FARKANDE

TYPE : CITY FORT/FORTRESS

DISTRICT : JALGAON

HEIGHT : 0

महाराष्ट्रात झुलते मनोरे असलेले एकमेव ठिकाण म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेले फरकांडे गाव. लहानपणी भुगोलाच्या पुस्तकात देखील या ठिकाणाचा उल्लेख आपण वाचलेला असतो पण कालांतराने हे ठिकाण आपल्या विस्मरणात जाते. फरकांडे येथील या झुलत्या मनोऱ्यांची माहिती वाचताना हे गाव नगरदुर्गाच्या आत वसलेले असुन या गावात एक गढी असल्याचे वाचनात आले व माझ्या नगरदुर्गांच्या यादीत अजुन एका नावाची भर पडली. जळगाव जिल्ह्यातील गढीकोटांची भटकंती करताना या गावात जाणे निश्चित झाले. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेले हे ठिकाण नाशिक-आग्रा महामार्गापासून पारोळामार्गे ५० कि.मी. अंतरावर तर एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणाहुन १८ कि.मी.अंतरावर आहे. एरंडोल गावात प्रवेश करताना हे गाव कोटात असल्याची जाणीव होत नाही पण येथील मनोरे पहायला गेल्यावर त्याच्या आसपास असलेली तटबंदी व जवळच खंदकात उतरण्यासाठी असलेला दरवाजा पहाता हे गाव नगरदुर्गाच्या आत असल्याचे दिसुन येते. फरकांडे येथील मनोरे पहायला अधून मधुन पर्यटक येत असल्याने हे ठिकाण स्थानिकांना परीचीत आहे व त्यामुळे आपण सहजपणे या मनोऱ्याजवळ पोहोचतो. ... हे मनोरे एका मशिदीच्या बांधकामात असुन या मशिदीच्या चारही बाजुस प्राकाराची भिंत आहे. मशिदीच्या समोरील भागात नगरदुर्गाची तटबंदी असुन या तटबंदीत बाहेरील बाजुस असलेल्या खंदकात उतरण्यासाठी लहान दरवाजा आहे. मशीदी बाहेरील भिंतीत आत प्रवेश करण्यासाठी असलेला लाकडी दरवाजा पहाता हे काम फार जुने असावे असे वाटत नाही. या दरवाजाने आत शिरल्यावर डाव्या बाजुस एक मध्यम आकाराचा लहान हौद असुन उजवीकडे एक थडगे आहे. या हौदात बाहेरील बाजूने दगडी नालीच्या मदतीने पाणी सोडले जात असल्याचे दिसुन येते. आता हि यंत्रणा बंद पडल्याने हौद कोरडा पडला आहे. मशिदीच्या मागील भागात तीन घुमट व त्यापुढे मशिदीचे दर्शनी भागात असलेले दोन मिनार म्हणजे हे झुलते मनोरे आहेत. यातील एक मनोरा २१ मार्च १९९१ साली ढासळलेला असुन दुसरा मनोरा मात्र आजही तग धरून आहे. शिल्लक असलेल्या या मनोऱ्याची उंची साधारण ४० फुट असुन हे दोन्ही मनोरे एकमेकांशी तीन कमानीने जोडले गेले आहेत. या दोन्ही मनोऱ्यात शिरण्यासाठी लहान दरवाजा असुन वर जाण्यासाठी अरुंद गोलाकार पायऱ्या आहेत. यातुन एकावेळी केवळ एकच व्यक्ती प्रवेश करू शकते. मनोऱ्यात हवा व प्रकाश येण्यासाठी खिडकीवजा कवाडे बांधलेली आहेत. मनोऱ्याच्या वरील टोकावर चार बाजुस लहान कमानी आहेत. या कमानीतुन संपुर्ण फरकांडे गाव नजरेस पडते. आज हा मनोरा हलत नसला तरी पुर्वी एका मनोऱ्यावर बसून त्याला हलविल्यास दुसरा मनोरा आपोआप हलत असे असे स्थानिक सांगतात. मनोऱ्यांच्या या हालचालीने या वास्तूला झुलते मनोरे अर्थात ‘स्विगिंग टॉवर्स ऑफ फरकांडे’ असे नाव मिळाले. काहीं जाणकारांच्या मते ही मशीद ४०० वर्षांपूर्वी फारुकी राजवटीत बांधली गेली असावी तर काही अभ्यासकांच्या मते हि मशीद अलीकडे इंग्रजांच्या कालखंडात चांद मोमीन नावाच्या इसमाने बांधली आहे. यातील काहीही खरे असले तरी ही वास्तू वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. मशीद पाहुन झाल्यावर फरकांडे गावाच्या भटकंतीस निघावे. गावाच्या मध्यवर्ती भागात आपल्याला शेवटच्या घटका मोजत असलेली गढी पहायला मिळते. कधीकाळी चौबुर्जी असलेल्या या गढीचे आज केवळ दोन बुरुज व दोन बाजुची तटबंदी शिल्लक आहेत. उरलेल्या वास्तुचा निसर्गासोबत मानवाने घास घेतलेला आहे. गढी पाहुन झाल्यावर नगरकोटाचे उरलेले अवशेष पहाण्यास निघावे. फरकांडे हे गाव भुईकोट किल्ल्यात वसले आहे. गावाभोवती आजही तटबंदीचे भग्नावशेष दिसतात. या तटबंदीत पुर्वी एकुण चार दरवाजे होते. यातील एक दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन उर्वरीत तीन दरवाजे आजही शिल्लक आहेत. यातील दोन दरवाजांच्या कमानी शिल्लक असुन एक दरवाजा मशीदजवळ तर दुसरा कमान शिल्लक असलेला दरवाजा रहदारीच्या वाटेवर पहायला मिळतो. रहदारीच्या रस्त्यावर असलेला या दरवाजाची कमान २० फुट उंच असुन त्याच्या आसपासची तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे. चौथा दरवाजा गावाबाहेर पडणाऱ्या मुख्य रस्त्यावर असुन रस्ता बांधताना किंवा त्यापुर्वीच या दरवाजाची कमान कोसळली असावी. या दरवाजा शेजारील तटबंदी आजही शिल्लक असुन या तटबंदीमध्ये दोन बुरुज पहायला मिळतात. गावाबाहेर असणारी हि तटबंदी पुर्णपणे बांधीव असुन हे बांधकाम सांधण्यासाठी चुन्याचा वापर केला आहे. हे एकुण बांधकाम पहाता ते फारुकी कालीन असावे असे वाटते. आज ऊतावळी नदी जरी गावाच्या दोन बाजुस दिसत असली तरी पुर्वी हिचे पाणी खंदक बांधुन या तटबंदी भोवती फिरवल्याचे दिसुन येते. फरकांडे गाव चालत पुर्णपणे फिरण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. फरकांडे गावचा इतिहास तुर्तास माझ्या वाचनात आलेला नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!