BISHTA

TYPE : HILL FORT

DISTRICT : NASHIK

HEIGHT : 3315 FEET

GRADE : HARD

बागलाण तालुक्यात सेलबारी, डोलबारी, हिंदळबारी, गाळणा, चणकापुर आणि दुंधेश्वर यासारख्या डोंगररांगा आहेत. यातील दुंधेश्वर डोंगररांगेत असलेले चौकीवजा लहान लहान किल्ले शिवकालीन इतिहासापासून अलिप्त राहिल्याने विस्मरणात गेले. यातील एक किल्ला म्हणजे बिष्टा किंवा बिजोट्याचा किल्ला. स्थानिक लोकांमध्ये गवळणीचा किल्ला म्हणुन माहित असणारा हा किल्ला १९८५ साली इतिहास अभ्यासक श्री. गिरीश टकले यांनी वैनतेय गिर्यारोहण – गिरिभ्रमण संस्थेच्या माध्यमातून प्रकाशात आणला. या किल्ल्याची माहीती वाचताना बहुतांशी ठिकाणी या किल्ल्यात जाण्यासाठी कोटबेल हे पायथ्याचे गाव असुन या गावातुन किल्ल्यावर जाण्या-येण्यासाठी पाच तास लागतात असे वाचले होते. सोबत किल्ल्यावर जाण्यासाठी बिजोटे गावातुन दुसरी वाट असुन हि वाट अवघड व निसरडी असुन या वाटेने देखील गडावर जाण्यासाठी चार तास लागतात हे देखील वाचले होते. शिवाय या वाटेचा वापर करू नये असे मत देखील नोंदवले होते. मला वाटते कि बिष्टा किल्ल्याच्या मोहीमा या पुर्वासुरिनी दिलेल्या माहितीच्या आधारे कोटबेल गावातुन झाल्याने इतर कोणीही दुसरा मार्ग चोखळला नसावा त्यामुळे दुसरी वाट अवघड असल्याच्या मतावर शिक्कामोर्तब झाले असावे. ... मुळात कोटबेल हे बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याचे गाव नसुन बिजोटे हे किल्ल्याला जवळ असलेले पायथ्याचे गाव आहे आणि या गावामुळे हा किल्ला बिजोट्याचा किल्ला म्हणुन ओळखला जातो. बिजोटे गावातुन किल्ल्यावर जाऊन येण्यासाठी अडीच तास पुरेसे होतात व हि वाट सोपी असुन नाशिकमधील इतर किल्ल्यांच्या वाटेप्रमाणे मुरमाड दगडांची आहे. कोटबेल गावातुन बिष्टा किल्ला ४ कि.मी.अंतरावर असुन किल्ल्यावर जाण्यायेण्यासाठी ५ तास लागतात व हि वाट चांगलीच थकवणारी आहे. बिष्टा किल्ल्याच्या पायथ्याचे बिजोटे गाव नाशिक शहरापासुन ११७ कि.मी.अंतरावर असुन सटाणा या तालुक्याच्या ठिकाणाहुन २७ कि.मी. अंतरावर आहे. बिष्टा किल्ला ज्या डोंगरावर वसलेला आहे, त्या डोंगराची एक सोंड बिजोटे गावात उतरलेली असुन या सोंडेवरून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. हि सोंड ज्या ठिकाणी उतरलेली आहे त्या ठिकाणी पवारवस्ती असुन बिजोटे गावातुन कच्चा रस्ता या वस्तीपर्यंत येतो. ओळखीची खुण म्हणजे किल्ल्यावर जाणारा रस्ता जेथुन सुरु होतो त्या ठिकाणी एका नाथपंथीय बाबांचे घर व मंदिर आहे. या घरामागुन किल्ल्याखालील डोंगरावर जाणारी वाट सुरु होते. या मळलेल्या वाटेने बिष्टा किल्ला डाव्या बाजुस तर दरी उजवीकडे ठेवत अर्ध्या तासात आपण बिष्टा किल्ल्याचा डोंगर व शेजारचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचतो. या खिंडीत आल्यावर पलीकडे न जाता तिरकस वाटेने किल्ल्याखालचे पठार चढण्यास सुरवात करावी. किल्ल्यावर कोणी जात नसल्याने वाट मळलेली नाही व काहीशी मुरमाड पण सोपी आहे. या वाटेने पंधरा मिनिटे तिरकस चढाई केल्यावर आपण बिष्टा किल्ला व त्याशेजारी असलेल्या टेकडीच्या घळीखाली येतो. कोटबेल गावातुन येणारी वाट याच घळीखाली येते. इतरांनी वर्णन केलेली बाभळीची काटेरी झुडपे वाटेवर दिसत नाही, असल्यास गावकऱ्यांच्या वर येणाऱ्या बकऱ्यांनी ती फस्त केली असावी. बिष्टा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला असुन घळीच्या उजवीकडे असलेल्या बिष्टा किल्ल्याच्या पोटात काही गुहा खोदलेल्या दिसतात. आपण घळीच्या डाव्या बाजूने किल्ला चढायला सुरुवात करावी. घळीचे वरील तोंड निमुळते असुन १० मिनीटात आपण गुहांजवळ पोहोचतो. गुहेत जाणाऱ्या पायऱ्या तुटल्याने तेथे जाण्याचा मार्ग थोडा कठीण आहे पण नेहमी भटकंती करणाऱ्यांसाठी तो सोप्पा आहे. नराचा वानर करून म्हणजे प्रस्तरारोहणाचे तंत्र वापरुन या गुहेकडे जाता येते. या ठिकाणी पाण्याची दोन मोठी टाकी असुन त्याशेजारी तोंडावर झाडी वाढलेली अजुन एक लहान गुहा आहे. दोन्ही टाक्याच्या गुहेच्या दर्शनी भागात दगडी खांब असल्याने खालुन पाहताना हि टाकी वेगवेगळ्या चार गुहा असल्यासारखी भासतात. किल्ल्यावर येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी या गुहांचा वापर केला जात असावा. स्थानिक लोक या गुहांना गवळणीची घरे म्हणुन ओळखतात. गुहा पाहून परत वाटेवर येउन वर चढायला सुरवात केल्यास ५ मिनिटात आपला किल्ला व शेजारच्या उंचवट्याच्या खिंडीत येतो. या ठिकाणी असलेले घडीव दगड पहाता येथे किल्ल्याची तटबंदी व दरवाजा असावा. डावीकडील उंचवट्यावर झेंडा रोवायचा चौथरा वगळता इतर काहीही दिसत नाही. उंचवटा पाहुन उजवीकडील टेकाडावर चढल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. येथे दरीच्या काठावर दगड फोडण्यासाठी एका रेषेत पाडलेले खळगे दिसुन येतात. येथुन पुढे आल्यावर दरीच्या काठावर तटबंदीचा पाया दिसुन येतो. येथुन पुढे आल्यावर दरीच्या काठावर पाण्याचे एक मोठे टाके पहायला मिळते. या टाक्यात मार्चपर्यंत पाणी असते पण ते काढण्यासाठी पोहऱ्याची गरज भासते. टाके पाहुन वरील बाजुस गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. गड माथा प्रशस्त असुन माथ्यावर मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले आहे. माथ्यावर लहानमोठे ६ उध्वस्त घरांचे अवशेष असुन गवळी लोकांची हि घरे अगदी अलीकडील काळापर्यंत म्हणजे १९८० पर्यंत नांदती असल्याचे आम्हाला वाटाड्याने सांगीतले. यातील तीन घरे बिजोट्यात, दोन घरे कोटबेल येथे तर एक घर इतरत्र स्थलांतर झाल्याचे सांगीतले. गडमाथ्यावर किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३३१५ फुट आहे. गडमाथा फिरून परत टाक्यापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. माथ्यावरुन फ़ोपिरा डोंगर,कऱ्हा,अजमेरा, साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड,डेरमाळ, पिसोळ हे गड दिसतात.गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. इ.स.१३०८ मधे कनोज येथील राठोड ( बागुल) यांची बागलाणवर सत्ता आली. इ.स. १३०० ते १७०० या कालखंडात ५४ बागुल राजे होउन गेले. या राजावरुन या प्रदेशाला बागलाण असे नाव पडले. पुढे हा परिसर मोगल राजवटीच्या अंमलात आला. शिवाजी महाराजांनी साल्हेर, मुल्हेरसारखे बलदंड गड ताब्यात घेतले पण या भागातील लहान चौकीच्या किल्ल्यांची नावे त्यांनी जिंकलेल्या किल्ल्यांच्या यादीत येत नाहीत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!