DEULGAONRAJA
TYPE : NAGARKOT
DISTRICT : BULDHANA
HEIGHT : 0
GRADE : EASY
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा हे तालुक्याचे शहर आहे. स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज यांचे आजोबा राजे लखोजीराव जाधव ह्यांच्या वतंनदारीतील हे एक महत्वाचे गाव होते. इतिहासाशी आपले नाते सांगत जाधवांची किल्लेवजा गढी व या गावास असलेला कोट आपले काही अवशेष सांभाळत आजही ताठ मानेने उभा आहे. देऊळगावराजा शहर बुलढाणा शहरापासुन ७८ कि.मी.अंतरावर तर सिंदखेडराजा शहरापासुन केवळ १५ कि.मी. अंतरावर आहे. जुने देऊळगावराजा या भागात आपल्याला कोटाचे व गढीचे अवशेष पहायला मिळतात. देऊळगावराजा कोटाचे अवशेष म्हणजे याच्या तटबंदीत शिल्लक असलेले दोन दरवाजे. यातील एक दरवाजा गावाच्या टोकाला दक्षिण दिशेला असुन या दरवाजाच्या आतील बाजुस वीर हनुमान मंदीर आहे तर दुसरा दरवाजा गावाच्या उत्तर बाजुस सराफा बाजाराजवळ आहे. या दोन्ही दरवाजाचा खालील भाग घडीव दगडांनी बांधलेला असुन फांजीवरील भाग विटांनी बांधलेला आहे.
...
यात बंदुकीच्या मारगीरीसाठी जंग्या आहेत. या दोन्ही दरवाजांच्या कमानी शिल्लक असुन आतील लाकडी दारे मात्र नष्ट झाली आहेत. याशिवाय तिसरा दरवाजा आपल्याला बालाजी मंदीर परिसरात पहायला पहायला मिळतो. हा दरवाजा घडीव दगडांनी बांधलेला असुन दरवाजाच्या वरील भागात कोरीवकाम केलेला नगारखाना आहे. दरवाजाची लाकडी दारे व त्यातील दिंडी दरवाजा आजही शिल्लक असुन या दरवाजावर कोणतीही संरक्षण व्यवस्था दिसुन येत नाही. बालाजी मंदीर परिसरात अतिशय सुंदर असे जुने वाडे पहायला मिळतात. मंदिराला लागुन एक सुंदरशी पण वेगळ्याच धाटणीची पुष्करणी आहे. घडीव दगडात बांधलेली हि पुष्करणी चारही बाजुंनी बंदीस्त असुन आत उतरण्यासाठी दोन बाजुना तटभिंतीत पायऱ्या आहेत. जवळपास ४० फुट खोल असलेल्या या पुष्करणीत खाली तीस फुटावर एका बाजुस ओवऱ्या आहेत. नेहमी पाहण्यात असलेल्या पुष्करणीहुन वेगळी असलेली हि पुष्करणी आवर्जुन पहावी अशीच आहे. पुष्करणी पाहुन सरळ रस्त्याने नगरकोटाच्या दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजाकडे जाताना साधारण ५०० फुट अंतरावर उजव्या बाजुस एक मध्यम आकाराची दरवाजाची कमान दिसुन येते. हि कमान म्हणजे गढीभोवती असलेल्या तटबंदीतील दरवाजा असावा. या कमानीच्या आतील बाजुस दक्षिणमुखी हनुमान मंदीर आहे. या कमानी समोरच कधीकाळी राजे रावजगदेवराव जाधवराव यांची गढी होती. चौकोनी आकाराची हि गढी साधारण दीड एकर परिसरात पसरलेली असुन या गढीची पश्चिमेकडील तटबंदी त्यातील दोन बुरुज व गढीचे मुख्य प्रवेशद्वार आजही शिल्लक आहे. गढीचे शिल्लक असलेले बुरुज व तटबंदी यांचे तळातील बांधकाम घडीव दगडात केलेले असुन वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. दरवाजाच्या आतील भागात कमानीवजा बांधकाम असलेला चौथरा असुन पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. त्यातुन दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी जिना आहे. दरवाजाचा बाहेरील भाग आजही त्याच्या मुळ स्वरुपात असुन कोरीवकामाने सजवलेला आहे. गढीच्या आत देऊळगावराजा शिक्षणसंस्थेची शाळा असुन शाळेच्या इमारतीसाठी गढीची उर्वरित तटबंदी व बुरुज तसेच आतील वास्तु तोडण्यात आल्या आहेत. देऊळगावराजा नगरकोट परीसर पहाण्यास दोन तास पुरेसे होतात. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड जाधव घराणे प्राचीन आहे. निजामशाही व आदिलशाही काळात स्वतःच्या कर्तुत्वावर व पराक्रमावर काही मराठा घराणी उदयास आली त्यात सिंदखेडकर जाधवराव हे एक प्रमुख घराणे होते. सोळाव्या शतकात सिंदखेडची देशमुखी मुळे घराण्याकडे होती. गावातील रविराव ढोणे याने बंड करुन मुळे घराण्याची कत्तल केली यात मुळे घराण्यातील यमुनाबाई ही गर्भवती स्त्री वाचली. ती दौलताबादला निजामशहाचे सरदार असलेल्या लखुजी जाधवांच्या आश्रयाला गेली. या काळात सिंदखेड परगणा लखुजी जाधव यांच्याकडे होता. त्यांनी रविरावचे बंड मोडून काढले. मुळेंच्या कुटुंबात देशमुखी सांभाळणारा वारस न आल्याने लखुजी जाधवाना १५७६ला सिंदखेडची देशमुखी मिळाली व सिंदखेडच्या भरभराटीला सुरवात झाली. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई हि लखुजी जाधवरावांची कन्या होती. २५ जुलै १६२९ रोजी राजे लखुजी जाधव, त्यांचे दोन पुत्र अचलोजी व राघोजी आणी नातु यशवंतराव यांचा निजामशहाने देवगिरीच्या दरबारात खुन केला. सिंदखेडराजा येथे त्यांची समाधी पहायला मिळते. राजे लखुजी जाधव यांच्या चार पुत्रांच्या वंशजशाखा त्यांना वतनी असलेल्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा, आडगावराजा, किनगावराजा, मेहुणाराजा,उमरद व जवळखेड या ठिकाणी विस्तारल्या आहेत. राजे लखुजीराव यांचे नातु रावजगदेवराव जाधवराव यांनी इ.स.१६९० दरम्यान आपला कारभार सिँदखेड राजा येथुन देऊळगाव राजा येथे हलवल्याने देऊळगाव राजाचे महत्व वाढीस लागले. त्यांनी इ.स.१६९२ साली देऊळगावराजा येथे श्री व्यंकटेशाची मुर्ती स्थापन करुन मंदिर बांधले. त्यावेळेपासुन आजपर्यंत केवळ जाधवराव वंशजांना म्हणजे सिंदखेड, देऊळगाव, आडगाव, मेहुणे, किनगाव, उमरद व जवळखेड जाधवांना बालाजी मंदिराच्या गाभाऱ्यात लग्न लावण्याचा मान आहे. सिंदखेड येथे असलेला काळा कोट राजे रावजगदेवराव त्यांच्याच कारकिर्दीत बांधण्यास सुरवात झाली पण आदिलशहाने त्यास मनाई केल्याने हा कोट अर्धवटच बांधला गेला.
© Suresh Nimbalkar