DAULAVADGAON

TYPE : FORTRESS

DISTRICT : BEED

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्रात आजही सुस्थितीत असलेल्या काही गढीमध्ये दौलावडगाव येथील गढीचे नाव प्रामुख्याने घेता येईल. वेगळ्याच धाटणीची असलेली हि गढी आवर्जुन पाहण्यासारखी आहे. दौलावडगाव हे गाव बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असले तरी अहमदनगर येथुन तेथे जाणे जास्त सोयीचे आहे. आष्टी या तालुक्याच्या ठिकाणाहुन दौलावडगाव ३२ कि.मी.अंतरावर असुन अहमदनगर ते दौलावडगाव हे अंतर फक्त २२ कि.मी.आहे. आपला गावातील प्रवेश हा भग्न झालेल्या वेशीच्या प्रवेशद्वारातुन होतो. या दरवाजाला लागुनच एक विरगळ ठेवलेली असुन वेशी समोर जिर्णोद्धार केलेले मारुतीचे मंदिर आहे. वेशीच्या दरवाजाची कमान नष्ट झाली असुन दरवाजाच्या दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. गावाची एकुण रचना व त्यातील जुने दगडी वाडे पहाता हे गाव फार पुर्वीपासुनच अस्तित्वात असावे व गावाला कोट असावा. दरवाजाने आत शिरल्यावर उजव्या बाजुस दुरूनच गढीचा बुरुज नजरेस पडतो. येथुन दोन मिनिटातच आपण गढीसमोर पोहोचतो. आयताकृती आकाराची हि गढी साधारण पाउण एकरवर पसरलेली असुन गढीच्या संपुर्ण तटबंदीला पाच बुरुज आहेत. ... चौकोनी गढीच्या चार टोकाला चार बुरुज बांधलेले आहे. गढीच्या दरवाजाला संरक्षण देण्यासाठी या दरवाजासमोर परकोट बांधण्यात आला असुन या दरवाजाच्या समोरील बाजुस परकोटाच्या तटबंदीत मोठा अर्धगोलाकार बुरुज बांधण्यात आला आहे. तटबंदीची उंची साधारण २५ फुट असुन तटाचे १५ फुटापर्यंतचे बांधकाम दगडात तर त्यावरील बांधकाम विटांनी करण्यात आले आहे. या संपुर्ण बांधकामात चुन्याचा वापर करण्यात आला आहे. तटबंदी व बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या असुन बुरुजावर तोफांचा मारा करण्यासाठी झरोके ठेवलेले आहेत. परकोटाचा दरवाजा उत्तराभिमुख असुन तो गढीच्या बुरुजाजवळ बांधलेला आहे जेणेकरून बुरुजावरून गढीत प्रवेश करणाऱ्यावर नजर ठेवता यावी. परकोटात प्रवेश केल्यावर समोरच कोनाडे शिल्लक असलेल्या जुन्या वास्तुंच्या पडझड झालेल्या भिंती असुन नव्याने बांधलेली दोन-तीन घरे आहेत. गढी मालकांची मुख्य गढीत असलेल्या घरांची पडझड झाल्याने त्यांनी परकोटात स्थलांतर केलेले असुन हि घरे बांधलेली आहेत. गढीचा दरवाजा उंचावर असुन त्यासमोर आडवी भिंत घातलेली असल्याने परकोटात शिरलो तरी तो नजरेस पडत नाही. परकोटात प्रवेश केल्यावर डावीकडे दहा पायऱ्या चढुन जाणारे बंदिस्त बोळ असुन त्यात शिरल्यावर उजवीकडे वळुन पुन्हा पाच पायऱ्या चढल्यावर आपण गढीच्या पश्चिमाभिमुख दरवाजासमोर पोहोचतो. या दरवाजासमोर आडवी भिंत बांधलेली असुन त्यात परकोटात लक्ष ठेवण्यासाठी झरोके बांधलेले आहेत. या किंवा परकोटाच्या दरवाजावर कोणत्याही प्रकारचे नक्षीकाम केलेले दिसुन येत नाही मात्र दरवाजाच्या वरील भागात दोन माजले बांधलेले दिसुन येतात. दरवाजाची लाकडी दारे नष्ट झाली असली तरी त्यांचा साखळदंड व बंद करण्याचा अडसर आजही सुस्थितीत आहे. दरवाजाने आत शिरल्यावर दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देव्द्यावासून त्याशेजारी दोन्ही बाजुस तटावर जाण्यासाठी बंदिस्त जिना आहे. संपुर्ण तटबंदी सुस्थितीत असल्याने यातील एका जिन्याने वर चढुन संपुर्ण तटाला फेरी मारून दुसऱ्या जिन्याने खाली उतरता येते. दरवाजाच्या वरील भागात असलेल्या मजल्यावरून संपुर्ण गाव तसेच खुप दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. तटावरून खाली उतरून गढीत प्रवेश केल्यावर तातला लागुन असलेल्या वाड्याचा प्रशस्त चौथरा नजरेस पडतो. आज या वाड्याची केवळ बुरुजाला लागुन असलेली दालने शिल्लक असुन चौथऱ्यावरील तळखडे व भिंतीवर चुन्यात कोरलेले नक्षीदार कोनाडे या वास्तुचे वैभव दाखवतात. बुरुजाला लागुन असलेल्या डावीकडील दालनाखाली एक मोठे तळघर असुन या दालनातुन तळघरात जाण्यासाठी वाट आहे पण आत मोठ्या प्रमाणात वटवाघुळाचा वावर असल्याने धडपणे फिरता येत नाही. गढीचा वापर अगदी अलीकडील काळापर्यंत होत असल्याने गढीतील वास्तुरचना आजही अनुभवता येते. सध्या गढीचे मालक समीर पाटील यांची तिसरी पिढी गढीत नांदत असुन त्यांच्या आजोबांनी हि गढी मूळ मालकाकडून विकत घेतल्याचे त्यांनी सांगीतले. हि गढी गावात पाटलाची गढी म्हणुन ओळखली जाते याशिवाय त्यांनाही गढीच्या इतिहासाबाबत माहीती नाही. आलेल्या पर्यटकांचे ते आवर्जून आदरतिथ्य करतात. संपुर्ण गढी फिरण्यास एक तास पुरेसा होतो. संरक्षण व राहण्याची सोय या दोन्ही गोष्टी नजरेसमोर ठेऊन केलेले हे बांधकाम नगर भागात भटकंतीसाठी गेले असता आवर्जुन पहावे असेच आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!