GIRAWALI

TYPE : FORTRESS

DISTRICT : BEED

HEIGHT : 0

GRADE : EASY

मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला फार कमी प्रमाणात दुर्ग पहायला मिळतात. मराठवाडयातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला येथे किल्ल्यायेवजी गढी जास्त प्रमाणात पहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील किल्ल्यांची भटकंती करताना अंबेजोगाई तालुक्यातील गिरवली येथे नाईक-बावणे यांची अशीच एक ३०० वर्ष जुनी उध्वस्त गढी पहायला मिळते. अंबेजोगाई- गिरवली हे अंतर ११ कि.मी.असुन अंबेजोगाई-अहमदपूर मार्गावरून हे गाव १ कि.मी.आत आहे. अंबेजोगाईहून गिरवली जाण्यासाठी थेट बस नसल्याने महामार्गाहुन गिरवली गावाचा १ कि.मी. प्रवास पायगाडीने करावा लागतो. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. गावात प्रवेश करताना कधीकाळी गिरवली गाव हे तटबंदीच्या आत वसलेले दिसुन येते. गावाची वेस नव्याने बांधलेली असुन या वेशी समोरच गावचा रक्षणकर्ता मारुतीरायाचे मंदिर आहे. वेशीच्या आतील बाजुस एक रंगवलेले गद्धेगाळ शिल्प पडलेले आहे. गावातील बहुतांशी घरे हि दगडी बांधणीतील आहेत. गिरवली गढीची रचना हि एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे आहे. मुख्य गढी हि चौबुर्जी असुन या संपुर्ण गढीला परकोट आहे. ... या परकोटाला दोन दरवाजे तसेच सहा लहान बुरुज आहेत. संपुर्ण कोटाचा परीसर दोन एकर तर आतील मुख्य गढीचा परीसर साधारण १२ गुंठे आहे. परकोटाच्या दक्षिण दिशेला उत्तराभिमुख दरवाजा असुन या दरवाजाशेजारी दोन बुरुज आहेत. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. परकोटाचा दुसरा दरवाजा पश्चिमेला आहे. परकोटात प्रवेश केल्यावर नाईक बावणे यांच्या वंशजांची घरे आहेत. कधीकाळी या घरांच्या जागी परिसराचा कारभार सांभाळणाऱ्या कचेऱ्या असाव्यात. संपुर्ण गढीचे बांधकाम हे दगड व चुन्यात केलेले असुन तटाची उंची साधारण ३५ फुट आहे. संपुर्ण तटावर तसेच बुरुजावर खाली बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. आतील गढीचे प्रवेशद्वार पश्चिमेला असल्याने परकोटात प्रवेश केला तरी ते दिसुन येत नाही. परकोटाच्या एका कोपऱ्यात ५० फुट खोल विहीर असुन या विहिरीत उतरण्यासाठी कमानीयुक्त दरवाजा व पायऱ्या बांधलेल्या आहेत. गढीला वळसा मारून आपण मुख्य गढीच्या दरवाजात पोहोचतो. गढीचा दरवाजा हा काहीसा उंचावर बांधलेला असुन नंतरच्या काळात त्यासमोर पायऱ्या बांधलेल्या असाव्यात. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण गढीची आतील तटबंदी व बाहेरची दुसरी तटबंदी याच्या चिलखतात येतो. या दरवाजाच्या आत पहारेकऱ्याच्या देवड्या असुन डावीकडे वळल्यावर उजव्या बाजुच्या तटबंदीत गढीचा दुसरा दरवाजा आहे. हा संपुर्ण भाग आतील व बाहेरील तटावरून बंदुकीच्या माराच्या टप्प्यात आहे. या दरवाजाच्या समोरील बाजुस एक लहान खिडकीवजा दगडी चौकट असुन हा दरवाजा न उघडता मुख्य गढीच्या आत जाण्याचा भुयारी मार्ग आहे. उजवीकडील दरवाजाने आत शिरल्यावर आपला गढीत प्रवेश होतो. गढीतील अवशेष पुर्णपणे नष्ट झाले असुन मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. गढीच्या तटावरील फांजी बांधण्यासाठी पांढरी चिकट माती वापरलेली आहे. गढीचे चारही बुरुज सुस्थितीत असुन मध्यभागी गढीला पाणी पुरवठा करण्यासाठी दगडी बांधकामातील ५० फुट खोल विहीर आहे. गढीच्या बुरुजांवरून दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गढी व परकोट पहाण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. हि गढी शिवकालानंतर बांधली गेली आहे. शाहजहानच्या काळात मालोजीराव यांनी ५२ दिवसात ५२ किल्ले जिंकल्याने त्यांना बावणे हे नामाभिमान प्राप्त झाल्याचे सांगीतले जाते. औरंजेबाच्या काळात मोगलांकडून पांगरी, पीर पिंपळगाव, मांग देऊळगाव, देवडी देऊळगाव व भाईखेड ही जालना परगण्यातील गावे त्यांना वतनात मिळाली. मालोजीराव यांचा मुक्काम पांगरी गावात असल्याने पांगरी गाव 'बावणे पांगरी' या नावाने आजही ओळखले जाते. या गावात बावणे परिवारांच्या समाधी आहेत. औरंगजेबाच्या मृत्युनंतर इ.स.१७०७मध्ये शाहूमहाराज महाराष्ट्रात परतल्यावर बावणे सरदार त्यांच्या पक्षात गेले. इ.स.१७४३ साली शाहु महाराजांनी तांदुळजा व गिरवली हि दोन गावे जानोजीराव नाईक बावणे यांना इनाम म्हणुन दिले होते. जानोजीराव यांच्याकडे ५००० स्वारांचे घोडदळ होते. जानोजीराव यांनीच तांदुळजा व गिरवली या दोन गढ्यांचे बांधकाम करून घेतले व तेथून ते आपल्या देशमुखीचा कारभार पाहू लागले. जानोजी नाईक बावने यांचे भगवंतराव, व्यंकटराव व जगजीवनराव हे तीनही पुत्र मराठ्यांच्या घोडदळाचे सरदार होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!