DRONAGIRI

TYPE : HILL FORT

DISTRICT : RAIGAD

HEIGHT : 785 FEET

GRADE : MEDIUM

प्राचीन काळापासून रामायणातील द्रोणागिरी पर्वत सर्वांना माहित आहे. रामायणातील कथेनुसार राम-रावणाच्या युद्धात बाण लागून लक्ष्मण मूर्च्छित पडला असता लक्ष्मणावर उपचारासाठी संजीवनी नावाची जडीबुटी आणण्यासाठी हनुमानाने हिमालयाकडे उड्डाण केले. हनुमान हिमालयातील एक डोंगरच उचलून लंकेकडे जात असता वाटेत डोंगराचा एक कडा तुटून अरबी समुद्राजवळ पडला तोच आजचा द्रोणागिरी होय अशी आख्यायिका आहे. या द्रोणागिरी पर्वतावर असलेल्या द्रोणागिरी किल्ल्यालाचा आज आपण भेट देणार आहोत. जवाहरलाल नेहरू पोर्ट या महत्वाच्या बंदरामुळे उरण शहर आज देशाच्या इतर भागाशी जोडलेल आहे. मुंबई, ठाणे, पनवेल येथून उरणसाठी थेट एसटी बसेस आहेत. पनवेल - उरण हे अंतर ३० किमी असुन उरण एस.टी स्थानकासमोर द्रोणागिरी डोंगर पसरलेला आहे. एसटी स्थानका समोरच्या रस्त्याने डाऊर नगरकडे चालत गेल्यास १० मिनिटात आपण डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या घरांपाशी पोहोचतो. ... येथून किल्ल्याला जाणारी वाट आहे. येथे समोर डोंगरउतारावर विजेचा ट्रान्सफॉंर्मर असुन त्याच्या दिशेने चालायला सुरवात केल्यास हि वाट प्रथम उजवीकडे व नंतर डावीकडे वळून डोंगरावर जाते. या वाटेने डोंगर चढायला सुरुवात केल्यावर १० मिनिटात आपण कुंपणापाशी पोहोचतो. हे कुंपण पार केल्यावर उजव्या बाजुच्या दाट झाडीतून वर जाणाऱ्या वाटेने आपण डोंगराच्या उजव्या टोकाकडील धारेवर पोहोचतो. येथे डावीकडुन डोंगरावर चढायला सुरुवात केल्यावर साधारण १० मिनिटात आपण एका अवशेषांपाशी पोहोचतो. येथे बहुधा टेहळणीची चौकी असावी. येथुन १५ मिनिटे चढून गेल्यावर आपला तुटलेल्या तटबंदीतुन गडाच्या माचीवर प्रवेश होतो. पायथ्यापासून येथवर येण्यासाठी साधारण एक तास लागतो. गड माथ्यावर प्रवेश केल्यावर गडाच्या दरवाजापासुन इथवर आलेली व तशीच पुढे गेलेली उध्वस्त तटबंदी दिसते. हि तटबंदी पाहुन पुढे जाताना उजवीकडे एका घराचे जोते तर डावीकडे पावसाळी साचपाण्याचा तलाव पहायला मिळतो. पुढे पोलिस चौकी असुन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ओएनजीसीच्या प्लाण्टवर लक्ष ठेवण्यासाठी येथे कायम पोलिस असतात. पोलिस चौकीच्या बाहेरच्या कट्ट्यावरून समोर निळाशार अथांग पसरलेला समुद्र, उजव्या बाजूला नरीमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडीया, घारापूरी तर डाव्या बाजूला रेवस, मांडवा, व त्यामागील खांदेरी व उंदेरी हे किल्ले दिसतात. पोलिस चौकीच्या मागिल बाजूस बालेकिल्ल्याची तटबंदी असुन या तटबंदीत बालेकिल्ल्याचे मागील कमानीदार पूर्वाभिमुख प्रवेशव्दार आहे. येथुन बालेकिल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच पोर्तुगीज पाद्री अंतोनो- दो- पोर्तो याने इ.स.१५३५ साली बांधलेले एन.एस. द पेन्हा चर्च नजरेस पडते. या चर्चप्रमाणे नोसा-सेन्होरे व सॅम फ्रान्सिस्को नावाची अजुन दोन चर्चेस किल्ल्यावर असल्याचे वाचनात येते पण सध्या त्यांचा मागमुसही दिसून येत नाही. पोर्तुगीज शैलीतील या चर्चचा दरवाजा साधारण १२ फूट उंच असुन त्यावर खिड्क्या व झरोके बांधलेले आहेत. या चर्चशेजारी गागौणी व गिजोणी नावाची पाण्याची दोन बंदीस्त टाकी आहेत. या टाक्यांवर विटांनी बांधलेल्या कमानीमुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन पाण्याची वाफ कमी होत असे व केर-कचरा पाण्यात पडत नसे. पण आता उपसा नसल्याने या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. बालेकिल्ल्याचा आकार चौकोनी असुन त्याच्या चारही टोकावर चार बुरुज आहेत.बालेकिल्ल्याची तटबंदी रचीव दगडांची असुन बांधकाम सांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचे मिश्रण वापरलेले नाही. बालेकिल्ल्याचा उत्तराभिमुख असलेला मुख्य दरवाजा पुर्णपणे उध्वस्त झालेला आहे. या दरवाजातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या असुन खालच्या बाजूस किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार आहे. या दरवाजाची कमान अर्धवट असुन एका बाजूचा बुरुज उध्वस्त झालेला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस असलेल्या देवड्या सुस्थितीत असुन त्यातील उजव्या देवडीत गणपती कोरलेला दगड ठेवलेला आहे. कधीकाळी हा दगड प्रवेशव्दाराच्या दर्शनी भागात असावा. मुख्य प्रवेशव्दार पाहून झाल्यावर दरवाजाकडे पाठ करून पायऱ्याच्या वाटेने वर चढायला सुरुवात करावी. पायऱ्या संपल्यावर डावीकडे जाणारी वाट पकडावी. या वाटेने सरळ गेल्यावर समोरच्या डोंगरावर दाट झाडीत एक भगवा झेंडा दिसतो त्या दिशेने चालायला सुरुवात करावी. या मळलेल्या पायवाटेने १० मिनिटात आपण वेताळ मंदिरापाशी पोहोचतो. येथे अडीच फूट उंचीचा शेंदुर फासलेला दगड असुन त्यावर पत्र्याचा निवारा उभारलेला आहे. वेताळ मंदिर पाहून त्याच्या मागील बाजुच्या पायवाटेने काही अंतर पुढे गेल्यास गडावरील दुसरा साचपाण्याचा तलाव नजरेस पडतो. गडाचा माथ्यावरील पसारा बराच मोठा असला तरी दाट झाडीमुळे कोणतेही अवशेष नजरेस पडत नाहीत. तलावापासुन आल्या वाटेने परत फिरावे. येथे आपले गडदर्शन पुर्ण होते. किल्ल्याचा आवाका फार मोठा नसल्याने १ तासात किल्ला पाहून होतो. प्राचीन काळापासून उरण बंदर म्हणून प्रसिध्द आहे. त्याकाळी या बंदराच्या संरक्षणासाठी उरण गावाभोवती तटबंदी बांधण्यात आली होती. तसेच उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला होता. सातवहानांच्या एका शिलालेखात उरण जवळील मोर गावाचा उल्लेख आहे. सातव्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मौर्यांची घारापूरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख ऎहोळे येथील शिलालेखात आहे. घारापुरी या राजधानी पासुन जवळ असणाऱ्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे. द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. इ.स.१५३० मध्ये पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात घेतल्यावर पोर्तुगीजांनी या किल्ल्याची डागडुजी केली व इ.स. १५३५ मध्ये अंतोनो- दो- पोर्तो या पाद्रीने नोसा-सेन्होरे, एन.एस. द पेन्हा व सॅम फ्रान्सिस्को ही तीन चर्चेस बांधली. १६ व्या शतकात काही काळ आदिलशहाकडे असलेला हा किल्ला त्यानंतर इंग्रजांकडे गेला. मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्वाचा होता. १० मार्च १७३९ ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!