DAWADI
TYPE : FORTRESS/ CITY FORT
DISTRICT : PUNE
HEIGHT : 0
पेशवेकाळात उत्तरेकडील मोहिमा करताना अनेक मराठा घराणी नावारूपास आली. या मराठा घराण्यांमध्ये राजकारणावर आपला ठसा उमटवणारे पराक्रमी व धोरणी पुरुष जन्माला आले. या काळात नावारूपाला आलेले असेच एक घराणे म्हणजे दावडी येथील गायकवाड घराणे. निमगाव दावडी या जोडनावाने ओळखल्या जाणाऱ्या या गावात आजही आपल्याला गायकवाड यांची गढी पहायला मिळते. निमगाव दावडी हे ठिकाण पुणे जिल्ह्यात खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरूनगर येथुन १२ कि.मी. अंतरावर आहे.राजगुरुनगर हे शहर असल्याने मुंबई-पुणे येथून तेथे जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे पण पुढे मात्र खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. महाराष्ट्रात आजही काही गावे तटबंदीयुक्त असुन त्यापैकी एक म्हणजे दावडी हे गाव. गावात प्रवेश करण्यापुर्वी दुरूनच कोटाची तटबंदी व त्यातील बुरुज नजरेस पडतात. वाढत्या लोकवस्तीमुळे गावाची वस्ती तटबंदीबाहेर आली असली तरी मूळ तटबंदी व त्याबाहेर असलेला खंदक आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे. संपुर्ण गाव साधारण बारा एकरवर पसरलेले असुन गावाभोवती असलेल्या या तटबंदीमध्ये लहानमोठ्या आकाराचे आठ बुरुज पहायला मिळतात.
...
या तटबंदीमध्ये दोन बुरुजात बांधलेले उत्तराभिमुख मुख्य प्रवेशद्वार असुन पश्चिम दिशेला दुसरा लहान दरवाजा आहे. या दोन्ही दरवाजावर व सर्व बुरुजावर कोटाबाहेर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या दिसुन येतात. दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. नगरकोटाच्या तटबंदी भोवती फेरी मारली असता काही ठिकाणी तटावर जाण्यासाठी पायऱ्या दिसुन येतात. मुख्य दरवाजाने आत शिरल्यावर सरळ गेल्यास आपण गढीजवळ पोहोचतो. गढीत प्रवेश करण्यापुर्वी बाहेरील बाजुस चार तर दरवाजा समोर दोन अशा एकुण सहा तोफा पहायला मिळतात. नगरकोटाच्या मध्यवर्ती भागात असलेली चौकोनी आकाराची हि गढी साधारण अर्धा एकरवर पसरलेली गढीच्या चार टोकाला चार बुरुज आहेत. तटाची उंची साधारण २५ फुट असुन खालील दहा फुटाचे बांधकाम दगडात तर त्यावरील बांधकाम मातीच्या विटांनी केलेले आहे. गढीचा दरवाजा पुर्वाभिमुख असुन त्याच्या दर्शनी भागात कमलपुष्प व पंजात हत्ती पकडलेले दोन शरभ तसेच कमानीवर गणपती कोरलेला आहे. दरवाजाची लाकडी दारे काळाच्या ओघात नष्ट झाली असुन माथ्यावर भग्न अवस्थेतील नगारखाना आहे. गढीत शिरल्यावर आतील बाजुस तटाला लागुन दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गढीच्या आतील वास्तु पुर्णपणे भुइसपाट झाल्या असुन तेथे खेळाचे मैदान बनविण्यात आले आहे. या मैदानाच्या पश्चिमेस तटाजवळ एक अरुंद भुयारी मार्ग असल्याचे दाखवले जाते पण हे भुयार नसुन या वाटेने काळजीपुर्वक खाली उतरल्यास जमिनीखाली बांधलेली तीन लहान दालने पहायला मिळतात. गढी पहाण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. गढीशेजारी श्रीरामाचे मंदिर व गायकवाडांचा कचेरीवाडा आहे. याशिवाय इंग्रजी व मराठी पाटी लावलेला अजून एक वाडा असुन त्यावर सुभेदार पिलाजीराव झुंगोजीराव गायकवाड यांनी इ.स. १७२९-३० या काळात हा वाडा बांधल्याची व सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी याची दुरूस्ती इ.स. १९३३ मध्ये केल्याचे नोंदले आहे. गढीजवळ असलेल्या शाळेच्या आवारात पेशवे काळातील पाणीपुरवठा करणारे हौद आहेत. हे हौद भरण्यासाठी नगरकोटा बाहेरील पुष्करणीतुन खापरी नळाने पाणी आणल्याचे दिसुन येते. गढी व नगरकोट पहाण्यासाठी साधारण एक तास पुरेसा होतो. घोड्याचे खोगीर हेच माझ तख्त हेच माझे घर असे म्हणणाऱ्या गायकवाड घराण्याची गढी व दावडीचा नगरकोट वाकडी वाट करून पहायलाच हवा. दावडी पासून जवळच निमगाव या गावी गढीवजा खंडोबा मंदिर आहे. या मंदिराच्या आवारात दीपमाळेवर सयाजीराव महाराजांशी संबंधित शिलालेख आहे. त्याचे वाचन खालीप्रमाणे श्री मार्तंडे । तत्पर । गायकावाड । सरकार । सयाजीराव महाराज शक १८-०१ (५) सुभानु । नाम । स.माघ.शु.११I गायकवाड घराण्यातील दमाजीराव गायकवाड यांच्या वंशजांनी दावडी येथे नगरकोट व गढ़ी बांधली. गायकवाड यांचे मूळ आडनाव मत्रे पण त्यांच्या घराण्यातील नंदाजी यांनी वाघाच्या तावडीतुन गाईस सोडवून घराच्या कबाड्याच्या बाजूस सुरक्षित ठेवले म्हणून त्यांचे आडनाव गायकवाड पडल्याचे सांगितले जाते. शेतकरी असलेल्या नंदाजी यांचे मुळशी तालुक्यातील भरे हे मूळगाव. इ.स.१७१६ मध्ये खंडेराव दाभाडे यांना शाहू महाराजांनी सेनापती पदावर नियुक्त केल्यावर नंदाजी यांच्या चार मुलांपैकी दमाजी हे खंडेराव दाभाडे यांच्या सैन्यात दाखल झाले. इ.स.१७१९ साली बाळापूर येथे निजामाशी झालेल्या लढाईत दमाजी गायकवाडांनी मोठा पराक्रम केल्यामुळे शाहू महाराजांनी त्यांना 'समशेर बहाद्दर' हा किताब व दावडी गाव इनाम दिले. इ.स.१७२० मध्ये दमाजी गायकवाडांचा मृत्यू झाला. दमाजीना संतती नसल्याने त्यांनी आपले बंधू झिंगोजीराव यांचे पुत्र पिलाजीराव यांना आपल्या मुलाप्रमाणे मानले होते. पिलाजीराव गायकवाड यांनी त्र्यंबकराव दाभाडेंसोबत गुजरात प्रांतात आपला वचक बसवला. इ.स.१७२७ साली पिलाजींनी डभई आणि बडोदा ही शहरे हस्तगत केली. डभईच्या लढाईत पिलाजीराव गायकवाडांनी बाजीराव पेशव्यांसोबत दाखवलेल्या पराक्रमाने ते गुजरातमधील मराठ्यांच्या सेनेचे सेनापती झाले. पण अहमदाबादच्या सुभेदाराने त्यांना दगाफटका करून मारले. पुढे पिलाजी पुत्र दमाजी(दुसरे)पानिपतच्या लढाईत सामील होते. पानिपत संग्रामाच्या वेळी दमाजीरावांचे बरेच सैन्य मारले गेले व त्यांचे भाऊ प्रतापराव परागंदा झाले. इ.स.१७६२ मध्ये थोरले माधवराव पेशव्यांच्या राक्षस भुवनच्या मोहिमेत दमाजी(दुसरे) यांनी चांगला पराक्रम केला. त्याबद्दल त्यांना दाभाडेंचा 'सेनाखासखेल' किताब मिळाला व गुजरातवरील अधिकार पुर्णपणे त्यांच्या ताब्यात आले. दमाजींना गुजरातेत मराठ्यांचे राज्य वाढविण्याचे श्रेय जाते. नंतर ते माधवरायांचा पक्ष सोडून राघोबादादांच्या पक्षात सामील झाले. चांदवडजवळ धोडप किल्ल्यावर झालेल्या लढाईत राघोबादादा व दमाजीराव यांचा पराभव झाला. हा पराभव दमाजीना जिव्हारी लागला व लवकरच त्यांचा मृत्यु झाला. नंतरच्या काळात बडोदा हे स्वतंत्र संस्थान म्हणून नावारूपाला आले. त्यात सयाजीराव पहिले, फत्तेसिंहराव, गोविंदराव, आनंदराव, सयाजीराव दुसरे, गणपतराव असे बडोद्याच्या राजगादीवर बसले. पुढे खंडेराव हे गादीवर आले. त्यांच्यापश्चात त्यांच्या पत्नी जमनाबाईसाहेब यांनी संस्थानचा कारभार सांभाळला. गादीला वारस नसल्याने त्यांनी कळवण येथील काशीराव गायकवाड यांचा मुलगा गोपाळ याला दत्तक घेतले व त्याचे सयाजीराव नामकरण करण्यात आले. सयाजीराव यांनी अतिशय उत्तम प्रकारे संस्थानचा कारभार केला व एक आदर्श राज्यकर्ता म्हणुन लौकिक मिळवला.
© Suresh Nimbalkar