GUNVANTGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : SATARA

HEIGHT : 2640 FEET

GRADE : MEDIUM

महाराष्ट्रात मोरगिरी नावाने ओळखले जाणारे दोन अपरिचित किल्ले आहेत. यातील एक किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तर दुसरा सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पायथ्याशी असलेल्या मोरगिरी गावामुळे त्याच नावाने ओळखल्या जाणाऱ्या या गडाची खरी ओळख गुणवंतगड अशी आहे. मोरगिरी हे गाव पाटण या तालुक्याच्या ठिकाणाहुन १० कि.मी. अंतरावर असुन गावातील भैरवनाथ मंदीराच्या मागुन गडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. भैरवनाथ मंदीराबाहेर एका चौथऱ्यावर दोन विरगळ व काही शिल्प ठेवलेली असून चौथऱ्याच्या खालील भागात अर्धवट शिल्प कोरलेली एक शिळा पहायला मिळते. भैरवनाथ मंदीराजवळ असलेल्या राम मंदिरात एक भग्न तोफ ठेवलेली आहे. गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने गावातुन पुरेसे पाणी सोबत घेऊन गड चढाई सुरु करावी. मोरगीरी गावामागे किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन उत्तर टोकाच्या कडयाखाली किल्ल्याची लहानशी माची आहे. ... गड चढायला सुरवात केल्यावर आपण डावीकडील या माचीच्या दिशेने चढायला सुरवात करावी. पायथ्यापासुन अर्ध्या तासात आपण या माचीवर येऊन पोहोचतो. या माचीवर काही घरांचे अवशेष विखुरलेले असुन दरीच्या काठाने काही प्रमाणात रचीव दगडांची तटबंदी व टोकावर एका बुरुजाचा पाया पहायला मिळतो. माचीवरील अवशेषात काही घरांचे चौथरे व एक झीज झालेले शिल्प तसेच एक अखंड दगडात कोरलेली (एकाश्म) गुहा पहायला मिळते. माचीवरील हे अवशेष पाहुन झाल्यावर दरीच्या काठाने टेकडीच्या मध्यभागी असलेल्या घळीच्या दिशेने चढायला सुरवात करावी. काहीशी मुरमाड असलेली हि पायवाट पार करून आपण गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्यावर पोहोचतो. आज या पायऱ्याची मोठया प्रमाणात झीज झालेली आहे. या पायऱ्या व पुढील पायवाट पार करून आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. या वाटेवरील दरवाजा आज पुर्णपणे नामशेष झाला आहे. पायथ्यापासुन माथ्यावर येण्यास पाउण तास पुरेसा होतो. गडमाथा समुद्र सपाटीपासुन २६४० फुट उंचावर असुन दक्षिणोत्तर साधारण ३ एकरवर पसरला आहे. गडाचा माथा म्हणजे निमुळते उंचसखल पठार असुन त्यावरील वास्तु पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत. डावीकडील बाजुने गडफेरी करताना आपल्याला एका वास्तुचा चौथरा तसेच बुजलेले पाण्याचे टाके व कोरडा पडलेला तलाव पहायला मिळतो. उजवीकडील बाजुस कातळात कोरलेले पाण्याचे कोरडे पडलेले टाके असुन त्यापुढील भागात कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढुन गेल्यावर खडकात खोदलेली एक मोठी विहीर व काही घरांचे चौथरे दिसुन येतात. गडाच्या उत्तर टोकावर ढालकाठीची जागा असुन तेथुन संपुर्ण किल्ला नजरेस पडतो. गडाच्या उत्तर टोकावर असलेला हा बुरुज काही काही प्रमाणात तग धरून असुन या बुरुजावरून कोयना नदीचे पात्र, दातेगड तसेच खुप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गडाचे स्थान व त्याचा एकूण आकार पहाता कराड – चिपळूण या मध्ययुगीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. किल्ल्याचा आकार त्यावरील वास्तु व पाण्याची सोय पहाता याचा केवळ टेहळणीकरता वापर केला जात असावा. गडाचा इतिहास पहाता इ.स. १५२६च्या सुमारास गुणवंतगड व दंतगिरी परगण्याचे देशमुखी मिळवलेले चालुक्य राजकुलोत्पन्न सोरबाजी सावंत साळुंखे यांचे वंशज तुकोजीराव आणि रामराव या बंधुची सातारा व कोकणपट्टय़ातील भागाच्या बंदोबस्ताकरता मोकासेदार या पदावर विजापूर दरबाराच्या वतीने नेमणूक झाली. विजापूरच्या कल्याण सुभ्याहून तुकोजीराव आपले बंधू रामराव यांच्यासमवेत ५ हजारांच्या फौजेसह स्वारीस निघाले. सर्वप्रथम ते साताराप्रांती आले आणि त्यांनी पाटण परगणा सर केला. त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील धामधूम मोडून त्यांनी आपला मोर्चा रत्नागिरीकडे वळवला. या कामगिरीमुळे आदिलशहाने तुकोजीरावांनी जिंकलेला सर्व प्रदेश त्यांच्या तैनातीला नेमून दिला. अठराव्या शतकांत या किल्ल्यावर आणि दातेगडावर पंतप्रतिनिधीचे लोक रहात असत व जेव्हा पेशव्यांच्या पक्षाकडील हुकूम सुटत तेव्हां त्यांच्या अंमलबजावणीस ते अडथळे निर्माण करीत. त्यामुळे पेशव्यांनी या गडाचा ताबा घेतला व तेथे आपले ठाणे ठेवले. इ.स.१८१८च्या मराठा-इंग्रज युद्धात कोणतीही लढाई न करता हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात देण्यात आला. वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यास खाजगी वहानाने मच्छिंद्रगड, गुणवंतगड, दातेगड आणि वसंतगड हे चार किल्ले एका दिवसात पहाता येतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!