ERANDOL
TYPE : CITY FORT
DISTRICT : JALGAON
HEIGHT : 0
स्थानिकांच्या बोलण्यातुन आपल्याला अनेकदा तेथील वास्तुच्या अस्तित्वाचा काळ सहजपणे कळून येतो. जेव्हा स्थानिक एखादी वास्तु शिवाजी महाराजांच्या काळात बांधली गेली असे म्हणतात तेव्हा समजावे कि ती वास्तु मध्ययुगीन आहे. जेव्हा ते एखाद्या वास्तुचा संबंध थेट पांडवांशी जोडतात तेव्हा समजावे कि ती वास्तु प्राचीन आहे. जळगाव जिल्ह्यात असलेल्या एरंडोल शहराचा संबध देखील असाच पांडवांशी लावला जातो तेव्हा समजावे कि हे शहर प्राचीन काळापासुन अस्तित्वात आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहराचा संबंध देखील असाच थेट पांडवांशी जोडला जातो, त्यावरून या शहराच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. एरंडोल शहर हे एका भक्कम नगरकोटाच्या आत वसलेले असुन त्याचे तट,बुरुज व दरवाजे आजही शिल्लक असल्याचे वाचनात आल्याने हे शहर आमच्या जळगाव जिल्ह्यातील भटकंतीच्या यादीत सामील झाले. एरंडोल हे तालुक्याचे शहर जळगाव शहरापासुन ३२ कि.मी.अंतरावर असुन नाशिक- आग्रा महामार्गापासुन ६० कि.मी. अंतरावर आहे. अंजनी नदीच्या काठावर असलेले हे शहर महाभारतात एकचक्रनगरी म्हणुन ओळखले जात असुन पांडव त्यांच्या अज्ञातवासात काही काळ या शहरात वास्तव्यास असल्याची दंतकथा सांगितली जाते. ते ज्या ठिकाणी वास्तव्यास होते ते ठिकाण आज पांडववाडा म्हणुन ओळखले जाते.
...
मुळात हे ठिकाण म्हणजे आठव्या शतकातील जैन मंदीर असुन जहांगीर बादशहाच्या काळात हे मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधण्यात आली आहे. पांडववाडा हि येथील सर्वात महत्वाची वास्तु असल्याने सर्व प्रथम तो पाहुन घ्यावा. शहराच्या मध्यावर असलेले हे ठिकाण साधारण अर्धा एकरवर पसरलेले असुन या जागेचा वाद न्यायालय प्रविष्ट असल्याने तेथे छायचित्र घेण्यास मनाई आहे. पांडववाड्याच्या प्रवेशद्वारावर तसेच आतील बाजुस मोठ्या प्रमाणात दगडांवर कोरीव नक्षीकाम आहे. आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला मोकळी जागा असुन भिंतींमध्ये २४ दालने आहेत. या वास्तुच्या आत असलेली चोवीस दालने (ओवऱ्या) म्हणजे चोवीस तीर्थंकराची मुर्ती ठेवण्याचे स्थान आहे. यात कमळफुलांची नक्षी तसेच काही देवतांची शिल्पे स्पष्ट दिसुन येतात. या दालनांना जाळीदार खिडक्या कोरलेल्या आहेत. वाड्याच्या टोकाशी मशीद असुन या मशिदीच्या बांधकामात वापरलेले खांब हे मंदिराचे खांब आहेत. येथे असलेला पर्शियन शिलालेख येथुन दुसरीकडे हलवला गेला असुन त्या शिलालेखाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. –हि जामी मशीदची वास्तु इस्लामरक्षक व मूर्तिभंजक जहांगीर बादशहा गाझी याच्या काळात पुर्ण करण्यात आली. परमेश्वर त्याची राजसत्ता चिरायु करो.राज्यसत्ता प्राप्ती नंतरच्या पाचव्या वर्षातील जिल्हेजचा पाचवा महिना म्हणजे इ.स.१६१०. या कालगणनेनुसार जहांगीरने हिंदुंचे मंदिर नष्ट करून त्या जागी ही वास्तु उभारली आहे.या ठिकाणी जास्त थांबु दिले जात नसल्याने दहा मिनिटात हि वास्तु पाहुन घ्यावी लागते. पांडववाडा पाहुन झाल्यावर आपण आपल्या नगरदुर्गाच्या भटकंतीस सुरवात करावी. प्राचीनकाळी एरंडवेल किंवा अरुणावती म्हणुन ओळखले जाणारे हे शहर मध्ययुगीन काळात अंडाल /एरंडोल नावाने व्यापारासाठी भरभराटीस आले होते. येथुन कागद व कापुस यांचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत होता. एरंडोल शहर हे अजनी नदीच्या काठावर वसलेले असुन याच्या दोन बाजुस खंदक म्हणुन नदीपात्राचे संरक्षण आहे. संपुर्ण गावाभोवती भक्कम तटबंदी असुन या तटबंदीत जागोजागी संरक्षणासाठी अनेक बुरुज होते. या तटबंदीतुन गावात प्रवेश करण्यासाठी लहानमोठे अनेक दरवाजे असले तरी त्यातील केवळ नऊ दरवाजे आज त्यांच्या नावानीशी ज्ञात आहेत. त्यांची नावे बुधवार दरवाजा, अमळनेर दरवाजा, देवगिरी दरवाजा, कासार उर्फ कासोदा दरवाजा, चार दरवाजा, रंगारी खिडकी, पद्मालय दरवाजा, बेलदार दरवाजा, कागदी दरवाजा या प्रमाणे आहेत. पांडववाडा येथुन जवळच शहराच्या मध्यवर्ती भागात चौकामध्ये चार दरवाजा (चौक) आहे. येथे चार दगडी कमानी असुन या चारही कमानी एकमेकांना जोडलेल्या आहेत. या कमानी घडीव दगडात बांधलेल्या असुन त्यावर चारही बाजुस कमळे कोरलेली आहेत. या दरवाजातुन आजही रहदारी होत असते. कासोदा गावाकडुन नदीच्या बाजुने गावात शिरणारा गाडीमार्ग म्हणजे कासोदा उर्फ कासार दरवाजा. या दरवाजाची कमान रस्ता बांधताना नष्ट झाली असली तरी या दरवाजाशेजारी असलेले दोन्ही बुरुज आजही शिल्लक असुन या बुरुजांच्या वरील बाजुस मारगिरीसाठी असलेल्या जंग्या पहायला मिळतात. येथे तटबंदीच्या कोनाड्यात गणेश शिल्प बसवलेले आहे. याशिवाय अंजनी नदीपात्रातून गावात प्रवेश करण्यासाठी दगडी फरसबंद रस्ता असुन या वाटेवरील दरवाजा देवगिरी दरवाजा म्हणुन ओळखला जातो. आज हा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन काही प्रमाणात दरवाजा शेजारील तटबंदी व दगडी वाट शिल्लक आहे. या दरवाजाबाहेर नदीपात्रात चौकोनी मध्यम आकाराचा हौद बांधलेला आहे. यानंतर पुरा भागाच्या मध्यवर्ती भागात येण्याचा प्रवेशमार्ग म्हणजे रंगारी खिडकी (दरवाजा). हा मुख्य दरवाजा नसुन लहान दरवाजा आहे. या दरवाजा शेजारी संरक्षणासाठी बुरुज बांधलेला असुन दरवाजाच्या दोन्ही बाजूस देवगिरी दरवाजाप्रमाणे दगडी पायवाट बांधलेली आहे. यानंतर अमंळनेर शहराच्या वाटेवर असलेला दरवाजा म्हणजे अमळनेर दरवाजा. येथे एक बुरुज असून हा दरवाजा अमळनेरच्या दिशेला आहे. याशिवाय गांधीपुरा भागात पद्मालय दरवाजा, बेलदार दरवाजा, कागदी दरवाजा असे पडलेले वा पाडून टाकलेले पडक्या स्थितीतील दरवाजे आहेत. याशिवाय शहराच्या मध्यवर्ती भागात एक गढी असुन या गढीत नगरपालीकेचे कार्यालय आहे. या कार्यालयाशेजारी एक पायऱ्याची विहीर असुन कार्यालयाबाहेर वाटीच्या आकाराची दगडी ढोणी आहे. हि दगडी ढोणी भीमाची वाटी म्हणुन ओळखली जाते. गढीतुन बाहेर जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या असुन या पायऱ्याजवळच संरक्षणासाठी बुरुज बांधलेला आहे. नगरकोट व या गढीची भटकंती करण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. इ.स.१७७९ साली गुलझार खान याने या भागात धुमाकुळ घातला असता पेशव्यांनी परगण्याचा अधिकारी घनशाम त्रिंबक यास दोनशे घोडेस्वार देऊन त्याची गुलजार खानचा बंदोबस्त करण्यासाठी नेमणुक केली. या शिवाय ब्रिटीश काळात या भागात शेतसारा प्रकरणावरून ब्रिटीश अधिकारी व स्थानिक लोक यांच्यात वितुष्ट आलेले दिसुन येते.
© Suresh Nimbalkar