GONDESHWAR

TYPE : SHIV MANDIR

DISTRICT : NASHIK

मुंबई - शिर्डी मार्गावर नाशिक जिल्ह्यात सिन्नर हे तालुक्याचे शहर आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या या गावाच्या मध्यवर्ती भागात १२ व्या शतकात म्हणजे यादवांच्या राजवटीत बांधलेले गोंदेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. महाराष्ट्रावर सुमारे पाचशे वर्षे यादव राजघराण्यानी राज्य केलं. इतिहास व मंदीर अभ्यासकांच्या मते हे मंदीर साधारण ११६० च्या दरम्यान बांधले गेले असावे. ‘सेउना’ म्हणजेच यादव. या यादव घराण्यातील राजगोविंद हा राजा. ‘सेउनाचंद्र’ या राजाने वसविलेले ‘सेउनापुरा’ म्हणजेच आजचे सिन्नर होय. गोविंद राजावरूनच या मंदिराचे नाव गोविंदेश्वर अन् पुढे गोंदेश्वर पडले असावे असाही एक मतप्रवाह आहे. गोंदेश्वर मंदिर हे मंदिर पुरातन भूमिज स्थापत्यशैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. मंदीराचा परिसर साधारण सव्वा दोन एकरवर पसरलेला या संपुर्ण परिसराला सहा फुट उंचीची तटबंदीवजा प्राकाराची भिंत आहे. या तटबंदीमध्ये पूर्व दिशेला मुख्य प्रवेशद्वार तर उत्तरेला दुसरा दरवाजा आहे. या तटबंदीत पुर्वेस असलेल्या मुख्य दरवाजाने मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर समोर १२५ फुट Χ ९५ फुट लांबी रुंदीचा ५ फूट उंच चौथरा दिसतो. या चौथर्‍यावर मध्यभागी असलेले गोंदेश्वराचे उंच मंदिर व चौथऱ्याच्या चार टोकावर असलेली इतर चार लहान मंदिरे आपल लक्ष वेधून घेतात. ... हि सर्व मंदीरे कोरीव नक्षीकाम करून कलाकुसरींनी मढवलेली आहेत. मुख्य मंदीर व त्याभोवती असलेली चार मंदीरे असा पाच मंदिरांचा समूह शैवपंचायतन म्हणुन ओळखला जातो. यातील गदिश्वराचे म्हणजे शिवाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवतीची चार उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती,गणपती,सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मुख्य मंदीराच्या तळातील शिल्पपट्टीवर गजथर कोरलेला असुन जणु काही या हत्तींनी आपल्या पाठीवर या मंदिराचा भार तोललेला आहे असेच या शिल्पीना सुचवायचे आहे. मुख्य मंदिराची रचना स्वर्गमंडप, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप,अंतराळ व गर्भगृह अशी असून गर्भगृहात रेखीव शिवपिंड आहे. गर्भगृहावर बांधलेले मंदिराचे शिखर अतिशय सुंदर असुन अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. मुख्य मंदिरासमोर असलेल्या नंदी मंडपातील नंदी व त्याच्या आसपास असलेले भग्न नंदी पहाता या मंडपातील नंदी वेळोवेळी बदलण्यात आले असावेत असे वाटते. शिवमंदिराचा मुख्य दरवाजा उत्तरेस असुन पुर्व बाजूस दुसरा लहान दरवाजा आहे. सभामंडप चार खांबांवर तोललेला असुन मंडपाच्या मध्यावर कासव कोरलेले आहे. सभामंडपातील स्तंभावर विविध प्रकारच्या नक्षी कोरलेल्या असून छतावर देखील अप्रतिम कोरीवकाम केलेले आहे. मंदिरातील शिल्पकृती त्रिमिती पद्धतीची असून त्यावर पडणाऱ्या प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे सौंदर्य खुलुन अधिकच उठावदार दिसते. मंदिरांची बाहेरून फेरी मारताना बाहेरील भिंतींवर सुरसुंदरी, देव-देवता, गंधर्व,अप्सरा तसेच पुराणातील प्रसंग कोरलेले पहायला मिळतात. मुख्य मंदिरा शेजारी असलेल्या इतर चार लहान मंदिरांवरही मोठ्या प्रमाणात कोरीवकाम व नक्षीकाम केलेले आहे. या मंदिराचे अजून एक वैशिठ्ये म्हणजे गर्भगृहात शिवलिंगावर अभिषेक केल्यावर वाहून जाणारे जल मगरीच्या तोंडातुन बाहेर पडते. मगर हे गंगेचे वाहन असल्याने पाणी बाहेर पडण्यासाठी येथे मकरप्रणाल म्हणजे मकरमुख कोरलेले आहे. मगरीचे गंगेचे असेलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मकरमुख कोरलेले दिसते. शिवाने आपल्या मस्तकी धारण केलेली गंगा अभिषेक रूपाने जणु त्याच्या अंगाखांद्यावर खेळत येथे भूलोकी अवतरते हेच या मंदीर निर्मात्याला सुचवायचे असावे. नंतरच्या काळात म्हणजे तेराव्या शतकानंतर मकरमुखाची जागा गोमुखाने घेतली. या मंदिराचे जाणवणारे अजून एक वेगळेपण म्हणजे महाराष्ट्रात आढळणारी बहुतांशी प्राचीन मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणात म्हणजे बेसाल्ट दगडात बांधलेली आहेत पण या मंदिराचे बांधकाम गुलाबी व्हेसिक्युलर दगड वापरून केलेले आहे. त्यामुळे या मंदिराला एक वेगळीच नैसर्गिक छटा लाभलेली आहे. ठिसुळ असल्याने व्हेसिक्युलर खडकाची झीज लवकर होते हे मंदिर पाहताना आपल्याला जाणवते पण या दगडावर कोरीवकाम करणे हे देखील तितकेच अवघड असते. तरीही यावर केलेली अप्रतिम कलाकुसर आवर्जुन पहावी अशीच आहे. पुर्वी दगडी बांधकाम करताना चुनखडीमध्ये विविध प्रकारची घटकद्रव्यं वापरून तयार केलेल्या चुन्याचा सांधे व दर्जा भरण्यासाठी वापर केला जात असे. पण या मंदिराचे बांधकाम करताना चुना न वापरता दगडांनाच खाचा व खुंट्या करून ते एकमेकांत गुंफले आहेत. पायापासून शिखरापर्यंतचे दगड एकमेकांत गुंफले जाऊन हि एकसंध रचना उभी राहील्याने हे संपूर्ण बांधकाम भक्कम आणि टिकाऊ बनले आहे. संपुर्ण मंदीर डोळसपणे पहायचे असल्यास साधारण अडीच ते तीन तास लागतात. १९०९ साली भारत सरकारने या मंदिराला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. गोंदेश्वरचे महत्त्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरते मर्यादित नसुन महाराष्ट्राच्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!