DEULWADA
TYPE : HILL FORT
DISTRICT : CHANDRAPUR
HEIGHT : 820 FEET
GRADE : EASY
चंद्रपुर जिल्ह्यातील दुर्गभटकंती करताना आपल्याला गोंड राजांनी बांधलेले चंद्रपूर,बल्लारपूर, माणिकगड, भद्रावती यासारखे एकापेक्षा एक सरस किल्ले पहायला मिळतात. पण या मुख्य किल्ल्याच्या सामर्थ्याने या किल्ल्याच्या आसपास असलेले इतर अनेक किल्ले मात्र झाकोळले गेले आहे. भद्रावती किंवा भांदक नावाचा किल्ला आपण सर्वांस परिचित आहे पण या किल्ल्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला देऊरवाडा किल्ला केवळ दुर्गप्रेमीनाच नाही तर येथील स्थानिकाना देखील पुर्णपणे अपरिचित आहे. चंद्रपुर जिल्हयातील भद्रावती तालुक्यात असलेला हा किल्ला चंद्रपूर येथून ३५ कि.मी. अंतरावर आहे तर भद्रावती किल्ल्यापासुन फक्त ७ कि.मी.अंतरावर आहे. बिजासन लेणी ते देऊरवाडा किल्ला हे अंतर फक्त ५ कि.मी.आहे. भद्रावती किल्ला व बिजासन लेणी या दोन महत्वाच्या वास्तुजवळ असुन देखील देऊरवाडा हा किल्ला आजही पूर्णपणे अपरिचित आहे. देऊरवाडा किल्ला केवळ दुर्ग अवशेष अंगावर लेवुन परीपुंर्ण नाही तर अनेक शिल्पांनी देखील संपन्न आहे. निमुळत्या आकाराचा हा किल्ला २०० फुट उंच टेकडीवर वसलेला असुन साधारण २.५ एकरवर पसरलेला आहे.
...
किल्ला आकारांने लहान असला तरी त्याच्या आत दुसरी तटबंदी उभारून माची व बालेकिल्ला असे दोन भाग करण्यात आले आहेत. या दोन्ही भागात प्रवेश करण्यासाठी दोन स्वतंत्र दरवाजे आहेत. यात किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी उत्तरेकडील तटबंदीत एक दरवाजा तर पश्चिमेकडील तटबंदीत पुर्वाभिमुख दुसरा दरवाजा आहे. गावाच्या पश्चिम बाजूने आपण किल्ला चढण्यास सुरवात केल्यावर सर्वप्रथम आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली शिवमंदिराजवळ पोहोचतो. मध्यायुगाशी नाते सांगणाऱ्या या दगड बांधणीतील मंदीराला सौंदर्यकरणाच्या नावाखाली तैल रंगाची रंगरंगोटी करण्यात आली असुन त्यामुळे मंदिराची व त्यातील शिल्पांची दयनीय अवस्था झाली आहे. मंदीराच्या गर्भगृहात असलेले शिवलिंग आजही सुस्थितीत असुन मंदीराबाहेर गणपती, नृसिंह व विष्णु यांच्या मुर्ती पहायला मिळतात. मंदिराच्या मागे असलेल्या पायवाटेने टेकडीचा उभा चढ चढुन आपण किल्ल्याच्या दरवाजासमोर पोहोचतो. किल्ल्याची तटबंदी आजही शिल्लक असली तरी त्यातील दरवाजाची कमान मात्र ढासळलेली आहे. कोसळलेल्या कमानीचा दगड आपल्याला तटबंदीजवळ पहायला मिळतो. या शिवाय तटबंदी मधील एका दगडावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. या दरवाजाने आपला थेट बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. दरवाजाशेजारी असलेला चौकोनी आकाराचा बुरुज ढासळलेल्या अवस्थेत आहे. बालेकिल्ल्यावर दगडी बांधकामातील भवानी देवीचे असुन त्याला लागुनच कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. भवानी मंदीरातील भवानी देवी म्हणजे या किल्ल्याची गडदेवता असावी. या मंदिरापासून काही अंतरावर स्वर्गमंडप शोभावा असा चार खांबावर तोललेला नक्षीदार दगडी मंडप आहे. अत्यंत सुंदर अशी या स्तंभावरील कोरीव नक्षी आपले लक्ष वेधुन घेते. हे स्तंभ मंदिराच्या सभामंडपासाठीचे असावे कारण या शेजारी अर्धवट कोरलेले इतर दगडी खांब पहायला मिळतात. याशिवाय किल्ल्यावर अनेक मुर्ती विखुरलेल्या असुन त्यात लज्जागौरी,ब्रम्हासावित्री,उमामहेश्वर, विष्णुलक्ष्मी या मुर्ती प्रामुख्याने आहेत. बालेकिल्ल्याच्या मागील बाजुस असलेल्या तटबंदीतुन किल्याच्या दुसऱ्या भागात जाण्यासाठी दरवाजा आहे. किल्ल्याच्या या भागात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असुन येथे आपल्याला घरांचे चौथरे व बांधकामातील खळगे पहायला मिळतात. दरवाजातुन बाहेर पडल्यावर उजवीकडील उतारावर एका कातळात कोरलेली पहाऱ्याची चौकी पहायला मिळते. पुढे काही अंतरावर कोरडे पडलेले पाण्याचे टाके असुन स्थानिक लोक या टाक्याला सीता टाके म्हणुन ओळखतात. याशिवाय या भागात एक बुजलेली गुहा असुन आज तिचे केवळ लहानसे तोंड पहायला मिळते. पुढील वाटेने आपण खाली उतरत आल्यास आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजा जवळ पोहोचतो. या दरवाजाजवळ एक लहान गुहा असुन या गुहेच्या आत खाली उतरत जाणारी निमुळती वाट आहे. या वाटेच्या शेवटी पाण्याचे टाके आहे. किल्ल्यावर असलेली हि पाण्याची एकमेव सोय असुन स्थानिक लोक आजही हे पाणी पिण्यासाठी वापरतात. येथे काही काळ नरहरी साधु महाराजांचा मुक्काम असल्याने स्थानिक लोक या गुहेला नरहरी गुंफा म्हणतात. या वाटेवर किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी कधीकाळी दुसरा दरवाजा होता पण आज या दरवाजाच्या केवळ खुणाच शिल्लक आहे. हा दरवाजा कड्याला लागुन बांधलेला असुन त्याखाली उभ्या कातळात १०-१२ पायऱ्या कोरण्यात आल्या आहेत. त्याखालील पायऱ्या मात्र बांधीव स्वरूपाच्या आहेत. या पायऱ्या उतरून खाली आल्यावर आपले दुर्गदर्शन पुर्ण होते. संपुर्ण किल्ला पाहण्यास एक तास पुरेसा होतो. भद्रापूर किल्ल्यासोबत आपल्याला देऊरवाडा किल्ला व जवळच एका लहानशा टेकडीवर असलेली विजासन हि बौद्धकालीन लेणी पहाता येतात. देऊरवाडा किल्ल्याची भद्रापूर शहराशी असलेली जवळीक पहाता देऊरवाडा किल्ल्याचा इतिहास दोन हजार वर्षापेक्षाही जुना आहे. प्राचीन काळापासुन विदर्भावर वेगवेगळ्या राजसत्ता नांदल्या व त्यांनी काळानुरूप किल्ल्यांची बांधणी केली. भद्रावती गावाच्या पश्चिमेस असलेल्या विजासन टेकडीवर बौद्ध लेणी कोरलेली पहायला मिळतात. हि लेणी हीनयान पंथाच्या काळात कोरलेली असुन नंतरच्या काळात महायान पंथीयांनी त्या लेणीत बुद्धांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. या लेण्यामुळे भद्रावती शहराचा इतिहास सातवाहन काळापर्यंत मागे जातो. सातवाहन काळानंतर १२ व्या शतकात विदर्भावर माना जातीच्या नागवंशीय राजांनी सत्ता स्थापन केली. त्यांनी विदर्भात वैरागड, माणीकगड, सुरजागड या सारख्या किल्ल्यांची बांधणी केली. यातील भांकासिंह नावाच्या नागवंशीय राजाने भद्रावती नगरीची स्थापना केल्याचे मानले जाते. या किल्ल्यांवर असलेली नागशिल्पे पहाता या गोष्टीस पृष्टी मिळते. यानंतर १३ व्या शतकात विदर्भात गोंड राजवटीचा उदय झाला व त्यांनी या भागात आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची छाप या किल्ल्याच्या बांधकामात दिसुन येते.. गोंड राजांचा सुरुवातीचा काळ वगळता नंतरच्या काळात त्यांनी मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे त्यांच्यावर युद्धाचे फारसे प्रसंग ओढवले नाहीत. यानंतर १८ व्या शतकाच्या सुरवातीस गोंड वारसाहाक्काच्या अंतर्गत कलहात विदर्भावर नागपूरकर भोसल्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यांनी नगरधन, पवनी, रामटेक, गाविलगड या सारख्या महत्वाच्या किल्ल्यांची पुनर्बांधणी केली पण राज्याच्या अंतर्गत भागात असलेले संरक्षण साखळीतील अनेक दुय्यम किल्ले मात्र दुर्लक्षिले गेले. किल्ला उतरून खाली रस्त्यावर आल्यावर टेकडीच्या उताराच्या दिशेने गेल्यास आपल्याला उजवीकडे टेकडीच्या उतारावर दोन लहान लेणी कोरलेली दिसतात. तिथे जाण्यासाठी ठळक पायवाट नसल्याने कातळ चढूनच वर जावे लागते. दोन दरवाजे असलेली हि लेणी आतून एकच आहे. ही लेणी बहुदा पहारा देण्यासाठी असावी असे वाटते. या लेण्याशेजारी अजुन दोन लेणी असुन त्यातील एका लेणीत पाण्याचे बुजलेले टाके आहे. दुसरे लेणे लहानसे असुन त्यात दोन माणसे सहज राहू शकतात. देऊरवाडा किल्ला व त्याखालील लेणी पाहण्यास दोन तास पुरेसे होतात.
© Suresh Nimbalkar