DONGARKINHI
TYPE : FORTRESS
DISTRICT : BEED
HEIGHT : 0
GRADE : EASY
मराठवाडा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला येथे किल्ल्यायेवजी गढी जास्त प्रमाणात पहायला मिळतात. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात डोंगरकिन्ही येथे अशीच एक गढी पहायला मिळते. पाटोदा-डोंगरकिन्ही हे अंतर १५ कि.मी.असुन बीड शहरापासुन हि गढी ४० कि.मी.अंतरावर आहे. या भागात ५० कि.मी.च्या घेऱ्यात सहा-सात गढ्या असुन त्या एका दिवसात पहाता येतात पण त्यासाठी खाजगी वाहन सोबत असायला हवे. डोंगरकिन्ही गावात प्रवेश करताना दुरूनच हि गढी नजरेस पडते. गढीजवळ आल्यावर गढीच्या आसपास परकोट असल्याच्या खुणा दिसुन येतात. आज हा परकोट पुर्णपणे नष्ट झाला असुन गावकऱ्यांनी या परकोटाची दगडमाती स्वतःची घरे बांधण्यास वापरलेली आहे. आता हा प्रयोग गढीवर चालू आहे.
...
गढीच्या तटाची उंची साधारण ३० फुट असुन तळातील १५ फुटाचे बांधकाम घडीव दगडात केलेले असुन वरील बांधकामासाठी पांढरी चिकणमाती वापरलेली आहे. आयताकृती आकाराच्या या गढीत चार टोकावर असलेल्या चार बुरुजापैकी दरवाजा जवळील एक बुरुज पुर्णपणे ढासळलेला आहे. बाहेरील परकोट वगळुन या गढीचा परीसर साधारण २२ गुंठे आहे. गढीच्या उत्तर भागात तटबंदीच्या मध्यात गढीचे मुख्य प्रवेशद्वार असुन येथील तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळल्याने दरवाजाची केवळ कमान शिल्लक आहे. गढीच्या आत मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे वाढलेली असुन त्यातुन वाट काढत फिरावे लागते. गढीच्या दक्षिणेकडील तटाला लागुन दुमजली बांधकामाचे अवशेष तसेच तटबंदीतुन बाहेर पडण्यासाठी एक लहान दरवाजा दिसुन येतो. फांजीचा भाग मोठ्या प्रमाणात ढासळलेला असुन त्यात काही ठिकाणी शिल्लक असलेल्या विटा वरील बांधकाम विटांचे असल्याचे दर्शवितो. गढीच्या आतील अवशेष झाडीने पुर्णपणे झाकोळलेले असल्याने पहाता येत नाहीत. एका बुरुजावर वर जाण्यासाठी पायऱ्या असुन त्यांची अवस्था बिकट असल्याने वर जाणे धोकादायक आहे. गढीच्या आत असलेली विहीर आता पुर्णपणे बुजलेली आहे. संपुर्ण गढी फिरण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. हि गढी कृष्णाजी गणेश देशमुख यांनी पेशवेकाळात बांधलेली असुन या देशमुखांचे मूळ आडनाव कानडे असे होते. या गढीबरोबर त्यांनी एका बारवेची निर्मीती केली असुन हि बारव आपल्याला गावाच्या पुर्व बाजुस कडा-बीड मार्गावर बीडवरून येताना डावीकडे पहायला मिळते. या बारवेत ती बांधल्याचा काळ दर्शविणारा शिलालेख असुन सोबत श्री व्यंकटेश चरणी तत्पर कृष्णाज देशमुख मामले बीडनी असा मजकुर कोरलेला आहे. देशमुख यांचे वंशज आता पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे गढीकडे पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याने गढीचे अतोनात नुकसान होत आहे.
© Suresh Nimbalkar