CHANDRAPUR

TYPE : GROUND FORT

DISTRICT : CHANDRAPUR

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्राच्या सीमांचे थोडक्यात वर्णन करताना चांदा ते बांदा असा उल्लेख केला जातो. यातील बांदा म्हणजे महाराष्ट्रातील गोव्याच्या दिशेला असलेले शेवटचे गाव तर चांदा म्हणजे आजचा चंद्रपूर जिल्हा व त्यातील चंद्रपुर शहर. ब्रिटिश राजवटीत आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे हा जिल्हा चांदा नावाने ओळखला जात होता. इ.स. १९६४ मध्ये चांदा शहराचे नाव बदलून चंद्रपूर करण्यात आले. गौंड राजांची राजधानी असलेले चंद्रपूर शहर पूर्वी साडेतीन चौ.कि.मी. परिघात किल्ल्याच्या तटबंदीत वसलेले होते पण वाढत्या लोकवस्तीमुळे आता चंद्रपूरचा किल्लाच शहराच्या मध्यभागी आला आहे. चंद्रपुर शहराला असलेल्या या दगडी तटबंदीचा घेर नऊ कि.मी. लांब असुन या तटबंदीत लहानमोठे व वेगवेगळ्या आकाराचे एकुण ६१बुरुज आहेत. तटबंदीची उंची १५ ते २० फुटापर्यंत कमीजास्त आहे. संपुर्ण किल्ल्याचे बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. किल्ल्याच्या पुर्व व दक्षिण भागातुन वहाणारी झटपट नदी तसेच पश्चिमेकडून वहाणारी इरई नदी यांचा खंदक म्हणुन वापर केला असल्याने त्याप्रमाणे तटबंदीची उंची कमीजास्त केलेली आहे. पावसाळयात पुर परीस्थीती निर्माण झाली की आजही शहरात पुराचे पाणी शिरते तेव्हा परकोटाच्या भिंतीने ते अडविले जाते व पुराचा तडाखा कमी होतो. तटबंदी नसताना नदीकडचा हा भाग पावसाळ्यात पाण्याखालीच असावा. ... या दृष्टीने चंद्रपूरच्या किल्ल्याची तटबंदी आजही महत्वाची आहे. ब्रिटीश काळात तसेच अलीकडील काळात आलेल्या मोठ-मोठया पुरांच्या वेळी पाण्याची पातळी दर्शविणाऱ्या खुणा आजही आपल्याला पठाणपुरा गेट व विठोबा खिडकीवर पहायला मिळतात. या संपुर्ण तटबंदीत चार मुख्य दरवाजे असुन पाच लहान दरवाजे आहेत. हे लहान दरवाजे खिडक्या म्हणुन ओळखले जातात. या मुख्य दरवाजांची नावे अनुक्रमे जटपूरा दरवाजा, बिनबा दरवाजा,पठाणपुरा दरवाजा आणि अंचलेश्वर दरवाजा, अशी असुन लहान दरवाजांची नावे चोरखिडकी,विठोबा खिडकी, हनुमान खिडकी,मसण खिडकी आणि बगडखिडकी अशी आहेत. या सर्व खिडक्या म्हणजे लहान दरवाजे मुख्य दरवाजांच्या मध्यवर्ती भागात आहे. मुख्य दरवाजा प्रमाणे या लहान दरवाजाच्या भागात देखील सैनिकांची रहाण्याची सोय आहे. हे सर्व दरवाजे रात्रीच्यावेळी बंद केले जात असत व सकाळी पुन्हा उघडले जात असत. या सर्व दरवाजावर सैनिक तैनात असत व अनोळखी लोकांना चौकशी केल्याविना आत घेतले जात नसे. तटबंदीतील दरवाजे बंद केल्यावर आतील रहिवाशांना आत घेण्याकरीता लहान दरवाजांचा वापर केला जात असे. याशिवाय किल्ल्याच्या मध्यभागी बालेकिल्ला असुन त्याचा आता तुरुंग म्हणुन वापर केला जात आहे. शहरात फिरताना या बालेकिल्ल्याची तटबंदी तसेच त्यातील बुरुज पहायला मिळतात. किल्ल्यात शिरणारे रस्ते वगळता किल्ल्याची तटबंदी आजही पुर्णपणे शिल्लक आहे इतकेच नव्हे तर काही दरवाजांचे नगरपालिकेने जतन केलेले आहे. किल्ल्यातील अंतर्गत वास्तु मात्र आज पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत. चंद्रपुरला जाण्यासाठी नागपुर अथवा वर्धा रेल्वे स्थानक सोयीचे असुन नागपुर येथुन बस अथवा रेल्वेने तर वर्धा येथुन बसने चंद्रपुरला जाता येते. चंद्रपुर शहराचे बस स्थानक व रेल्वे स्थानक जतपुरा दरवाजा पासुन जवळच अर्धा कि.मी. अंतरावर असल्याने आपली दुर्गभ्रमंतीची सुरवात हि जतपुरा दरवाजा पासुन होते. येथे येऊन स्थानिक चालक असलेली खाजगी रिक्षा ठरवल्यास आपला कमीत कमी वेळात संपुर्ण किल्ला फिरून होतो व किल्ल्याचे सर्व अवशेष व्यवस्थित पहाता येतात. चला तर मग आपली हि दुर्गभ्रमंती जतपुरा दरवाजा पासुन सुरु करू या. पश्चिमाभिमुख असलेला हा दरवाजा दोन अर्धगोलाकार बुरुजांमध्ये बांधलेला असुन दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजुस गोंड राजवटीचे राजचिन्ह कोरलेले असुन वरील भागात तसेच बुरुजाच्या दिशेला दरवाजाचे सौंदर्य वाढवण्यासाठी लहान मिनार बांधलेले आहेत. दरवाजावरील भागात, तटावर तसेच बुरुजावर बाहेर तोफांचा व बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या आहेत. या दोन्ही बुरुजावर काही कोरीव शिल्प आहेत. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस देखील राजचिन्ह कोरलेले असुन दरवाजाच्या वरील भागात व तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाचे लाकडी दार आजही शिल्लक असुन त्यावर मोठमोठे अणकुचीदार खिळे आहेत. या दरवाजातुन आज वाहनांची ये-जा सुरु असते. दरवाजाच्या डावीकडील बुरुजापासुन काही अंतरावर तटबंदी फोडुन तेथुन अवजड वाहनांसाठी रस्ता बनवलेला आहे. या दरवाजा विषयी स्थानिकांना विचारले असता त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे इ.स. १८१८मध्ये इंग्रजांशी लढताना वीरमरण प्राप्त झालेला किल्लेदार गंगासिंह हा जातीने जाट होता. तो व त्याच्या सैनिकांची घरे या भागात असल्याने या भागास जाटपुरा नाव पडले. त्यामुळे हा दरवाजा देखील जाटपुरा दरवाजा म्हणुन ओळखला जातो. हा दरवाजा पाहुन उजवीकडील रस्त्याने आपली पुढील गडफेरी सुरु करावी. गडाचा पुढील अवशेष म्हणजे चोरखिडकी. हा लहान दरवाजा बिनबा दरवाजा व जतपुरा दरवाजा यामध्ये बांधलेला आहे. या दरवाजाच्या दर्शनी भागात दोन्ही बाजुना गोंड राजसत्तेचे राजचिन्ह कोरलेले असुन त्याशेजारी व्यालसदृश्य प्राणी कोरलेला आहे. दरवाजापासून काही अंतरावर गोलाकार बुरुज असुन तटबंदीच्या आतील बाजूने त्यावर जाण्यासाठी दोन बाजुस पायऱ्या आहेत. या बुरुजावर दोन लहान मनोरे आहेत. चोर दरवाजा पाहुन तटबंदीला समांतर जात आपण बिनबा दरवाजात पोहोचतो. बिनबा दरवाजा शहराच्या दक्षिण दिशेस असुन या दरवाजा बाहेर इरई नदीचे पात्र आहे. किल्ल्याबाहेर नदी असल्याने येथे वस्ती न वाढल्याने फारशी वर्दळ नाही. उत्तराभिमुख असलेला हा दरवाजा दोन बुरुजामध्ये बांधलेला असुन या दरवाजाच्या दर्शनी भागात तसेच आतील बाजुस गोंड राजचिन्ह व कमलपुष्प कोरलेले आहे. दरवाजाच्या व बुरुजाच्या वरील भागात मिनार असुन बुरुजावर अर्धकमान आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन तटबंदीत सैनिकांना रहाण्यासाठी दालने आहेत. या दालनांच्या दरवाजावर काही शिल्प कोरलेली आहेत. तटबंदीच्या आतील बाजूने तटावर तसेच बुरुजावर जाण्यासाठी वेगवेगळे जिने आहेत. दरवाजाचे लाकडी दार आजही शिल्लक असुन त्यावर मोठमोठे अणकुचीदार खिळे आहेत. मुख्य दरवाजा बंद असताना या दारातुन आत येण्यासाठी लहान दिंडी दरवाजा आहे. दरवाजा जवळ असलेल्या फलकावरील माहितीनुसार इ.स.१८१८ मधील इंग्रजांविरुद्धच्या लढाईत बिनबा माळी गडाच्या पश्चिम भागाचा जामदार होता. या लढाईत तो शहीद झाल्याने त्याचे नाव या दरवाजाला देण्यात आले आहे. या पुढील दरवाजा म्हणजे विठोबा खिडकी. हा लहान दरवाजा बिनबा दरवाजा व पठाणपुरा दरवाजा यामध्ये बांधलेला आहे. हा दरवाजा पहाण्यासाठी आपल्याला बाबुपेठ भागात यावे लागते. उत्तराभिमुख असलेला हा दरवाजा तटबंदीत बांधलेला असुन त्या शेजारी गोलाकार बुरुज आहे. या बुरुजाच्या तटबंदीवर दोन्ही बाजुस दोन लहान मिनार असुन खालील भागात सैनिकांना रहाण्यासाठी खोली आहे. तटबंदी बाहेर इरई नदीचे पात्र असल्याने या बाजूने चंद्रपुर शहराची वाढ झालेली नाही. दरवाजाबाहेर गोंड राजचिन्ह कोरलेले असुन इतरही अनेक शिल्प कोरलेली आहेत. या शिवाय दरवाजा बाहेर इतरत्र सापडलेली काही देवतांची कोरीव शिल्प मांडलेली आहेत. या दरवाजाबाहेर वस्ती न वाढल्याने दूरवर पसरत गेलेल्या तटबंदीचे सुंदर दर्शन होते. हे दर्शन कॅमेऱ्यात टिपून आपल्या पुढील भटकंतीला सुरवात करूया. किल्ल्याचा पुढील भाग म्हणजे पठाणपुरा दरवाजा. किल्ल्याच्या एकुण चार दरवाजातील हा सर्वात सुंदर दरवाजा आहे. दोन बुरुजात बांधलेला हा दरवाजा पुर्वाभिमुख असुन त्यावर मोठ्या प्रमाणात कोरीव काम केलेले आहे. दोन्ही बुरुज अष्टकोनी आकाराचे असुन त्यावर शिल्प कोरलेली आहेत. संपुर्ण दरवाजाचे बांधकाम अतिशय कलात्मकतेने केलेले असुन त्याच्या माथ्यावर नक्षीदार दगडी खांब तसेच गुंबद आहेत. दरवाजाच्या आतबाहेर दोन्ही बाजुस गोंड राजचिन्ह कोरलेली असुन दरवाजाची चौकट कोरीवकामाने सजवलेली आहे. दरवाजाचे लाकडी दार सतत येणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे नष्ट झालेले आहे. दरवाजाच्या आत पहारेकऱ्याच्या देवड्या असुन तटबंदीमध्ये त्यांना रहाण्यासाठी घरे आहेत. दरवाजावरील भागात, तटावर तसेच बुरुजावर तोफांचा व बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या बांधलेल्या आहेत. हा दरवाजा इरई व झटपट नदीपात्रांच्या मध्यवर्ती भागात असुन या ठिकाणी देखील तटबंदीबाहेर शहराची वाढ झालेली नाही. हा दरवाजा पाहुन आपली पावले वळतात ती हनुमान खिडकीकडे. हनुमान खिडकी पठाणपुरा दरवाजा व अंचलेश्वर दरवाजा यांच्या मध्यवर्ती भागात असुन या संपुर्ण तटबंदी बाहेर झटपट नदीचे पात्र आहे. हा लहान दरवाजा एका बुरुजालगत बांधलेला असुन या बुरुजाच्या खाली सैनिकांना रहाण्यासाठी खोली आहे. बुरुजाच्या वरील भागात तोफेसाठी कट्टा बांधलेला असुन त्यावर ध्वज रोवण्यासाठी जागा आहे. हनुमान खिडकी पाहुन तटबंदीला समांतर ठेवत आपला पुढील प्रवास अंचलेश्वर दरवाजाच्या दिशेने सुरु होतो. या वाटेने जाताना आपल्याला उजव्या बाजुस तटबंदीला लागुन खोलगट भागात एक खुप मोठे खेळाचे मैदान व त्यात प्रेक्षकांना बसण्याची सोय दिसुन येते. हे खेळाचे मैदान म्हणजे एकेकाळी किल्ल्यात असलेला प्रचंड मोठा तलाव असुन त्याचे सध्या मैदानात रुपांतर केलेले आहे. हे मैदान पहात आपण अंचलेश्वर दरवाजा समोर उभे ठाकतो. पश्चिमाभिमुख असलेला हा दरवाजा दोन बुरुजांमध्ये बांधलेला असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दरवाजाच्या आत-बाहेर दर्शनी भागात गोंड राजवटीचे राजचिन्ह कोरलेले असुन वरील भागात लहान मिनार बांधलेले आहेत. या संपुर्ण बांधकामात तोफांचा व बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके व जंग्या आहेत. आत तटबंदीला व बुरुजाला लागुन दरवाजाच्या वरील भागात व तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. तटबंदीवर जाणाऱ्या या पायऱ्याखाली सैनिकांना रहाण्यासाठी दालन आहे. दरवाजाच्या डावीकडील बुरुजावर तोफेसाठी कट्टा बांधलेला असुन खालील भागात कोठार आहे. या कोठारात मोठ्या प्रमाणात माती जमा झाली आहे. दरवाजाचे लाकडी दार आजही शिल्लक असुन त्यावर मोठमोठे अणकुचीदार खिळे आहेत. या दरवाजातुन आज वाहनांची ये-जा सुरु असते. दरवाजाच्या उजवीकडील बुरुजा शेजारील तटबंदी फोडुन तेथुन मोठ्या वाहनांसाठी रस्ता बनवलेला आहे. दरवाजासमोर झटपट नदीचे पात्र असुन पुर्वी या दरवाजाने ये जा करण्यसाठी नदीवर लाकडी पूल होता. या पुलाच्या काही खुणा आजही दरवाजासमोर दिसुन येतात. आज येथे नव्याने बांधलेला कायमस्वरूपी पुल आहे. नदीच्या दुसऱ्या बाजुस नव्याने वाढलेले चंद्रपुर शहर असुन महाकाली मंदिर पहायचे असल्यास त्या भागात जावे लागते. अंचलेश्वर दरवाजा जवळ असलेल्या महत्वाच्या दोन वास्तु म्हणजे अंचलेश्वर मंदिर व गोंड राज परिवाराचे समाधीस्थळ. या दोन्ही वास्तु किल्ल्याबाहेर वेगवेगळ्या तटबंदीत बांधलेल्या असुन नंतर त्याची तटबंदी किल्ल्याशी जोडण्यात आली असावी. अंचलेश्वर दरवाजा बाहेर नदीकाठी अंचलेश्वर हे शिवमंदिर आहे.मंदिराबाहेर एक लहान गणेश मंदिर असुन काही शिल्प आसपास मांडलेली आहे. मंदिराच्या तटबंदीतील दरवाजाने आत शिरल्यावर डाव्या बाजुच्या तटबंदीस समाधीस्थळाचा शिल्पांनी सजवलेला दरवाजा आहे. यावर अनेक शिल्प कोरलेली असुन गणपती व गोंड राजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. येथुन आत न जाता आपण सर्वप्रथम अंचलेश्वर मंदिर पाहुन घ्यावे. अंचलेश्वर मंदिराच्या आत बाहेर मोठ्या प्रमाणात कोरीव काम केलेले असुन मंदिराचे शिखर देखील मुर्ती व नक्षीकामाने सजवलेले आहे. मंदिराच्या आवारात दोन लहान पण सुंदर शिवमंदिरे असुन यातील एका मंदीरात नृसिंहाची भव्य व रेखीव मुर्ती आहे. भाविकांच्या पाण्याची व राहण्याची सोय म्हणुन आवारातच चौकांनी आकाराची पायऱ्याची विहीर असुन संपुर्ण तटबंदीत ओवऱ्या बांधलेल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहात शिवलिंगाच्या ठिकाणी शाळुंका ऐवजी खळगा असुन त्यातुन सतत पाणी पाझरत असते. मंदिरातील दगडी दिवे भिंतीवरील मूर्तींच्या हातात कोरलेले असुन आवर्जुन पहावी अशी हि शिल्पे आहेत. मंदिर पाहुन झाल्यावर गोंड राजांच्या समाधी स्थळावर प्रवेश करावा. समाधीस्थळ म्हणजे एक मोठे बंदिस्त पटांगण आहे. या समाधी स्थळाच्या एक बाजुस मुख्य किल्ल्याची तटबंदी असुन उर्वरीत तीन बाजुस स्वतंत्र तटबंदी आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी किल्ल्याकडील तटबंदीत दरवाजा असुन आता तो बंद करण्यात आला आहे. समाधी परिसरात चुन्याचा घाणा असुन चौकोनी आकाराची तीन मजली सुंदर पायऱ्यांची विहीर आहे. या विहिरीला जमीनीखालील भागात दोन मजली दालन असुन याला एक प्रकारचा जलमहाल म्हणता येईल. विहिरीचे पाणी शेंदण्यासाठी वरील भागात मोट बांधलेली असुन विहिरीचे पाणी बांधीव पन्हाळीने समाधी परिसरात खेळवलेले आहे. येथे लहानमोठ्या व विविध आकाराच्या एकुण १८ समाधी चौथरे, छत्र्या व इमारती असुन या सर्व वास्तु अतिशय कलात्मकतेने बांधलेल्या आहेत. या सर्व वास्तुमधील सर्वात सुंदर वास्तु म्हणजे राजा बीरशहाची समाधी इतकेच या वास्तूबद्दल म्हणता येईल. या समाधी समोर बांधीव कारंजे असुन त्यात आवारातील विहिरीचे पाणी आणण्यासाठी खापरी नळांचा वापर केला आहे. अंचलेश्वर मंदिर व समाधी पार्सर पहाण्यास पाउण तास पुरेसा होतो. किल्ल्याचा हा भाग पाहुन झाल्यावर आपले पुढील उद्दिष्ट म्हणजे मसणखिडकी. हा दरवाजा शहरातील बालाजी मंदिराजवळ असल्याने आधी बालाजी मंदीराची विचारणा करावी. हा दरवाजा म्हणजे ये जा करण्याचा मार्ग नसुन किल्ल्याची स्मशानभूमी या भागात होती. या स्मशानभूमीकडे येणारा दरवाजा म्हणजे मसणखिडकी. हा भाग झटपट नदीकाठी असुन आता येथे वावर नसल्याने मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन काटेरी झाडी वाढलेली आहे. याच्या समोरील भागात झटपट नदीचे पात्र असल्याने तेथुन कोठेही जाता येत नाही. मसणखिडकी,बगडखिडकी,तीन खिडकी या तीनही वास्तु अंचलेश्वर दरवाजा व जटपुरा दरवाजा यामधील तटबंदीत आहेत. मसणखिडकी पाहुन झाल्यावर बगड खिडकीकडे निघावे. बगड खिडकी म्हणजे किल्ल्याचा दक्षिण टोकाचा भाग असुन अतिशय निमुळता आहे. या बाजूला तटबंदीच्या दोन टोकावर दोन बुरुज असुन त्याच्या मध्यावर हा दरवाजा बांधलेला आहे. या दोन्ही बुरुजाखाली सैनिकांना रहाण्यासाठी दालने आहेत. दरवाजाच्या दर्शनी भागात गोंड राजचिन्ह,कमळ व इतर दोन शिल्प कोरलेली असुन आतील बाजूने दरवाजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजाचा उजवीकडील बुरुज गोलाकार आकाराचा असुन डावीकडील बुरुज कमळाच्या फुलाच्या आकाराचा आहे. जटपुरा दरवाजा ते व बगडखिडकी पर्यंत असलेली तटबंदी हि रामाळा तलावाच्या काठावर असल्याने किल्ल्याला या तलावाचे नैसर्गिक संरक्षण आहे. बगडखिडकी पाहुन रामाळा तलावाच्या काठाने जटपुरा दरवाजाकडे जाताना वाटेत तटबंदीमध्ये तलावाच्या दिशेने असलेले तीन गवाक्ष पहायला मिळतात. येथुन टोकावरील बगड दरवाजा समोरच दिसत असल्याने त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी याची योजना असावी तसेच नौका विहारासाठी याचा वापर केला जात असावा. येथुन सरळ पुढे चालत आल्यावर १० मिनीटात आपण सुरवात केलेल्या ठिकाणी म्हणजे जाटपुरी दरवाजात पोहोचतो. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. याशिवाय चंद्रपुर शहराच्या मध्यभागी स्वतंत्र तटबंदी असलेला आयताकृती आकाराचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या चार टोकाला चार गोलाकार बुरुज असुन पश्चिम बाजुस पुर्वाभिमुख दरवाजा आहे. बालेकिल्ल्याचा आता तुरुंग म्हणुन वापर केला जात असल्याने आत प्रवेश नाही. याच्या पूर्वेकडील तटबंदी जवळच सोमेश्वर मंदिर आहे. चंद्रपुर शहरात महाकाली मंदिर, गंगासिंगाची समाधी तसेच रामाळा तलाव, रामबाग, कॅ. कोरहॅमचे थडगे या वास्तु देखील पहाता येतात. गडफेरी पायी अथवा वहानाने अशी दोन्ही प्रकारे करता येते. संपुर्ण दुर्गदर्शन रिक्षाने केल्यास चंद्रपुर शहर पहाण्यासाठी चार तास पुरेसे होतात पण पायी हे नगर व दुर्गदर्शन करायचे असल्यास एक पुर्ण दिवस हाताशी हवा. प्राचीनकाळात चंद्रपूरचा प्रदेश हा लोकापुरा व त्यानंतर इंद्रपूर या नावांनी ओळखला जात असे. १३व्या शतकात विदर्भात गोंड राजवट उदयास आली व त्यांनी या भागावर आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले त्यामुळे त्यांच्या संस्कृतीची छाप येथील किल्ल्यांवर दिसुन येते. प्रवेशद्वारावर असलेले हत्तीवर आरूढ झालेल्या सिंहाचे शिल्प हे त्यांचे राजचिन्ह म्हणून ओळखले जाते. भीम बल्लाळसिंग यांनी शिरपूर येथून बल्लारशा येथे गादी आणल्यावर पुढे खांडक्या बल्लारशा यांनी येथून चंद्रपूरच्या राज्याचा कारभार पाहिला. गोंड राज्याच्या सुरवातीच्या काळात (इ.स.१४३७-६२) बल्लारशा हे त्याच्या राजधानीचे ठिकाण होते. पुढे खांडक्या बल्लाळशहा यांनी चंद्रपूर येथे राजधानी स्थानांतरित करण्यासाठी झरपट नदीच्या काठावर नव्या किल्ल्याची योजना आखली. खांडक्या बल्लाळशाहच्या पदरी तेल ठाकूर नावाचा एक वास्तुशास्त्रज्ञ होता. त्याला इ.स. १४७२ मध्ये येथे किल्ला बांधायला सांगितले. तेल ठाकूराने पहाणी करुन साडेसात मैलाच्या परिघाची आखणी केली आणि कोटाची पायाभरणी केली. पण खांडक्या बल्लाळशाह याच्या हयातीत हा किल्ला पूर्ण होऊ शकला नाही. खांडक्या बल्लाळशहाच्या मृत्युनंतर त्याचा मुलगा हीरशहा गादीवर आला. त्यानेही परकोटाच्या चार वेशी उभारल्या. हत्तीवर आरुढ असलेला सिंह हे त्यांच्या शौर्याचे प्रतिक होते. हे प्रतिक त्यांनी राजचिन्ह म्हणून स्विकारले आणि वेशीच्या चारही बाजूंना कोरुन घेतले. मात्र या चिन्हांमधील सिंहाचा आकार हत्तीच्या दुप्पट दाखवलेला आहे. हिरशहा यांच्या काळात बांधकाम चालु असताना बल्लारशाची राजधानी चंद्रपूरला स्थानांतरीत झाली. पुढे धुंड्या रामशहा (१५९७ ते १६२२) याच्या कारकिर्दीमधे बालेकिल्ल्याचे काम पूर्ण झाले. त्यावेळी मोठा दानधर्म करण्यात आला. या संपुर्ण बांधकामाला त्यावेळी सव्वा कोटी रुपये खर्च आल्याची नोंद आहे. बल्लारशहा, चंद्रपूर आणि नागपूर असे गोंड राजांच्या राजधानीचे स्थित्यंतर होत गेले. गोंड राजांचा सुरुवातीचा काळ वगळता नंतरच्या काळात मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे त्यांच्यावर युद्धाचे फारसे प्रसंग ओढवलेच नाहीत. चंद्रपूरच्या वैभवशाली किल्ल्यावर व राज्यावर नागपुरचे भोसले तसेच निजाम यांची नजर होती. १८ व्या शतकाच्या सुरवातीस गोंड वारसाहाक्काच्या अंतर्गत कलहात चंद्रपुरवर नागपूरकर भोसल्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. भोसल्यासोबत झालेला तह चंद्रपूर येथील शेवटचे गोंडराजे निळकंठशहा यांनी पाळला नाही. त्यामुळे रघुजी भोसले यांनी इ.स. १७५० मध्ये चंद्रपूरवर चढाई केली. या लढाईत निळकंठशहा यांचा पूर्ण पराभव झाला व त्यास कैद करून बल्लारपूरच्या किल्ल्यात नजरकैदेत ठेवले. गोंड राजा निळकंठशहा याचा इ.स.१७५१ मध्ये बल्लारपूर येथे कैदेत मृत्यु झाला व वैभवशाली गोंड राज्यसत्तेचा अस्त झाला. नागपूरच्या भोसल्यानी इ.स. १८१६ मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा तह केला. पुढे जानेवारी १८१८च्या तहानुसार चंद्रपूरचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात दयावे असे ठरले पण तो न दिल्याने इंग्रजी फौजांनी चंद्रपूरच्या किल्ल्यास ९ मे १८१८रोजी वेढा दिला. ९ मे ते१३ मे पठाणपुरा बाहेरील माना टेकडयावरून तोफेचे मोर्चे बांधले व १३ मेपासुन तोफेचा मारा सुरू केला. भोसलेच्या फौजांनीही तोफांनी प्रतिहल्ला चढविला. सलग चार दिवस हे युद्ध सुरू होते. परंतु किल्ला भक्कम आणि मजबूत असल्याने शक्य झाले नाही. १९ मे रोजी तटबंदीला खिंडार पडले आणि २० मे १८१८ रोजी या खिंडारातून सैनिक शहरात आत शिरले. यावेळी गंगासिंग जाट हे चंद्रपूर येथील किल्लेदार होते. चार दिवस चाललेल्या या लढाईत अलीखांन या गोलदांजाने डागलेल्या तोफेच्या गोळ्याने मेजर कोरहॅम या इंग्रज अधिकाऱ्याचा अचुक वेध घेतला. या लढाईत गंगासिंह जाट लढताना जखमी होऊन मरण पावले. या दोघांच्या समाधी आजही आपल्याला चंद्रपुर शहरात पहायला मिळतात. इंग्रजांच्या युद्धसामग्रीपुढे मराठ्यांचा टिकाव न लागल्याने पठाणपुरा दरवाजावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला व किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. यावेळी १० लाख रुपयांचा येवज येथे मिळाल्याचा उल्लेख कॅप्टन स्कॉट याने केला आहे. पुढे नागपूरचे राजे रघुजी भोसले यांच्या मृत्यूनंतर त्यांना वारस नसल्याचे कारण दाखवत त्यांचे राज्य खालसा करून हा प्रदेश ब्रिटिश साम्राज्यास जोडला गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!