CHIKHALI

TYPE : FORTRESS

DISTRICT : PUNE

HEIGHT : 0

पिंपरी चिंचवड शहराचा विकास होताना त्याच्या परिघात असलेली अनेक ऐतिहासिक गावे या विकासात सामील झाली व या गावांचे आता शहरात रुपांतर झाले आहे. आळंदी- देहु मार्गावर इंद्रायणी नदीकाठी वसलेले चिखली त्यापैकी एक. या गावाच्या ऐतिहासिक खुणा आता मिटत चालल्या आहेत किंवा मिटल्या आहेत. पण या गावात असलेली एक वास्तु आजही ठामपणे उभी असुन या गावाचा ऐतिहासिक वारसा सांगत आहे. ती म्हणजे जाधव गढी. आज जाधव गढी म्हणुन ओळखली जाणारी हि वास्तु कधीकाळी पेशव्यांचे सरदार तापकीर यांनी बांधली पण पुढे काळाच्या ओघात या गढीचे हस्तांतरण जाधव यांच्याकडे झाले. सध्या या गढीचा ताबा तापकीरांचे नातेवाईक डॉ. अमरसिंह जाधवराव यांच्याकडे असुन त्यांनी हा ऐतिहासिक वारसा व्यवस्थितपणे जपला आहे. या ऐतिहासिक वास्तु नष्ट होण्यापुर्वी त्यांना भेट देऊन माहीती घेणे व या माहितीचे संकलन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातील आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी मी या गढ्याना भेट देऊन त्यांची माहिती आपल्या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीत असल्याने या गढीला भेट देण्यासाठी खाजगी तसेच सार्वजनिक वाहन पर्याय उपलब्ध असुन या गढीला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वेस्थानक म्हणजे पिंपरी. ... पिंपरी रेल्वेस्थानक ते चिखली हे अंतर आठ कि.मी.आहे. गावात जाधव गढी प्रसिद्ध असल्याने आपण सहजपणे या गढीपाशी पोहोचतो. चौकोनी आकाराची हि गढी साधारण अर्धा एकरवर पसरलेली असुन गढीच्या चार टोकाला चार बुरुज आहेत. गढीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन त्यावर दुमजली सज्जा आहे. गढीच्या दरवाजाच्या दर्शनी भागात दोन बाजुस दोन कोरीव शरभशिल्प कोरलेली असुन त्यावरील भागात तीन कमलपुष्प कोरलेली आहेत. तटबंदीचे फांजीपर्यंत बांधकाम घडीव दगडात केलेले असुन त्यावरील सज्जा व इतर बांधकाम विटांनी केलेले आहे. गढीचा मुख्य लाकडी दरवाजा आजही सुस्थितीत असुन त्यास लहान दिंडी दरवाजा आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर तटाला लागून दोन्ही बाजुस तटावर तसेच वरील सज्ज्यात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. दर्शनी भागात असलेल्या दोन्ही बुरुजावर नव्याने खोल्या बांधलेल्या आहेत. गढीच्या मध्यभागी असलेल्या वास्तु आज पुर्णपणे नष्ट झाल्या असुन या वास्तुच्या आत काही भूमिगत वास्तु आहेत. त्यातील एक वास्तु म्हणजे येथील वाड्याच्या आत असलेले तळघर व दुसरे नदीकाठी बाहेर पडणारा भुयारी मार्ग. पुर्वी या वाटेचा वापर नदीकाठी पाणी आणण्यासाठी व प्रसंगी निसटण्यास केला जात असावा. गढी पासुन नदी केवळ ४०० फुट अंतरावर असल्याने ते शक्य होत असावे. गढीच्या अंतर्गत भागात काहीच अवशेष नसल्याने हि गडफेरी १५ मिनिटात पूर्ण होते. चिखली येथील गढीवजा वाडा सहदेवजी ऊर्फ देवजी पाटील तापकीर यांनी इ.स.१७३१ च्या सुमारास बांधला. त्यांचे बंधू बरवाजी पाटील तापकीर हे चर्होलीच्या वाड्यात राहत असत. छत्रपती शाहूमहाराजांचे सरदार सुभेदार पिलाजी जाधवराव यांचे पुत्र सटवाजी जाधवराव यांचा विवाह देवजी पाटील तापकीर यांच्या कन्येबरोबर इ.स.१७५३ मध्ये या वाड्यात झाला. कालांतराने या वाड्याची नीट देखभाल होत नसल्याने तो इ.स. १८४५ मध्ये ग्वाल्हेरचे सरदार जाधव यांच्याकडे गेला. पुढे वाड्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे इमारतींची पडझड झाली. नक्षीकाम केलेले खांब, तुळ्या, महिरपी व अन्य लाकूडकाम केलेल्या वस्तू वाड्यातून नाहीशा झाल्या. वाड्याचा उपयोग गैरकामासाठी होऊ लागला. तापकीरांचे आप्त डॉ. अमरसिंह जाधवराव यांचे ऐतिहासिक वास्तूवर प्रेम असुन त्यांनी स्वतः जाधववाडी येथे असलेल्या त्यांच्या पुर्वजांच्या वास्तुंचे संवर्धन केलेले आहे. ग्वाल्हेरचे सरदार जाधव हे त्यांचे जवळचे नातेवाईक असल्याने इ.स.१९९५ मध्ये त्यांनी हि गढी त्यांच्याकडून विकत घेतली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!