FARDAPUR

TYPE : SARAI

DISTRICT : AURANGABAD

उंची : 0

श्रेणी : सोपी

अजंठा म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात ती जगप्रसिद्ध अजंठा लेणी. या अजंठा लेण्यांचा प्रभाव पर्यटकावर इतका आहे की या लेण्यापुढे या भागातील इतर ऐतिहासिक वास्तु पुर्णपणे दुर्लक्षित झाल्या आहेत. यापैकी एक वास्तू म्हणजे अजंठा लेणीपासून २ कि.मी. अंतरावर असलेली फर्दापूर गढी(सराई). गढी म्हणजेच सराय. सराय हा शब्द पर्शियन सेराय या शब्दापासून आला आहे. सराय म्हणजे राजवाडा. औरंगाबाद–जळगाव या मार्गावरील फर्दापूर एक महत्वाचे शहर. औरंगाबादपासून साधारण १०५ कि.मी.वर तर जळगावहून येताना सोयगाव फाट्यावरून साधारण ३-४ कि.मी. अंतरावर फर्दापूर गाव आहे. जळगावहून औरंगाबादकडे जाताना सोयगाव फाटा पार करताच समोर अजिंठा डोंगर आणि घाट आहे. अजिंठा घाटाचे पायथ्याचे गाव म्हणजे फर्दापूर. या घाटमार्गाचे रक्षण व नाकाबंदी करण्यासाठी घाटाच्या वरील बाजुस अजंठा गढी तर घाटाच्या खालील बाजुस फर्दापुर गढीची बांधणी केली गेली. ... चौकोनी आकाराची हि गढी अंदाजे २ एकरवर पसरलेली असुन गढीची चार टोकांना चार बुरुज व दोन दरवाजाशेजारी असणारे प्रत्येकी दोन असे एकूण ८ बुरुज अशी हिची रचना असुन दोन मुख्य दरवाजे, १ उपदरवाजा, तटबंदीवरील चर्या, तटावर जाणारे भुयारी जीने, तटबंदीतील कमानी व कोठारे व इतर वास्तु आजही मोठया प्रमाणावर शिल्लक आहेत. मुघल काळात बांधल्या गेलेल्या या गढीवर मोगल वास्तुशैलीचा प्रभाव जाणवतो. औरंगाबादहून जाताना अजिंठा लेण्यानंतर साधारण २ कि.मी.नंतर डावीकडे फर्दापूर गाव आहे. या वाटेने आत आल्यावर उजवीकडे गढीचा(सराई) दरवाजा दिसुन येतो. या दरवाजाने गढीत प्रवेश केल्यावर समोरच गढीचा दुसरा दरवाजा दिसतो. गढीचे दरवाजे २५ फुट उंच असुन दरवाजावर चारही बाजूस चार स्तंभ दिसुन येतात. दोनही दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन तटबंदीत कोठारे बांधलेली आहेत. दोन्ही महादरवाजाचे लाकडी दरवाजे आजही शिल्लक आहेत. तटावर जाण्यासाठी सर्व बुरुजात अंतर्गत जिने आहेत पण या सर्व बुरुजावर अतिक्रमण झाल्याने दरवाजातून आत आल्यावर गढीच्या डाव्या कोपऱ्यातील फक्त एका बुरुजातून तटावर जाता येते. संपुर्ण तटबंदीला जागोजागी मारगीरीसाठी जंग्या ठेवलेल्या दिसुन येतात. तटावरून गढीला फेरी मारताना तटावरील चर्या लक्ष वेधून घेतात तसेच आतील अवशेष व कोटाच्या मध्यभागी असणारी मस्जिद नजरेस पडते. गढीच्या तटबंदीवर खूप मोठया प्रमाणावर अतिक्रमण झालेले असुन तटबंदीतील कोठारात शाळा भरते. गढीच्या आत असणारी जुनी विहीर बुजवली गेली आहे. या कोटाचा इतिहास अज्ञात असून याची निर्मिती औरंगजेबाच्या काळात झाल्याचे स्थानिक सांगतात. अजंठा लेणी पहायला आल्यावर अजिंठा गढी सहजपणे पहाता येते. मध्ययुगीन बांधकामाची साक्ष असणारी हि गढी एकदा तरी पहायला हवी. फर्दापूर गढी पाहण्यास अर्धा तास पुरेसा होतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!