DAFLAPUR
TYPE : GADHI/ NAGARKOT
DISTRICT : SANGALI
HEIGHT : 0
GRADE : EASY
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठा सत्तांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. उमराणी येथील प्राचीन मंदिरात इ.स. ११ व १२ व्या शतकातील काही प्राचीन शिलालेख आढळून येतात. यात कलचुरी घराण्यातील राजा बिज्जलदेव याने या मंदिरांना दान दिल्याची नोंद येते. डफळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी १६८० च्या सुमारास ३,००० मोहरा खंडणीच्या बदल्यात आदिलशाहीकडून जत, करजगी, बार्डोल आणि कणद यांची देशमुखी मिळवल्यावर डफळे राजघराणे व जत संस्थान उदयाला आले. सिद्दी खवासखानकडून आणखी वतने विकत घेऊन त्यांनी जत संस्थान वाढविले. या जत संस्थाना अंतर्गत जत व डफळापूर ही दोन मोठी शहरे आणि ११७ खेडी समाविष्ट होती. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर सटवाजीराजे यांनी धनाजी जाधव व संताजी घोरपडे यांच्या बरोबरीने आपल्या १६००० सैन्यासह मुघल सेनेवर हल्ला केला.
...
पेशवाईच्या काळात आऊसाहेब डफळे (१७०१–५४) यांनी पेशव्यांची अधिसत्ता मान्य करत संस्थानाचे स्वतंत्र कायम ठेवले. दुसऱ्या बाजीरावाने काही काळ देशमुखी जप्त करून त्रिंबकजी डेंगळेकडे या संस्थानचा कारभार सोपविला होता.१८२० मध्ये इंग्रजांनी तह करून सातारच्या छत्रपतींची अधिसत्ता मान्य करविली. त्यानुसार १८४६ नंतर ३ वर्षे राजा अल्पवयीन असल्याने कारभार छत्रपतींचाच होता. सातारा खालसा झाल्यावर (१८४८) संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक बनले. डफळ्यांच्या गैरकारभारामुळे १८७४–८५ या काळात एजंटच जवळजवळ सर्व कारभार पाहत असे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात डफळापूरचा २५ चौ.किमी. प्रदेश राणीची खाजगी जहागीर समजला गेला. संस्थानाला दत्तकाची सनद १८९२ मध्ये मिळाली. त्यानुसार १९०७ मध्ये रामराव अप्पासाहेब या दत्तकपुत्राला अखत्यारी मिळाली. डफळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांचा भाग्योदय डफळापूर येथुन झाल्याने त्यांनी डफळे हे आडनाव घेतले तर काहींच्या मते डफळे आडनावावरून डफळापूर नाव पडले. सटवाजीराजे चव्हाण यांची समाधी आजही आपल्याला डफळापूर येथे पाहायला मिळते. डफळापूर शहर सांगली शहरापासुन ७० कि.मी.वर असुन जत या तालुक्याच्या शहरापासून १७ कि.मी.अंतरावर आहे. जत संस्थानातील डफळापूर हे एक महत्वाचे शहर असल्याने या संपुर्ण शहराभोवती कोट होता. सटवाजीराजे चव्हाण यांच्या काळातच हि तटबंदी बांधली गेली असावी. आजही बहुतांशी डफळापूर हे या कोटातच वसले आहे. आज हि तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असली तरी काही ठिकाणी हि तटबंदी, बुरुज , कोटाचे मुख्य प्रवेशद्वार त्या शेजारील ढासळलेले बुरुज, कोटाचा लाकडी दरवाजा यासारखे अनेक अवशेष पहायला मिळतात. मुख्य दरवाजा समोर असलेले मारुतीचे मंदीर आजही वेशीवरील मारुती मंदिर म्हणुन ओळखले जाते. या मंदीरात काही झिजलेली शिल्पे पहायला मिळतात. मुख्य दरवाजाची कमान घडीव दगडात बांधलेली असुन या कमानीवरील चर्या मात्र विटांनी बांधलेल्या आहेत. या कमानीपासुन काही अंतरावर सरदार डफळे यांची दोन एकर परिसरात पसरलेली चौकोनी आकाराची गढी आहे.सध्या या गढीचा वापर राजे विजयसिंह डफळे शाळा व महाविद्यालय यासाठी करण्यात येत असल्याने या वास्तुत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. गढीची तटबंदी मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असून या गढीच्या चार टोकाला असलेले चार बुरुज व गढीचा दरवाजा आजही पहायला मिळतो. गढीच्या आवारात रामाचे मंदीरअसुन एक चौकोनी आकाराची दगडात बांधलेली खोल विहीर आहे. या विहिरीच्या तळात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. डफळे यांच्या राजवाड्याच्या चौथऱ्यावर आज शाळेची बैठी इमारत आहे.वाड्याचा घडीव दगडात बांधलेला चौथरा पहाता कधीकाळी हा वाडा चौसोपी असल्याचे जाणवते. या चौथऱ्याखाली एक तळघर असुन सध्या त्याचा दरवाजा बंद करण्यात आला आहे. गढीच्या उर्वरित भागात नव्याने बांधलेली महाविद्यालयाची इमारत असुन गढीच्या चारही टोकाला उध्वस्त अवस्थेतील बुरुज आहेत. याशिवाय डफळापूर गावाबाहेर सटवाजीराजे चव्हाण यांचा समाधीचौथरा असुन या समाधीखाली तळघर आहे. या समाधी जवळ तुळशी वृंदावन असलेला दुसरा चौथरा असुन त्याला लागुन चुन्याच्या घाण्याचे चाक पडले आहे. याशिवाय समाधी असलेल्या भागात एक बारव तसेच दगडी बांधकाम व कमानीवजा ओवऱ्या असलेले जुने मंदीर आहे. या मंदिरासमोर तळघर असुन हे मंदीर परमानंद मंदीर म्हणुन ओळखले जाते. डफळापूर कोट ,गढी व आसपासचा परिसर पहाण्यास दोन तास हाताशी हवेत.
© Suresh Nimbalkar