DHARMAPURI
TYPE : GROUND FORT
DISTRICT : BEED
HEIGHT : 0
GRADE : EASY
मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला सोलापुर, औसा, परांडा, उदगीर, कंधार, धारूर यासारखे सहा-सात बलदंड भुईकोट वगळता फार कमी प्रमाणात दुर्ग पहायला मिळतात. स्वतंत्रपुर्व काळात या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले अलीकडील काळापर्यंत नांदते राहील्याने आजही सुस्थितीत आहेत. मराठवाडयातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. यामुळेच आपल्याला संपुर्ण बीड जिल्ह्यात धर्मापुरी व धारूर हे दोन किल्ले व अनेक गढी पहायला मिळतात. यातील धर्मापुरी हे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे. धर्मापुरी किल्ला लातुर शहरापासुन ४५ कि.मी. अंतरावर असून बीड शहरापासून ११५ कि.मी.म्हणजे बराच दूर अंतरावर आहे. त्यामुळे लातूर येथे रेल्वेने अथवा अंबाजोगाई येथे बसने येऊन धर्मापुरी किल्ल्यास जाणे जास्त सोयीचे आहे. धर्मापुरी हे गाव अंबेजोगाई – अहमदपूर या महामार्गावर वसलेले आहे. अंबेजोगाईहून धर्मापुरी गावाकडे जाण्यासाठी बस असली तरी या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा.
...
धर्मापुरी किल्ला गावामागील लहानशा टेकडीवर वसलेला असुन गावात प्रवेश करताना दुरूनच किल्ल्याची तटबंदी दिसुन येते. गावात प्रवेश केल्यावर किल्ल्याकडे जाताना जागोजागी उघडयावर पडलेली शिल्प धर्मापुरी हे गाव प्राचीन काळापासुन नांदत असल्याची साक्ष देतात. किल्ल्याच्या दरवाजाजवळ नव्याने बांधलेले राममंदीर असुन तेथे गाडी थांबवुन आपल्या गडफेरीस सुरवात करावी. किल्ला सुस्थितीत असला तरी प्रवेशाच्या भागात काटेरी झुडुपे उगवलेली असुन मोठ्या प्रमाणात घाण झालेली आहे. काही गावकरी किल्ल्याचा वापर हागणदारी म्हणून करत असल्याने नाकाला रुमाल लावुन पाय सांभाळतच किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. किल्ल्याच्या मुख्य दरवाजास अधिक संरक्षण देण्यासाठी नंतरच्या काळात या दरवाजा समोर परकोटाची भिंत उभारण्यात आली आहे. हि भिंत टेकडीवरील तटबंदी पासुन खाली जमीनीपर्यंत बांधण्यात आली असुन त्यात दोन लहान दरवाजे बांधण्यात आले आहेत. साधारण ३०-३२ पायऱ्या चढत परकोटातील दोन लहान दरवाजे पार करून आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजा समोर पोहोचतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन एका मोठ्या षटकोनी बुरुजात बांधलेला आहे. १० फुट उंचीचा हा मोठा दरवाजा नंतरच्या काळात दगडी भिंतीने बंदिस्त केलेला असुन त्यात केवळ एक माणुस वाकुन प्रवेश करू शकेल इतपत लहान दिंडी दरवाजा ठेवलेला आहे. या शिवाय किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी अजुन दोन लहान दरवाजे आहेत. यातील एक दरवाजा दगडांनी बंद करण्यात आला असुन दुसऱ्या दरवाजात दगड कोसळल्याने तो बंद झाला आहे. हे उर्वरीत दोन्ही दरवाजे आत बाहेर भटकंती करताना पहाता येतात. मुस्लीम राजवटीत या किल्ल्याची निर्मीती करण्यात आली असल्याने या किल्ल्याच्या बांधकामात आपल्याला खुप मोठ्या प्रमाणात मंदिराचे कोरीव दगड,शिल्प तसेच काही मुर्ती दिसुन येतात. याची सुरवात या दरवाजा पासुनच होते. दरवाजाबाहेर डावीकडील तटबंदीवर मोठ्या प्रमाणात कोरीव शिल्पाचे दगड तसेच एक गणेश मुर्ती दिसुन येते. दिंडी दरवाजाने आत शिरल्यावर काटकोनात आतील दरवाजा असुन उजवीकडे पहारेकऱ्याची देवडी व डाव्या बाजुस किर्तीमुखाची शिल्पपट्टिका दिसते. आतील दरवाजावरील कमान पुर्णपणे ढासळलेली असुन या दरवाजाने आपला किल्ल्यात प्रवेश होतो. साधारण त्रिकोणी आकाराचा हा किल्ला १.५ एकरवर पसरलेला असुन तटबंदीला अष्टकोनी आकाराचे लहानमोठे ९ बुरुज आहेत. तटबंदीची समोरची बाजु निमुळती होत गेलेली असुन साधारण ४० फूट उंचीच्या तटबंदीत जागोजागी तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. दरवाजाच्या आत उजवीकडे तटबंदीत एक लहान खोली असुन डावीकडे तटावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत.सर्वप्रथम आपण किल्ल्याचा आतील परीसर पाहुन घ्यावा व नंतर तटावरून फेरी मारावी. त्यामुळे कमी वेळात आपला संपुर्ण किल्ला पाहुन होतो. उजवीकडील तटातील खोलीच्या पुढील भागात काही घरांचे अवशेष असुन तेथुन थोडे पुढे आल्यावर आपल्याला तटाला लागुन असलेले कमानीयुक्त कोठार दिसते. या कोठारात आत जाण्यासाठी २ x २ आकाराचे दोन दरवाजे असुन त्यातील डावीकडील दरवाजाने कोठारात उतरता येते. उजवीकडील दरवाजाच्या पायऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या दरवाजांच्या चौकटीलाही नक्षीकाम केलेले दगड वापरलेले आहेत. दरवाजाच्या वरील बाजुस तीन सुंदर शिल्प असुन त्यातील एका शिल्पात भगवान गौतम बुद्धांच्या वेगवेगळ्या मुद्रांमधील चाळीस ध्यानस्थ प्रतिमा आहेत. कोठाराच्या पुढील भागात अष्टकोनी आकाराची ७० फुट खोल विहीर असुन या विहिरीच्या तळाशी जाण्यासाठी तटबंदीच्या बाजुने वळणदार बंदिस्त पायरीमार्ग आहे. पायऱ्यांच्या सुरवातीच्या एका पायरीसाठी कमलपुष्प कोरलेला दगड वापरलेला असुन वरील बाजुस तटबंदीत एक देवनागरी लिपीतील शिलालेख आडवा रचलेला आहे. या विहिरीच्या तळाशी असलेल्या कमानी खालच्या पायरीजवळ एक सुंदर किर्तीमुख तसेच एक शिल्प पहायला मिळते. विहिरीच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात मंदिराच्या शिल्पपट्टिका वापरलेल्या आहेत. वापर नसल्याने विहिरीचे पाणी खराब झाले आहे. गडावरील हि सर्वात सुंदर वास्तु असुन केवळ विहिरीसाठी या गडाला भेट दिली तरी ती सार्थकी लागेल. विहिरीच्या वरील बाजुस पाणी साठविण्याची दगडी ढोणी ठेवलेली आहे. विहिर पाहुन थोडे पुढे आल्यावर तटबंदीतील एका दगडावर हनुमानासारखे दिसणारे शिल्प असुन त्याच्या पुढे काही अंतरावर सप्तमातृका असलेला शिल्पपट रचलेला आहे. या शिल्पपटात एका बाजुस गणपती तर दुसऱ्या बाजुस भैरव कोरलेला आहे. या शिल्पपटाच्या खालील बाजुस किल्ल्याचा दुसरा लहान दरवाजा असुन दगडमाती ढासळल्याने हा मार्ग बंद झाला आहे. हा दरवाजा बाहेरील बाजूने पहाता येतो. येथे किल्ल्याचा टोकावरील बुरुज असुन त्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत पण त्यावर न जाता आधी तटबंदीलगत असलेले अवशेष पाहुन घ्यावेत. तटबंदीच्या पुढील भागात एक लहान दरवाजा असुन या दरवाजाने आत शिरल्यावर आपण एका मोठ्या दालनात पोहोचतो. या दालनाच्या पुढील भागात एकामागे एक अशा तीन कमानी आहेत. या कमानीतुन आत शिरल्यावर तटबंदीत असलेले शौचकुप पहायला मिळते. या कमानी म्हणजे बहुदा किल्लेदाराचा वाडा असावा. तटबंदीचं कडेने तसेच पुढे आल्यावर अजुन एक शौचकुप पहायला मिळते. या शौचकुपाच्या पुढील भागातील तटबंदीत किल्ल्याचा मध्यम आकाराचा तिसरा दरवाजा आहे. हा दरवाजा दगडाची भिंत घालुन व्यवस्थित बंद करण्यात आला आहे. बाहेरील बाजुने हा दरवाजा पहाता येतो. तटबंदीच्या कडेने त्यात असलेली शिल्प पहात आपण प्रवेश केलेल्या ठिकाणी येऊन पोहोचतो. येथे सुरवातीला पाहीलेल्या पायऱ्यानी तटावर चढुन आपली उर्वरीत गडफेरी सुरु करावी. तटावरून आपण प्रवेश केलेल्या मुख्य दरवाजाचे सुंदर दर्शन घडते. किल्ल्याच्या आतील भागात असलेले अवशेष पुर्णपणे नामशेष झाल्याने सपाट मैदान झाले आहे. येथील अवशेषांचे दगड बहुदा किल्ल्याबाहेरील घरे बांधण्यासाठी वापरले असावेत. तटबंदीचा फांजीपर्यंतचा भाग घडीव दगडात बांधलेला असुन त्यावरील संरक्षक भिंत बांधण्यासाठी सफेद चिकणमातीचा वापर केलेला आहे. या भिंतीत बाणाचा व बंदुकीचा मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बांधण्यात आलेल्या आहेत. किल्ला लहानशा टेकडीवर असल्याने दरवाजाकडील भाग वगळता इतर बाजुंनी काही प्रमाणात उंचीचे नैसर्गिक संरक्षण आहे. तटबंदीचा वरील मातीचा भाग वगळता पुर्ण तटबंदी सुस्थितीत आहे. तटावरून फेरी मारताना त्यात असलेले बुरुज मोजत बाह्यांगाचे सुंदर दर्शन होते. किल्ल्याच्या समोरील टोकाशी असलेल्या बुरुज हा किल्ल्याचा सर्वात मोठा बुरुज असुन त्यावर पिराची कबर आहे. बुरुजावर प्रवेश करण्यासाठी तटबंदीच्या दोन्ही बाजुस कमानी असुन यातील एका कमानीजवळ भगवान गौतम बुद्धांचे शिल्प आहे. किल्ल्याबाहेर एक मोठा तलाव असुन येथील मंदीरे व किल्ला बांधण्यासाठी दगड काढल्याने हा तलाव निर्माण झाला असावा. या बुरुजावरून- तटावरून मुख्य दरवाजाकडे जाताना आपण दरवाजाच्या अलीकडील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावर ध्वजस्तंभाचा चौथरा बांधलेला आहे. बुरुजाच्या अलीकडे असलेल्या पायऱ्यानी खाली उतरून दरवाजाकडे आल्यावर आपली गडाची आतील फेरी पुर्ण होते. आता किल्ल्याबाहेर पडुन डाव्या बाजूने म्हणजे राम मंदिराच्या दिशेने आपल्या गड प्रदक्षिणेला सुरवात करावी.रस्त्याने २ मिनिटे चालल्यावर आपल्याला वाटेच्या डाव्या बाजुस एका चौथऱ्यावर ओळीत मांडलेली पाच नागशिल्पे दिसतात. या शिल्पांच्या विरुद्ध दिशेस तटबंदीत भवानी देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाजाला प्राचीन मंदीराच्या द्वारशाखेची दगडी चौकट असुन त्यावर नक्षी व खालील बाजुस जय-विजय यांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत. मंदिराच्या डावीकडील तटबंदीवर मोठ्या प्रमाणात शिल्प असुन बुरुजाजवळ मंदिराच्या तळाशी असणारी गजथराची शिल्पपट्टिका पहायला मिळते. मंदिराकडून तटबंदीच्या कडेने काटेरी झाडीतुन व घाणीतुन वाट काढत पुढे गेल्यावर आपण आत पाहीलेल्या बुजलेल्या दरवाजाच्या बाहेरील बाजुस पोहोचतो. हा संपुर्ण दरवाजा मंदिराच्या शिल्पांनी मढवलेला आहे. या दरवाजाची चौकट देखील मंदीराची असुन वरील कमानीत गजलक्ष्मीचे शिल्प व त्यावर दुसरे सुंदर शिल्प रचलेले आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन कोनाड्यात दोन व्याघ्रमुख असुन खालील बाजुस जयविजय यांचे शिल्प आहे. हे पाहून आपण आपली गडफेरी पूर्ण करू शकतो किंवा संपुर्ण किल्ल्याला फेरी मारत त्यातील शिल्प पाहू शकतो. बाहेरील तटबंदी व बुरूजांवर अनेक नक्षीकाम केलेले दगड आहेत. किल्ला आत बाहेर पुर्णपणे पहाण्यासाठी दीड तास पुरेसा होतो. धर्मापुरी गावाबाहेर केदारेश्वरचे प्राचीन मंदिर आहे. अप्रतिम कोरीव शिल्पांनी नटलेले हे मंदिर आवर्जुन पहावे असेच आहे. या मंदीराची माहिती आपल्या मंदीरे या सदरात दिलेली आहे. प्राचीन काळी धर्मापुरी हे धर्मक्षेत्र म्हणुन ओळखले जात होते. धर्मापूरी किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले त्यात असलेली मंदिरांवरील अनेक शिल्प पहाता या गावात अनेक मंदिरे होती व त्यांचेच दगड वापरून हा किल्ला बांधला गेला. सातवाहन, चालुक्य, कलचूरी, वाकाटक, कदंब इत्यादी घराण्यांचे या भागावर राज्य होते. चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली. त्याने अभिलषितार्थ चिंतामणी (राजमानसोल्लास) या ग्रंथाची निर्मिती केली होती. भव्य राजप्रासाद, नृत्यशाळा, तलाव, मनोहारी उद्याने, सुंदर वनराई, उत्तुंग देवालये आणि भव्य बाजारपेठ यांनी धर्मापुरी नगरी सजलेली व गजबजलेली होती. पुढे हा परिसर यादवांच्या अंमलाखाली होता. अल्लाउद्दीन खिलजीने हा प्रदेश यादवांकडून जिंकून घेतल्याचा उल्लेख येतो. (१२९६-१३१६) हा भाग मुहम्मद बिन तुघलकाने जिंकून घेतल्याने ‘भीर’ म्हणून ओळखला जाऊ लागला. (१३२५-५१) बहामनी साम्राज्याच्या उदयानंतर या प्रदेशावर बहामनी सत्ता प्रस्थापित झाली. किल्ल्याचे एकुण बांधकाम पहाता हा किल्ला बहामनी कालखंडातच बांधला गेला असावा. बहामनी सत्तेच्या अस्तानंतर हा भाग निजामशाहीच्या ताब्यात आला. पेशवाई काळात निजाम व मराठे यांच्यामधील राक्षसभुवन व खर्डा येथे झालेल्या लढाईत हा भाग मराठा साम्राज्यात आला पण पुन्हा या प्रदेशावर निजामाची राजवट प्रस्थापित झाली. १८ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता दिल्यावर हा प्रदेश १९५६ पर्यंत हैद्राबादचा भाग होता. १ नोव्हेंबर १९५६ राजी राज्य पुनर्रचना दरम्यान बीड जिल्ह्यासहित मराठवाडातील सर्व जिल्हे तत्कालीन मुंबई राज्यास जोडण्यात आले. शेवटी १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यावर बीड जिल्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा बनला.
© Suresh Nimbalkar