ERANGAL

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : MUMBAI

HEIGHT : 0

GRADE : EASY

पश्चिम रेल्वेवर असलेल्या एरंगळ समुद्रकिनारा मुंबईकरांना चांगलाच परीचीत आहे. एरंगळ गाव मालाड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला सुमारे बारा किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी वसलेलं आहे. नारळी-पोफळीच्या बागा तेथील बंगले आणि एकंदर वातावरण पाहून जणू गोव्यातच आलो आहे असं वाटतं. एरंगळ गावाअलीकडे १ कि.मी वर दानापानी समुद्रकिनारा आहे. दानापानी समुद्रकिनारा संपतो तेथे सशस्त्र दलाचे कुंपण दिसते या कुंपणाला लागुनच समुद्रकिनाऱ्याकडे असलेल्या खडकाळ भागात एरंगळ बुरूज पहावयास मिळतो. हा बुरूज म्हणजे गोलाकार आकाराचा टेहळणीचा एकांडा शिलेदार. या बुरुजाचे इतिहासातील नाव माहित नसल्याने हा एरंगळ बुरूज म्हणूनच ओळखला जातो. समुद्राच्या खडकाळ भागाच्या मध्यभागी असणारा हा बुरूज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ... सद्यस्थितीत १० ते १२ फुट उंच दिसणाऱ्या या गोलाकार आकाराच्या बुरुजाच्या बांधणीसाठी ओबडधोबड दगड, चिखलमाती, शंखशिंपले यांचा वापर करण्यात आला आहे तर वरील भागातील बांधकामात घडीव दगडांचा वापर केलेला दिसतो. बुरुजावर घंटा बांधण्यासाठी असलेला मनोरा हे खास पोर्तुगीज स्थापत्याचे वैशिष्ट या बुरुजावर दिसून येते. वर चढण्यासाठी पायऱ्या नसल्या तरी हातांची मदत घेऊन वर चढता येइल पण सदर जागा सशस्त्र दलाच्या ताब्यात असल्याने वर प्रवेश करणे टाळावे. बुरूज छोटेखानी असून बाहेरुनच दहा मिनिटात पाहून होतो. एके काळी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकणातील प्रदेशात या परिसराचा समावेश होत होता. हा परिसर मराठी भाषेत फिरंगाण या नावाने ओळखला जात असे. फिरंगाणातील बहुसंख्य किल्ले हे पोर्तुगीजांनी उभारलेले आहेत. या किल्ल्यांची काही खास स्थापत्यशैली होती. फिरंगाणाचा इतिहास लक्षात घेता किल्ल्यांचे जे प्रयोजन होते तेच साध्य करण्यासाठी काही ठिकाणी एका बुरुजांची तर काही ठिकाणी चौक्यांची योजना पोर्तुगीजांनी केल्याचे लक्षात येते. एरंगळ गावाचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांनी या बुरूजाची निर्मिती केली होती. याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि आगंतुक आलेल्या नौकांना लांब पल्ल्याच्या तोफांच्या सहाय्याने अटकाव करण्यासाठी होत असावा. साधारणतः १६व्या शतकात मढ भागातील इतर गढीकोटाबरोबर हा बुरुजही पोर्तुगिजांनी बांधला. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमेत हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातुन उच्चाटन झाले. या बुरूजाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना काहीच माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जावे. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. याशिवाय एरंगळ गावात इ. स. १५७५ साली बांधलेलं एक ४५० वर्ष जुनं पश्चिमाभिमुख चर्च आहे. या चर्चच्या वेदीवर संत बोनाव्हेंचर यांची मूर्ती आहे. हे संत म्हणजे तेराव्या शतकात इटली देशात होऊन गेलेला एक मठाधिपती, जानेवारी महिन्याच्या दुस-या रविवारी एरंगळ येथे मोठी जत्रा भरते. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचा लोंढा एरंगळच्या समुद्रकिना-यावर येतो पण या किल्ल्याकडे मात्र कोणाचीही पाउले वळत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!