DHARANGAON

TYPE : CITY FORT

DISTRICT : JALGAON

HEIGHT : 0

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव हे तालुक्याचे ठिकाण म्हणजे जळगावातील एक महत्वाचे शहर. तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले हे शहर जळगाव शहरापासुन ३५ कि.मी.अंतरावर तर नाशिक आग्रा महामार्गापासुन ५८कि.मी.अंतरावर आहे. मुघलांच्या काळात हि कपड्यांची एक महत्वाची बाजारपेठ असल्याने या संपुर्ण शहराच्या रक्षणासाठी त्यांनी या गावाभोवती कोट उभारलेला होता. वाढत्या शहरीकरणाने या संपुर्ण कोटाचा घास घेतला असुन त्याचे मोजकेच अवशेष आज आपल्याला पहायला मिळतात. मुख्य रस्त्यावर असलेला कोटाचा मुख्य दरवाजा रस्ता रुंदीकरणासाठी २०१० साली पाडला गेला असुन आज त्याची केवळ छायाचित्र पहायला मिळतात. कोटाचा अजून एक दरवाजा आपल्याला गावाच्या मध्यवर्ती भागात असलेला मुस्लीम मोहल्ला येथे पहायला मिळतो. याशिवाय गावाबाहेर तेली तलावाजवळ किरण थिएटर येथे आपल्याला एका मजबुत गढीचे दोन बुरुज व शिल्लक तटबंदी पहायला मिळते. गावातील गंगारामेश्वर महादेव मंदिराशेजारी दगडात कोरलेली २५० x ४० फुट आकाराची एक मोठी बारव आहे. या बारवला एकुण चार कमानी आहेत. याशिवाय धरणगाव नगरपालिकेच्या आवारात दोन शिलालेख पहायला मिळतात. धरणगाव कोट परीसरात फिरण्यासाठी एक तास पुरेसा होतो. ... सतराव्या शतकात धरणगाव हे चांदवड –बऱ्हाणपूर या व्यापारी मार्गावरील एक महत्वाचे गाव होते. दोनगाव, दोरोनगाव, द्रोणगाव यांसारख्या नावांनी एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून धरणगावचा उल्लेख आढळतो. मुघलकाळात म्हणजे इ.स. १६०० च्या सुमारास चांगल्या प्रतीच्या कापडांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरातुन इंग्लंड व पर्सियाला सुरतमार्गे निर्यात होत असे. इ.स १६७४ मध्ये इंग्रजांनी व्यापारासाठी या शहरात वखार स्थापन केली होती. येथील कापड पाच हजार महमूदी रूपये अबकारी सूट देवून इंग्लंडला पाठवल्याची नोंद वाचनात येते. सुरतेच्या स्वारीदरम्यान शिवाजी महाराज येथे आल्याचे सांगितले जाते. १७व्या शतकात धरणगाव हे ब्रिटिश साम्राज्याचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्या वेळेस इथे मोगलांचे वर्चस्व असल्याने छत्रपती शिवाजी महाराजानी इ.स.१६७५ व इ.स. १६७९ अशी दोन वेळा या शहरातुन खंडणी वसूल केल्याचे सांगितले जाते. इ.स. १६७८ मध्ये ब्रिटीशांनी आपली वखार धरणगाव येथून चोपड्यांला स्थलांतरीत केली. संभाजी राजे गादीवर आल्यावर हंबीरराव मोहिते यांच्या सैन्याने फेब्रुवारी १६८५ मधे धरणगाव लुटले. इ.स १८१८ मध्ये धरणगाव इंग्रजी अंमलाखाली आल्यावर येथे ब्रिटिशांची मुख्य वसाहत होती. त्यांनी धरणगावला खानदेशची राजधानी बनवले. ब्रिटिश काळात लंडन येथे जन्मलेले लेफ्टनंट सर जेम्स औक्ट्रम हे ब्रिटिशांचे सेनापती होते. लेफ्टनंट औक्ट्रम यांनी धरणगाव येथे भिल्ल बांधवांच्या तुकड्यांची स्थापना केली. १८२५ ते १८३५ या दहा वर्षांच्या कालावधीत औकट्रम हे धरणगाव येथे राहायचे. लेफ्टनंट औक्ट्रम या याठिकाणी असताना साधे लेफ्टनंट म्हणून कार्यरत होते. ते नंतर ब्रिटिशांचे लेफ्टनंट जनरल, ब्रिटिशांचे सेनापती म्हणून कार्यरत झाले. बेयर्ड म्हणजे निष्कलंक आणि निर्दोष सरदार ही पदवी औक्ट्रम यांना मिळाली होती. या पदवीचा उल्लेख धरणगावच्या शिलालेखात करण्यात आला आहे. इतिहासाची साक्ष देणारे इंग्रजी व मराठी भाषेत असलेले हे दोन गोलाकार शिलालेख आपल्याला नगरपालिका इमारतीच्या आवारात पहायला मिळतात. हे शिलालेख इतिहासकालीन धरणगावची साक्ष देतात. या शिवाय अजुन एक महत्वाची माहिती म्हणजे धरणगाव हे बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे जन्मगाव आहे. त्यांचे जन्म ठिकाण असलेले त्यांचे घर आजही त्या मुळ स्वरूपात धरणगावात पहायला मिळते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!