DINDIGAD

TYPE : HILL

DISTRICT : THANE

HEIGHT : 900 FEET

GRADE : EASY

महाराष्ट्रातील अनेक डोंगरांवर देवतांची मंदीरे असुन काही ठिकाणी मंदिर असलेल्या या डोंगरांचे गड असे नामकरण करण्यात आले आहे. मुळात गड म्हणजे किल्ला अथवा डोंगरावर लष्करी ठाणे असलेले ठिकाण पण असे न घडता काही ठिकाणांना सरसकट गड म्हणुनच संबोधले जाते. यात खासकरून देवतांची मंदीरे असलेली ठिकाणे येतात. मुंबई –नाशिक महामार्गावरील सोनाळे गावाच्या हद्दीत येणारा दिंडीगड यापैकी एक. दुर्गप्रेमींनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे हा कोणत्याही प्रकारचा गड अथवा किल्ला नसुन अलीकडील काळात बांधलेले महादेव मंदीर असलेले ठिकाण आहे. कोणत्याही प्रकारचा ऐतिहासिक अथवा कागदोपत्री पुरावा नसलेल्या या डोंगराचा अलीकडील काळात काही ठिकाणी गड म्हणुन उल्लेख आला आहे.इतिहासात कोठेही या किल्ल्याचा उल्लेख दिसुन येत नाही पण काहीही प्रमाण नसलेल्या कथा मात्र या डोंगराबद्दल सांगितल्या जातात. मुंबई-नाशिक महामार्गावरील हा डोंगर भिवंडीपासुन १० तर कल्याणपासून १३ कि.मी.अंतरावर खाजगी वाहनाने थेट मंदीर असलेल्या टेकडीच्या पठारावर जाता येते. ... पठारावरून मंदिर साधारण २०० फुट उंचावर असुन मंदिराकडे जाण्यासाठी पायवाट तसेच पायऱ्या बांधलेल्या आहेत. मंदीर अगदी अलीकडील काळात म्हणजे २००१ नंतर बांधलेले असुन या मंदिराकडून खुप दूरवरचा प्रदेश म्हणजे ठाणे शहर, भिवंडी शहर, माहुली ,वळणे घेत कल्याणला जाणारी उल्हास खाडी इतका प्रदेश नजरेस पडतो. या भागातील हा उंच डोंगर असल्याने येथुन खूप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो पण या डोंगरावर कोणत्याही प्रकारचे किल्लेवजा अथवा सरंक्षणदृष्टया केलेले बांधकाम दिसुन येत नाही.येथुन दूरपर्यंत दिसणारा प्रदेश या डोंगराचे महत्व अधोरेखित करतो पण येथे कोणताही किल्ला नाही. आपण गाडी पठारावर जेथे थांबवतो तेथून एक पायवाट लोखंडी कमानीखालुन जाताना दिसते. या वाटेने साधारण १५ मिनिटे खाली उतरत गेल्यावर आपण एका प्राचीन भग्न मंदिराजवळ पोहोचतो. साधारण ८ व्या शतकातील हे मंदिर असुन या मंदिर परिसरात अनेक भग्न शिल्प पहायला मिळतात. यात एक कोरीव व्यालशिल्प असुन गजासुराची भग्न मूर्ती आहे. मंदिराचे गर्भगृह आजही शिल्लक असुन त्यात महादेवाची पिंड आहे. या मंदिराकडून पुन्हा १० मिनिटे खाली उतरल्यावर आपण ब्रिटीश काळात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भुयारी पाणीपुरवठा मार्गाजवळ (duckline) पोहोचतो. आता या भुयाराचा पाणीपुरवठा करण्यासाठी वापर होत नसल्याने पावसाळ्यानंतर पाझर थांबल्याने ते कोरडे पडते. या भुयाराची लांबी साधारण अर्धा कि.मी.असुन सोबत विजेरी असल्यास या भुयाराची धाडसी भटकंती करता येते. गडावरील मंदीर, पाताळेश्वर मंदीर व भुयारी मार्ग हा संपुर्ण परिसर फिरण्यासाठी अर्धा दिवस पुरेसा होतो. टीप – हे केवळ महादेवाचे मंदीर असलेले ठिकाण असुन याला गड/किल्ला म्हणुन संबोधणे योग्य नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!