीशेजारी रहातात. गढीच्या अंतर्गत बांधकामासाठी विटा, दगड, माती व चुण्याचा वापर करण्यात आला असुन हे बांधकाम आता बहुतांशी ढासळले आहे. ... उध्वस्त झालेल्या या बांधकामात संकटकाळी गढीतुन बाहेर पडण्यासाठी एक चोर दरवाजा तसेच जमिनीखाली धान्य साठा करण्यासाठी असलेले मोठमोठे बळद पहायला मिळतात. गढीच्या आतील सांडपाणी बाहेर जाण्यासाठी बंदिस्त दगडी गटारे बांधलेली असुन तटबंदीच्या अंतर्गत भागात दोन शौचालय पहायला मिळतात. गढीला चार ते पाच फूट रुंद भक्कम फांजी असुन त्यात पुर्णपणे विटांचा वापर केलेला आहे. तटावर फेरी मारण्यासाठी फांजी असली तरी फांजीवर जाणाऱ्या पायऱ्या मात्र शिल्लक नाहीत. बुरुजावर संरक्षण दृष्ट्या कोणतीच सोय दिसुन येत नाही. पुर्णपणे विटांनी बांधलेली हि गढी स्थापत्यकलेचा एक वेगळाच नमुना असुन तिचे जतन होणे गरजेचे आहे. संपुर्ण गढी फिरण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. गावातुन फेरी मारताना राम मंदिराजवळ प्राचीन मंदीराचे अवशेष तसेच झीज झालेल्या काही प्राचीन मुर्ती पहायला मिळतात. शिखर शिंगणापूर येथील छगन राजाराम भराट पाटील (साळुंखे-जहागीरदार) यांना १७ व्या शतकात हातगाव येथे पाटीलकी वतन मिळाले. त्याकाळी होणारा दरोडेखोर व पेंढारी टोळयांचा त्रास तसेच परकीय शत्रूंपासून कुटुंबाचे तसेच गावाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी हि गढी बांधली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!