GANDHARVGAD

TYPE : HILL FORT

DISTRICT : KOLHAPUR

HEIGHT : 3078 FEET

GRADE : EASY

कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड तालुक्यात गंधर्वगड नावाचा किल्ला आहे. चंदगड पासुन १० कि.मी. अंतरावर एका पठारावर असलेल्या या किल्ल्यामध्येच गंधर्वगड गाव वसलेले आहे. कोल्हापूरकडून चंदगडाकडे जाताना चंदगडाच्या अलिकडे १० कि.मी. अंतरावर वाळकोळी गावाचा फाटा आहे. रस्त्याच्या डावीकडे फुटणाऱ्या या फाट्यावर सध्या एक कमान उभी केली असुन या फाट्यावरून गंधर्वगडावर जाणारा गाडीरस्ता आहे. या गाडीरस्त्याने गडाच्या खाली वाळकुळी गाव लागते. या गावातुन साधारण तासभर चालत आपण गडावर पोहोचू शकतो किंवा खाजगी वाहन सोबत असल्यास गाडीमार्गाने डोंगराला वळसा घालुन १० मिनिटात माथ्यावर जाता येते. गडावर प्रवेश करण्यापुर्वी वाटेच्या उजव्या बाजुस दगडी चौथर्याटवर हनुमंताचे मंदिर असुन या मंदिराशेजारी मारुतीची भग्न झालेली जुनी मूर्ती आहे. येथुन पुढे आल्यावर गडावर प्रवेश करताना आपल्याला डावीकडे केवळ अवशेष रुपात शिल्लक असलेला गडाचा मुख्य दरवाजा व त्याशेजारील दोन भग्न बुरुज दिसतात. ... येथून पुढे जाणारा रस्ता आपल्याला गडावरील वस्तीत असलेल्या चाळोबा मंदिरात नेऊन सोडतो. मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ जवळ एक नागशिल्प व त्या शेजारी एका वास्तुचा चौथरा आहे. मंदिराच्या परिसरात काही विरगळ व प्राचीन शिवमंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. मंदिराच्या पुढील भागात एक प्राचिन विहिर असुन या विहिरीचे पाणी गावातील लोक आजही पिण्यासाठी वापरतात. या विहिरी शेजारीच पाण्याचे एक बांधीव टाके आहे. ही विहिर पाहून आपण गडाच्या दक्षिण तटबंदीवर यायचे. या तटबंदीचा फांजीपर्यंतचा भाग मातीत गाडला गेला असुन शिल्लक असलेल्या तटबंदीत दोन शौचकूप व एक लहान दरवाजा पहायला मिळतो. या तटबंदीचा कोपऱ्यावरील भाग पाडून गावकऱ्यांनी गडाच्या दुसऱ्या बाजूने खाली उतरण्यास पायवाट केली आहे. गडाच्या पुर्व बाजुस काही जुने चौथरे असुन यात एक बुजलेली विहिर पहायला मिळते. गडावर असलेली वस्ती व गडाच्या बहुतांशी भागात शेती केली जात असल्याने किल्ल्याचे अंतर्गत असलेले बहुतांशी अवशेष नष्ट झालेले आहेत. गडाच्या माथ्यावरुन महिपालगड आणि कलानंदीगड तसेच ताम्रपर्णी नदीचे खोरे दिसते. संपुर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो. सभासद बखरीतील उल्लेखानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये गंधर्वगडाची नोंद आहे. पण गॅझेटियरमधील नोंदीनुसार सावंतवाडीच्या फोंड सावंताचा मुलगा नाग सावंत याने इ.स. १७२४ मध्ये या किल्ल्याची निर्मिती केली. १५ जानेवारी १६६६ मध्ये पन्हाळगड घेण्याच्या उद्देशाने शिवराय ५ हजार सैन्यानिशी गंधर्वगडाच्या परिसरातून पन्हाळयावर चाल करुन गेले. २८ जुलै १६८७ च्या पत्रात काकती कर्यातीचा देसाइ व हुकेरी परगण्याचा देसाइ आलगौडा यांनी मोगलांच्या वतीने मराठयांकडील गंधर्वगड घेतल्याचा उल्लेख आहे. या कामासाठी मोगलांनी काकतीच्या देसायांना अजमनगर/बेळगावची व हुकेरी देसायांना चंदगड व आजर्यासची देशमुखी मनसब व एक हत्ती देण्याचे अमिष दाखविले होते. या किल्ल्याचा ताबा बरीच वर्षे आदिलशाहीशी जवळीक असलेल्या हेरेकर सावंत भोसले यांच्याकडे होता. इ.स. १७८७ सालीं नेसरगीच्या सरदारानें कोल्हापुर गादीविरुद्ध बंड करून इतर किल्ल्यांबरोबर हा किल्ला ताब्यात घेतला पण लवकरच या बंडाचा मोड करण्यांत करून किल्ला पुन्हा कोल्हापुरच्या ताब्यात आला. परंतु इ.स. १७९३ सालीं शिंद्यांच्या मध्यस्तीने हा किल्ला पुन्हा सांवतवाडीकरास देण्यात आला. सदाशिवराव भाऊ कर्नाटकात जाताना येथे काही काळ मुक्कामास होते. पुढे १८४४ च्या बंडात इंग्रजांनी या गडाची बरीच नासधूस केली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!