GHODGERI

TYPE : GROUND FORT

DISTRICT : BELGAON

HEIGHT : 0

GRADE : EASY

हगणदारीमुक्त गाव या विषयावर आलेला भरत जाधव यांचा येड्यांची जत्रा हा चित्रपट आपल्यापैकी बहुतेक जणांनी पाहिलाच असेल. विनोदाची झालर असलेल्या या चित्रपटात नायकाची शेतजमीन गावातील दोन गट शौचालय म्हणुन वापरतात व ती त्यांनी न वापरता शौचालयाचा वापर करावा यासाठी नायकाचा संघर्ष या चित्रपटात दर्शविला आहे. आपणही दोन तासासाठी करमणुक म्हणुन हा चित्रपट पाहतो व विषय तेथेच सोडुन देतो. असे काही प्रत्यक्षात घडत असेल असे आपल्याला वाटतही नाही. पण या अशा घटना समाजात आजही घडतात आणि याचा अनुभव आम्हाला बेळगाव जिल्ह्यातील दुर्गभ्रमंती करत असताना हुक्केरी तालुक्यात असलेल्या घोडगेरी किल्ल्याच्या वेळी आला. किल्ल्याच्या मध्यभागी चक्क भिंत घालुन एक भाग पुरुष शौचालय तर दुसरा भाग महीला शौचालय बनविण्यात आला आहे. शासनाच्या हागणदारीमुक्त गाव योजनेचे गावाने चक्क तीन तेरा वाजवलेत. ... ऑक्टोबर महीन्यात अचानक आलेल्या पावसाने आम्ही रात्री गावातील लिंगेश्वर मंदिरात मुक्काम केला आणि सकाळी ७ वाजता किल्ला पहायला गेलो. यावेळेस आलेले अनुभव एखादया विनोदी चित्रपटासारखे असले तरी वीरांच्या या वास्तुची झालेली अवस्था पाहुन मन उदास झाल्याशिवाय रहात नाही. घोडगेरी गावात असलेला हा किल्ला संकेश्वरहुन २८ कि.मी.वर तर हुक्केरी या तालुक्याच्या ठिकाणापासुन १३ कि.मी.अंतरावर आहे. गावाच्या एका टोकावर घटप्रभा नदीकाठी असलेला चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण दीड एकरवर पसरलेला आहे. घटप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे किल्ल्याची नदीकाठी असलेली तटबंदी उध्वस्त झाली असुन उर्वरीत तीन बाजुची तटबंदी आजही सुस्थितीत आहे. या तटबंदीत चार टोकावर चार बुरुज असुन पश्चिमेच्या तटबंदीत मध्यभागी एक असे एकुण पाच बुरुज आहेत. तटबंदीची उंची २० फुट असुन टोकावरील बुरुजांची उंची तटापेक्षा ५ फुट जास्त म्हणजे २५ फुट आहे. तटबंदीच्या मध्यभागी असलेल्या एका बुरुजाची उंची मात्र तटाइतकीच आहे. संपुर्ण तटबंदीत व बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या बांधलेल्या आहेत. किल्ल्याची संपुर्ण तटबंदी घडीव दगडात बांधलेली असुन बांधकाम सांधण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. तटबंदीच्या पश्चिम बाजुस तटाला लागुनच एक लहान मंदीर आहे. गडाचा नदीकाठी असलेला दरवाजा आज पुर्णपणे नष्ट झाला असुन नदीकाठी घोडयाला पाणी पिण्यासाठी असलेल्या दोन गोलाकार दगडी ढोणी पहायला मिळतात. किल्ल्याचा दुसरा दरवाजा असलेल्या भाग महीला शौचालय असल्याने तेथे प्रवेशबंदी होती. दुसऱ्या भागात प्रवेश केला पण रात्री झालेला पाउस आणि सकाळची वेळ यामुळे काही क्षणात बाहेर आलो. किल्ल्याच्या या भागात मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असुन एक बुजलेली विहीर व काही चौथरे आहेत. किल्ल्याचे उर्वरीत वर्णन करण्यासाठी इतरांना संधी आहे. किल्ल्याच्या तटाला लागुन वस्ती असल्याने एखादया लहान मुलास सोबत घेऊन गल्लीबोळातुन तटाला फेरी मारावी. गावात बहुतांशी लोक मराठी बोलत असल्याने भाषेची अडचण येत नाही. हे सर्व वाचल्यावर आपल्या मनात प्रश्न उभा रहातो कि इथे जायला हवे का ? यावर उत्तर एकच. किल्ला आहे म्हटल्यावर तिथे जायलाच हवे. यावर थोडाफार असा तोडगा काढता येईल कि पावसाळ्यात व इतर काळात सकाळची वेळ सोडुन मनाची हिम्मत करून किल्ल्यात शिरता येईल. प्रयत्न करायला काय हरकत आहे? किल्ल्याला भेट देताना गावात असलेले मध्ययुगीन लिंगेश्वर मंदीर आवर्जून पहायला हवे. हा किल्ला आम्ही २०१९ साली ऑक्टोबर महीन्यात पाहिला त्या वेळची स्थिती आहे. किल्ल्याचा इतिहास आज किल्ल्याइतकाच अबोल आहे. अक्कलकोट संस्थानाचे महाराज फत्तेसिंग भोसले यांचे भाऊबंद भवानराव लोखंडे यांच्याकडे या भागाची सुभेदारी असुन त्यांनी या किल्ल्याची उभारणी केल्याची नोंद आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!