BRAMHAGAON

TYPE : FORTRESS

DISTRICT : BEED

HEIGHT : 0

नगर- बीड जिल्ह्याची भटकंती करताना आपल्याला अनेक लहानमोठ्या अपरीचीत गढी पहायला मिळतात. राजे निंबाळकर गढी या नावाने ओळखली जाणारी अशीच एक गढी आपल्याला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या ब्रम्हगाव या गावात पहायला मिळते. हि गढी राजे निंबाळकर यांची गढी म्हणुन ओळखली जात असली तरी स्वतःच्या इतिहासाबद्दल मात्र पूर्णपणे अबोल आहे. आष्टी तालुक्यात असलेली हि गढी आष्टी या तालुक्याच्या ठिकाणापासुन ८ कि.मी. अंतरावर आहे. भाळवणी येथे देखील निंबाळकरांची गढी असुन या दोन्ही गढी एकमेकांपासुन ४ कि.मी.अंतरावर आहेत. नगरहून एक दिवसाच्या भटकंतीत या दोन्ही गढी सहजपणे पाहुन होतात. भाळवणी येथील गढी काही प्रमाणात सुस्थितीत असली तरी ब्रम्हगाव येथील गढीची मात्र मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. चौकोनी आकाराची हि गढी साधारण दीड एकरवर पसरलेली असुन गढीच्या आतील भागात निंबाळकर यांचे वंशज आजही वास्तव्यास आहेत. गढीचा मुख्य दरवाजा काळाच्या ओघात त्याच्या कमानीसकट नष्ट झाला असला तरी त्याच्या शेजारी असलेली २० फुट उंच तटबंदी आजही शिल्लक आहे. ... या तटबंदीचे तळातील बांधकाम ओबडधोबड दगडांनी केलेले असुन त्यावरील बांधकाम पांढऱ्या मातीत म्हणजे मातीच्या भेंड्यानी केलेले आहे. चारही बाजूस असलेली हि तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. तटबंदी शिल्लक असली तरी त्यावर असलेल्या झाडीमुळे तटावर जाता येत नाही. गढीच्या आत असलेल्या मूळ वास्तुंच्या चौथऱ्यावर नव्याने बांधलेली घरे आहेत. यातील एक जुने घर आजही शिल्लक असुन त्या घरात आपल्याला जमिनीखाली असलेले बळद म्हणजे साठवणीची खोली पहायला मिळते. उर्वरित मूळ बांधकाम नष्ट झाले असले तरी या नवीन बांधकामाच्या खाली असलेल्या चौथऱ्याची रचना पहाता येथे प्रशस्त चौसोपी वाड्याची रचना असल्याचे ध्यानात येते. गढीची भटकंती करताना आपल्याला तटबंदीच्या आतील बाजुस शिल्लक असलेले दोन बुरुज पहायला मिळतात. याशिवाय गढीला पाणी पुरवठा करण्यासाठी गढीच्या आत एक दगडी बांधकामातील विहीर पहायला मिळते. गढीच्या आत खाजगी वास्तव्य असल्याने १५ मिनिटात आपली फेरी आटोपती घ्यावी. गढीच्या एकंदरीत इतिहासाबद्दल गढीत वास्तव्यास असलेले निंबाळकर यांचे वंशज देखील अनभिज्ञ आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!