GORAKHGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : THANE

HEIGHT : 1930 FEET

GRADE : HARD

ठाणे आणि पुणे जिल्ह्य़ाच्या सीमेवरील सह्याद्रीच्या डोंगररांगेत माळशेज, नाणेघाट, अहुपे हे प्राचीन घाटमार्ग आहेत. या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी लहानमोठे टेहळणी दुर्ग उभारले गेले. यातील अहुपे घाटाचा पहारेकरी म्हणजे गोरखगड. मुंबई व पुणे येथील दुर्गप्रेमीना एक दिवसात सहज साध्य करता येणारी हि भटकंती असल्याने सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर बऱ्यापैकी गर्दी असते. गोरखगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी कल्याणमार्गे मुरबाडला तर पुणेकरांनी कर्जत मार्गे मुरबाडला यावे. देहरी हे गडाच्या पायथ्याचे गाव असुन मुरबाडहून देहरी येथे येण्यासाठी खाजगी जीप अथवा एस.टी उपलब्ध आहे. येथे मुक्काम करावयाचा असल्यास गावातील विठ्ठल मंदिरात मुक्काम करता येतो. देहरी गावातून दिसणाऱ्या दोन सुळक्यापैकी मोठा सुळका गोरखगड किल्ला तर छोटा सुळका म्हणजे मच्छिंद्रगड. मच्छिंद्रगडच्या नावात गड असला तरी हा गड नसुन केवळ एक सुळका आहे. नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाच्या साधनेचे हे ठिकाण म्हणून या किल्ल्याचे नाव गोरखगड पडल्याचे मानले जाते. ... गोरखगडाची उंची समुद्र सपाटीपासून २१३७ फुट आहे. गोरखगडाच्या आसपासचा परिसर वनखात्याच्या ताब्यात असुन भीमाशंकर अभयारण्यामुळे प्रसिध्द आहे. गोरखगडाचे स्थान व आकार पहाता याचा उपयोग केवळ आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी केला जात असावा. पुर्वी नाणेघाट मार्गे जुन्नरला जाताना या गडाचा निवासस्थान म्हणून वापर करत असत. गोरखगडचा विस्तार लहान असला तरी पाण्याची उपलब्धता व निवाऱ्याची सोय गडावर आहे. गावातील विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूने जंगलात जाणारी खडी चढण असलेली वाट आपल्याला गोरखगडाच्या पायथ्याशी असलेल्या खिंडीत आणून सोडते. या खिंडीत महादेवाचे छोटेसे मंदिर असुन मंदिरासमोर दोन प्राचीन समाध्या आहेत. पुर्वीच्या काळी येथे एखादे मंदिर असावे कारण या खिंडीत मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेले मंदिराचे दगड दिसुन येतात. किल्ल्याची खरी सुरुवात येथूनच होते. पुर्वी या भागात किल्ल्याचा दरवाजा असावा पण आता मात्र आपला प्रवेश ढासळलेल्या तटबंदी मधून होतो. थोडे वर गेल्यावर पायऱ्यापूर्वी एक वाट उजवीकडे जाते तिथे पाण्याचे खडकात खोदलेले पाण्याचे टाके असुन शेजारी खडकात खोदलेली छोटी गुहा आहे. ते पाहून मूळ वाटेवर परत यावे. येथुन गडावर जाण्यासाठी पायऱ्या कोरल्या असुन या पायऱ्यांना काही ठिकाणी पकड घेण्यासाठी खोबणी केलेल्या आहेत तर काही ठिकाणी केवळ पाउल ठेवण्या इतपत खोबणी आहेत. या पायऱ्या उभ्या कड्यात खोदलेल्या असल्याने थोडे सांभाळूनच चढावे लागते. पायऱ्या चढताना वाटेतच एका ठिकाणी आपल्याला कातळात कोरलेला पण उघडयावर असल्याने झीज होऊन अस्पष्ट झालेला शिलालेख दिसतो. कातळात खोदलेल्या जवळपास १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपला गोरखगडाच्या कातळात खोदलेल्या प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो. हा दरवाजा वेगळ्याच धाटणीचा असुन दरवाजाच्या चौकटीतून आत गेल्यावर पायऱ्या असलेला भुयारी मार्ग कोरण्यात आला आहे. प्रवेशव्दारातून चढून गेल्यावर वर पाण्याची तीन टाकी दिसतात. समोरची वाट पुन्हा थोडयाश्या चढणीवर घेऊन जाते. इथुन परत एक वाट उजवीकडे जाते तिथे पाण्याचे खडकात खोदलेले टाके असुन शेजारी खडकात खोदलेली एक गुहा आहे. या गुहेत कातळात खोदलेले एक शिल्प असुन त्यात दोन व्यक्ती घोडयावर स्वार झालेल्या आहेत व शेजारी एक कावड घेतलेल्या व्यक्तीचे छोटे शिल्प आहे. दोन्ही शिल्पांना गावकऱ्यानी रंगवलेले आहे. गावकरी या शिल्पाला मामा भाच्याचा दगड म्हणतात. ते पाहून मूळ वाटेवर परत यावे. या वाटेने पुढे थोडे खाली पायऱ्या उतरल्यावर आपण गोरखगडाच्या सुळक्यात खोदलेल्या विशाल गुहेसमोर येऊन पोहोचतो. या गुहेत ५० लोक सहजपणे मुक्काम करू शकतात. स्थानीक लोक या गुहेला मंडप म्हणुन ओळखतात. गुहेतुन समोरच दरीत झुकलेले चाफ्याचे डेरेदार झाड आणि मच्छिंद्रगड निसर्गाचे भव्य आणि उग्ररूपाचे दर्शन करून देतो. गुहेजवळ पाण्याची टाकी असली तरी त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गोरखगडावर पाण्याची एकुण बारा टाकी आहेत. गुहेपासून डावीकडे गेल्यावर या वाटेवर डावीकडे पाण्याची टाकी आढळतात. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. गुहेपासून येथपर्यंतची वाट अरुंद असून तेथे खबरदारी आवश्यक आहे. या टाक्यांपासून पुढे आल्यावर उजवीकडे दगडांवर झेंडा लावलेला दिसतो. या झेंड्यासमोर गोरक्षगडाच्या माथ्यावर जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत. डावीकडील वाटेने पुढे आल्यावर आपण गडाच्या पश्चिम बाजूला येतो. येथे कातळात छोटी गुहा कोरलेली आहे. गुहा ते गोरखगडाचा माथा हा या ट्रेकमधील सर्वात महत्वाचा टप्पा आहे. याशिवाय हा ट्रेक पूर्णच होऊ शकत नाही. सुळक्यावर जाण्यासाठी ५० ते ६० पायऱ्या कोरल्या आहेत त्यातील सुरवातीच्या १० -१२ पायऱ्या तुटलेल्या असल्याने आपल्याला थोडेसे सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. पायऱ्याची वाट काही ठिकाणी काळजाचा ठोका चुकवणारी असल्याने प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागते. पायऱ्यांच्या या वाटेच्या मध्यावर एक लहान गुहा कोरलेली आहे. गडाचा माथा फारच लहान असुन वर केशरी रंगाचे गोरक्षनाथांची समाधी असलेले लहान सिमेंटने बांधलेले मंदिर आहे. येथुन समोरच मच्छिंद्रगड, सिद्धगड, जीवधन, अहुपेघाट हा सर्व परिसर नजरेत भरतो. गोरखगडाचा माथा चढाईसाठी अवघड असला तरी तो चढल्याशिवाय आपली गोरखगडची दुर्गवारी पुर्ण होत नाही. गोरखगड येथे कोणत्याही प्रकारची लढाई झाल्याचा उल्लेख नाही पण १६५७ साली मराठयांच्या ताब्यात असलेल्या या गडाचा मोगलांनी २० औक्टोबर १६९३ रोजी ताबा घेतल्याचा एकमेव उल्लेख आढळतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!